“कॅन्सर म्हणजे काय”
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
“शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर…”
आपल्या शरीरामधे अनेक प्रकारच्या पेशी आहेत. कॅन्सर हा शरीरातील कुठल्याही अवयवाला ,पेशीला होऊ शकतो. शरीरातील कुठल्या अवयवाला व त्यातील कुठल्या प्रकारच्या पेशीला कॅन्सर झाला आहे त्यावरून त्याचे प्रकार ठरतात. कॅन्सरचे १०० हून अधिक प्रकार आहेत. उदा. स्तनाचा , यकृताचा, फुफ्फुसाचा, आतड्याचा, बीजांडाचा कॅन्सर इ. एका अवयवाचा कॅन्सर दुसरीकडे पसरला तरी तो मूळ नावानेच ओळखला जातो. उदा. स्तनाचा कॅन्सर फुफ्फुसात पसरला तरी तो स्तनाचा कॅन्सर म्हणूनच ओळखला जातो.
आता कर्करोग कसा होतो ते आपण पाहू …
आपले शरीर हे अनेकविध पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक प्रकारच्या पेशींचे एक जीवनचक्र ठरलेले असते. मूलपेशींचे (Stem cells) विभाजन (Cell division) होऊन नवीन पेशी बनतात. त्यांची वाढ होते. विशिष्ट प्रकारचे काम करण्यासाठी या पेशींना तयार केले जाते (Differentiation). या परिपक्व (Matured) पेशी आपले निर्धारित कार्य करतात. उदाहरणार्थ त्वचेच्या पेशींचे कार्य वेगळे, डोळ्यातील बुब्बुळांच्या पेशींचे कार्य वेगळे. विशिष्ट काळानंतर पेशींचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो (apoptosis).
प्रत्येक प्रकारच्या पेशींचे आयुष्य किती हे ठरलेले असते. उदाहरणार्थ पांढऱ्या पेशींचे आयुष्य हे १३ ते २० दिवसांचे असते तर त्वचेच्या पेशींचे आयुष्य २-३ आठवडे असते. या सर्व क्रिया आपल्या जनुकांद्वारे नियंत्रित (DNA) केल्या जातात. काही कारणांमुळे आपल्या जनुकांमध्ये बदल होतो आणि या क्रियांमध्ये व्यत्यय येतो. परिणामी पेशींचे अनियंत्रित विभाजन होते. निर्माण झालेल्या पेशींची वाढ नीट होत नाही. पेशी आपले निर्धारित कार्य करत नाहीत आणि नैसर्गिकरित्या मृत्यूही पावत नाहीत. अनिर्बंधपणे वाढणाऱ्या पेशींची एक गांठ किंवा ट्यूमर बनतो. ट्यूमर हा उपद्रवी (Malignant) किंवा निरुपद्रवी (Benign) असू शकतो. काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये ट्यूमर नसतो. उदाहरणार्थ रक्ताचा कर्करोग.
कर्करोग शरीरात कुठेही आणि कधीही उद्भवू शकतो. कर्करोगाच्या दोन वैशिष्टयांमुळे त्याचे स्वरूप भयानक होते. एक Angiogenesis आणि दुसरे Metastasis.
1.Angiogenesis:
ट्यूमरमधुन नवनवीन रक्तवाहिन्या उगम पावून आजुबाजुच्या अवयवांमधे शिरतात. या रक्तवाहिन्यांमधून ट्युमर आजूबाजूच्या पेशींमधून पोषण मिळवितो. त्यामुळे बाधित अवयव/पेशी आपले नियोजित काम करू शकत नाहीत किंवा ह्रास पावू लागतात. उदाहरणार्थ यकृतामध्ये असलेला ट्यूमर, यकृताचे काम बाधित करतो. मेंदूमधे असलेला ट्यूमर मेंदूच्या त्या भागाच्या कार्यात व्यत्यय आणतो. पर्यायाने सर्व शरीरावर याचा परिणाम होतो. रुग्ण खंगू लागतो आणि आपले दैनंदिन व्यवहार करू शकत नाही.
2. Metastasis:
कर्करोगच्या पेशी मूळ ट्यूमरपासून सुटून रक्तवाहिन्यांमधून किंवा रसवाहिन्यांमधून (Lymphatic system) शरीरातील दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. या दुसऱ्या ठिकाणी अगदी कर्करोगाच्या एका पेशीपासूनही नवीन टूयमर तयार होऊ शकतो. अश्या रीतीने कर्करोग शरीरात कुठेही आणि कितीही ठिकाणी पसरू शकतो.
आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये अशा अनिर्बंधपणे वाढणार्या कॅन्सरच्या पेशी असतात पण आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती यंत्रणा त्यांना ओळखून नष्ट करते. काही कारणांमुळे ही प्रतिकारशक्ती यंत्रणा निष्क्रिय झाली की या पेशी मोकाट सुटतात. त्यांचा ट्यूमर बनतो आणि आपल्याला कर्करोग होतो.
