कॅन्सरवरचे उपचार
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कॅन्सरवरचे उपचार प्रामुख्याने तीन प्रकारे होतात – शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन.
शस्त्रक्रियेने कॅन्सर मूळापासून काढला जातो. किमो मधे औषधांनी शरीरात कुठेही पसरलेल्या कॅन्सरच्या पेशींना मारले जाते. रेडिएशन थेरपीत एक्स-रे आणि गॅमा रें किरणांनी कॅन्सरच्या पेंशीना मारले जाते. हे तिन्ही उपचार कुठल्याही क्रमाने होतात. कधी किमो -शस्त्रक्रिया-किमो-रेडिएशन असे, तर कधी शस्त्रक्रिया -किमो-रेडिएशन असे, तर कधी रेडिएशन+किमो असे. कॅन्सरचा प्रकार, टयूमरचे आकारमान, पेशंटचे वय, शारीरीक स्थिती इ. अनेक बाबींचा विचार करुन या उपचारांचा क्रम ठरवला जातो. यासाठी या तिन्ही प्रकारचे डॉक्टर एकमेंकाशी सल्लामसलत करत असतात. खुपदा आधी ठरवलेला उवचारांचा क्रम नंतर डॉक्टर बदलतातही. पेशंट म्हणून आपल्याला वाटते की का हे सगळेे डॉक्टर आपल्याला फुटबॉलच्या चेंडूप्रमाणे इकडे तिकडे ढकलत आहेत; पण डॉक्टरही सगळया शक्यता आजमावत असतात. कॅन्सरवरचे उपचार म्हणजे ६-८ महिन्यांची धावपळ.
कॅन्सरचे निदान झाल्यावर पेशंट आणि घरातील सर्वजण सुन्न होतात. विचारशक्तीच खुंटते. आमचीही स्थिती अशीच झाली होती. डॉक्टर, परिचित कुणी काय कुणी काय सांगते ते आपण मेंढरागत मानतो. आपल्या हातून आपल्याच आयुष्याचा ताबा सुटतो. गोंधळून जातो. हताश होतो यावर मात करण्यासाठी या काही गोष्टीं-
- रोगमुक्त होण्याची क्रिया रुग्णांच्या मनातून, ह्दयातून सुरु होते. मग शरीर त्याला साथ देते. आपल्याला झालेला आजार, त्याचे स्वरुप, कारणे, त्यावरचे उपचार- परिणाम हे सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समजून घ्यावे. ‘माझ्या आयुष्यसंबंधीचे निर्णय मी सर्व बाबी नीट समजल्यावर घेणार’ असा ठाम निर्धार करावा. उपचार प्रक्रियेत असलेला रुग्णाचा सकारात्मक सहभाग उपचार शतपटीने प्रभावी करतात.
- ज्या डॉक्टरांबरोबर बोलल्याने आपल्याला बरे वाटते , जे डाॅक्टर आपल्याला सर्व नीट समजावून सांगतात अशा डाॅक्टरांकडे उपचार घ्यावेत.
- पक्का निर्णय घेण्या आधी सेकंड ओपिनीयन,दुसर्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
- डॉक्टरांना कधीही प्रश्न विचारायला लाजायचे नाही. आपले अज्ञान दिसेल म्हणून संकोचायचे नाही. काही डॉक्टरांना प्रश्न विचारलेले आवडतात. काहींना नाही. पण हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.
- एक छोटी वही करायची. डॉक्टरांकडे जाताना नेहमी आपल्याबरोबर ठेवायची. आपल्या सर्व शंका, प्रश्न, अडचणी त्यात तारखेनिशी लिहून ठेवाव्यात. हॉस्पिटलच्या दोन वार्यादरम्यान काय त्रास झाला, औषधांना आपल्या शरीराने दिलेला बरा-वाईट प्रतिसाद असे सर्व नोंदवून ठेवावे म्हणजे डॉक्टरांना भेटल्यावर काही विचारायचे राहिले असे होत नाही.
- कॅन्सरवरचे शस्त्रक्रिया, किमो-रेडिएशन या उपचारांना सहा महिने ते एक वर्ष इतका कालावधी लागतो. या काळात हॉस्पिटल हेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांचे दुसरे घर होते. आपल्या कुंटुबाचे वेळापत्रक, व्यवस्था कोलमडते. तेव्हा या काळात आपल्या घराचे जमेल तेवढे शांत डोक्याने नियोजन करावे.
- शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये ८-१० दिवस आणि परत आल्यावर थोडफार बरं वाटायला ८-१० दिवस या हिशोबाने महिनाभराचे दाणापाणी घरात भरुन ठेवावे. मुलाबाळांची, घरात काम करणार्या मावश्यांची व्यवस्था नीट लावून ठेवावी. अडीअडचणीला म्हणून पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवावी.
- ऑफिसमध्ये आपले काम दुसर्याला नीट समजावून द्यावे. करायच्या कामांची यादी अग्रक्रमानुसार करुन द्यावी. पैशाचा हिशोब पूर्ण करावा.
- आपल्या तोंडाने कॅन्सरबद्दल बोलणे खूप कठीण आहे. शब्द अश्रूंमध्ये वाहून जातात. तरीही घरातील लहान-थोरांना हे काय उपचार चाललेत याची कल्पना देऊन ठेवावी. म्हणजे त्यांच्या मनाचीही या कठीण प्रसंगासाठी तयारी होते.
- या आजाराला माणूसबळ खूप लागते. तसेच बर्याच लोकांना रुग्णाला मदत करायची खरोखरच, मनापासून इच्छा असते. अशांकडून मदत मागण्यास संकोच करु नये. (या मदतीची परतफेड तुम्ही नंतर दुसर्या रुग्णांला मदत करुन करु शकता.) जेवण, चहा-नाश्ता, रुग्णाजवळ बसणे. यासाठी पाळया लावून ठेवाव्यात म्हणजे कुणा एका माणसावर भार पडत नाही.
- उपचारानंतर काय काळजी घ्यावी. संभाव्य धोके-साइड, इफेक्टस् काय, आपत्कालीन स्थितीत कुणाला भेटायचे, फोन नंबर घेऊन ठेवावा.
- घराजवळील हाॅस्पिटल मधील डॉक्टरांना, आपल्या फॅमिली डॉक्टरांना भेटून आपली केस सांगून ठेवावी.
‘मला बरं व्हायचं आहे’ या सकारात्मक वृत्तीने हॉस्पिटलमधे जावे.
- हॉस्पिटलमधले वास्तव्य कसे सुसह्य होईल याचा विचार करावा.
- तिथे मिळणारा मोकळा वेळ, निवांतपणा यांचा आपल्या शरीराच्या-मनाच्या विश्रांतीसाठी उपयोग करावा.
- आपल्या प्रिय व्यक्तिचा टेबलावर ठेवण्यासारखा फोटो घेऊन जावा.
- आनंदी, विनोदी पुस्तके न्यावीत. शांत, आनंदी, प्रेरणा, दिलासा देणारे संगीत ऐकावे.
- ऑपरेशनची, उपचारांची भिती वाटत असल्यास समुपदेशकांची मदत घ्यावी. बर्याचदा हॉस्पिटलमधील अनुभवी नर्सेसकडून चांगल्या टिप्स मिळतात.
उपचार सुरळीतपणे होण्यासाठी, गडबड-गोंधळ टाळण्यासाठी या काही गोष्टी
- कॅन्सरचे ऑपरेशन करणारे सर्जन वेगळे असतात. त्यांना ऑन्कोसर्जन म्हणतात. कॅन्सरला शरीरात त्यांच्या मूळ रुपात फक्त तेच पाहात असतात. शरीरात कॅन्सर किती पसरला आहे. त्याचे स्वरुप काय, त्यांची स्थिती काय या सगळया गोष्टी ऑन्कोसर्जन बारकाईने पाहतात. त्या वस्तुनिष्ठ निरीक्षणाला फार महत्त्व असते. त्यावरच पुढचे उपचार अवलंबून असते. म्हणून कितीही इमर्जन्सी असली तरी ऑन्कोसर्जनच्या उपस्थितीतच ऑपरेशन करुन घ्यावे.
- औषधांची, अन्नाची ऍलर्जी असल्यास डॉक्टरांना आवर्जून सांगावे.
- पूर्वी कधी ऑपरेशन झालेले असल्यास, भूल देताना किंवा परत शुद्धीवर येताना काही त्रास झाला असल्यास जरुर सांगावे. ऍलर्जी असलेल्या औषधांची नावे आपल्या फाईलला लावून ठेवावीत. (मला खूप औषधांची ऍलर्जी आहे. त्यामुळे हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो.)
- या आधी काही मोठे आजार जसे टायफाइड, कावीळ इ. झालेले असल्यास किंवा शस्त्रक्रिया झालेली असल्यास डॉ. ना त्यांची कल्पना द्यावी.
- काही शस्त्रक्रियेदरम्यान रक्त द्यावे लागते, त्यांचा अंदाज घेऊन तितके बाटली रक्त रक्तपेढीत जमा करावे लागते. दुर्मिळ रक्तगट असल्यास दोन-तीन रक्तपेढयात त्या गटांचे रक्त उपलब्ध आहे ना ? याची खात्री करुन घ्यावी.
- शस्त्रक्रियेदरम्यान खूप लोकांना बोलावणे टाळावे. दोन-तीनच मनाने खंबीर, धावपळ करु शकणारी माणसे बरोबर असावित.
- शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसर्ग टाळण्यासाठी काही दिवस जनसंपर्क टाळावा. भेटायला येणार्यांची संख्या मर्यादित ठेवावी.
- शरीरातील शक्ती कमी झाल्यामुळे थकवा टाळण्यासाठी फोनवर जास्त बोलणे टाळावे.
- डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे त्याचक्रमाने, त्याच मात्रेत रुग्णालयात दिली जात आहेत ना याची खातरजमा करावी.
- डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे हॉस्पिटलच्याच किंवा जवळच्या औषधांच्या दुकानातून विकत घ्यावीत. त्याची मुदत, बनवल्याची तारीख तपासावी आणि पावती घ्यावी. औषधांवरील सूचना नीट वाचाव्यात.
- मेडिक्लेम / विमा असल्यास त्याची कागदपत्रे तयार करावीत. त्यासाठी डॉक्टरांचे- प्रिस्क्रीप्शन, चाचण्यांचे रिपोर्ट्स, पावत्या सर्व क्रमवार एका प्लॉस्टिकच्या पिशवीत लावून ठेवाव्यात. विमा कंपनीला आगावू सूचना देणे आवश्यक असते. तसेच शस्त्रक्रियेनंतर, रुग्णालयात दाखल केल्यावर पंधरा दिवसांत भरपाई अर्ज (क्लेम) सादर करावा लागतो.
- सर्व रिपोर्टस ,कागदपत्रे डॉक्टरांकडे जाताना आपल्याबरोबर असावीत. त्यासाठी एक मजबूत ज्युटची बॅग किंवा हॅवरसॅक बरोबर असावी.
- आपण कुठल्या हॉस्पिटलमधे उपचार घेतो हेही फार महत्त्वाचे आहे. अलीकडे शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी छोट्या हॉस्पिटलमध्येही केली जाते. पण इतक्या मोठया रोगाच्या रुग्णाला उपचार देण्याइतपत ते हॉस्पिटल सक्षम आहे का ह्याची खात्री करुन घ्यावी. तिथे आपल्या माहितीतील कुुणी उपचार घेतले असतील तर त्यांचे बरे-वाईट अनुभव नीट ऐकून घ्यावेत.
- ते हॉस्पिटल आधी पाहून घ्यावे. तिथे नेहमी अशा प्रकारचे उपचार केले जातात याची खात्री करुन घ्यावी. तिथल्या सोयी, स्टाफ, डॉक्टारांच्या वेळा, पेशंटच्या खाण्यापिण्याची सोय, नातेवाईंकांना राहण्याची सोय इ. ची चौकशी करावी.
- उपचारांना साधारणपणे किती खर्च येणार आहे. पैसे भरण्याची पद्धत म्हणजे कॅश, चेक, क्रेडिट कार्ड इ. विचारुन घ्यावे.
- मोठया हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी सवलती असतात. त्यासाठी काही प्रमाणपत्रे लागतात. त्यांची चौकशी करावी.
या लेखात आपण कॅन्सरचे निदान झाल्यावर करायची तयारी आणि शस्त्रक्रियेदरम्यान घ्यायची काळजी याची चर्चा केली. किमोथेरपी आणि रेडिएशन याबद्दल अधिक माहिती पुढच्या लेखांत पाहू.
©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
xt