कॅन्सर आणि त्याच्या उपचारांचा इतिहास :
मानवाला प्राचीन काळापासून कर्करोग माहित आहे. कर्करोगाचा पहिला उल्लेख इजिप्तमधे इ.स. पूर्व १६०० मधे आढळतो. आयुर्वेदात कॅन्सर ह्या व्याधीचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. मात्र कॅन्सरच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या अनेक व्याधींचे वर्णन केले आहे. शरीराच्या अनेक भागात दुष्ट व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट अर्बुद, दुष्ट नाडी व्रण, रस-रक्त-धातुगत ज्वर इत्यादी व्याधींचे उल्लेख आढळतात.
आधुनिक वैद्यकाचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रटस (इ.स. पूर्व ४६०-३७०) लाही अनेक प्रकारचे कर्करोग माहित होते. हिप्पोक्रटासच्या मते मानवी शरीरात चार प्रकारचे द्रव असतात. रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त. या चारही द्रव्यांचा समतोल चांगले आरोग्य प्रदान करतो. तर अधिक मात्रेतील काळे पित्त कर्करोगाला आमंत्रण देते. हिप्पोक्रटस चा हा सिद्धांत अगदी मध्ययुगापर्यंत कायम होता.
१८ व्या शतकात सूक्ष्मदर्शकाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आणि कॅन्सर बद्दल नवनवीन माहिती उजेडात येऊ लागली. १८३८ मध्ये जर्मन पॅथॉलॉजिस्ट जॉन मूल्लर याने दाखविले की (कॅन्सर) ट्यूमर हा पेशींचा बनलेला असतो. १८६० मधे जर्मन सर्जन कार्ल थ्रीरच याने सुचविले की कॅन्सर शरीरातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.
कर्करोगजन्य पदार्थ/परिस्थिती आणि कर्करोग यांचाही संबंध हळूहळू स्पष्ट होऊ लागला. डॉ. जॉन हिल ने तंबाखू ओढल्यामुळे नाकाचा कॅन्सर होतो हे दाखवून दिले. ब्रिटनमध्ये धुरांडी साफ करणाऱ्यांना एक प्रकारचा वृषणांचा कॅन्सर होतो हे समजले.
किमोथेरपीचा इतिहास
एकोणीसाव्या शतकापर्यंत कॅन्सरवर शस्त्रक्रिया हाच उपाय ज्ञात होता परंतु त्याचे यश मर्यादितच होते. दुसऱ्या महायुद्धात ‘मस्टर्ड गॅस’ चा मारा झालेल्या नौसैनिकांमध्ये रक्तातील पेशींमध्ये अनेक बदल झालेले आढळले. त्यावर उपाय शोधतांना शास्रज्ञाना नायट्रोजन मस्टर्ड नावाचे एक संयुग मिळाले. हे संयुग लिंफोमा वर (एक प्रकारचा कॅन्सर) खूपच प्रभावशाली होते. बोस्टन च्या डॉ. सिडनी फरबर यांनी अमायनोप्टेरिनचा (फॉलिक ऍसिड च्या कुळातील) ब्लड कॅन्सर झालेल्या लहान मुलांवर प्रयोग केला. त्यात डॉ. फरबर ह्यांना चांगलेच यश मिळाले. या शोधांमुळे उत्साहीत होत संशोधकांनी नवनवीन औषधांचा/रसायनांचा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी शोध लावला. ही औषधे पेशींची वाढ आणि विभाजन कुठल्या ना कुठल्या स्तिथीत थांबवत होती. १९५६ मध्ये पहिल्यांदा शरीरात पसरणारा कॅन्सर मिथोट्रेकझेट या औषधाने बरा करण्यात आला. साठच्या दशकात लहान मुलांच्या ब्लड कॅन्सरवर यशस्वी औषधे मिळाली तर सत्तरच्या दशकात वृषणाच्या कॅन्सरवर उपाय मिळाले.
२१ व्या शतकात तर मोठीच क्रांती झाली आहे. दोन किंवा अधिक औषधांचा वापर किमोसाठी होत आहे.
फक्त कॅन्सरच्याच पेशींना टिपून नष्ट करणारी औषधे आली आहेत. त्यामुळे साईड इफेक्ट्स कमी होत आहेत. भविष्यात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य मात्रेत औषधे कॅन्सर पेशींपर्यंत पोहचवली जातील.
रेडिएशनचा इतिहास
१८९५ मध्ये एक्स रे चा शोध लागल्यानंतर संशोधकांच्या लवकरच लक्षात आले की एक्स रे चा वापर शरीरावरील गाठी, व्रणांवर उत्तम प्रकारे करता येतो. १८९६ पासून अनेक डॉक्टरांनी कॅन्सरवर उपचारासाठी म्हणून एक्स रे चा उपयोग सुरु केला. Henri Coutard हा फ्रेंच संशोधक आधुनिक रेडिएशन ट्रीटमेंटचा जनक मानला जातो. १९१९ मध्ये इतर संशोधकांच्या साहाय्याने त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ परिस मध्ये रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. रोज स्वल्प मात्रेत अनेक आठवड्यांपर्यंत रुग्णाला रेडिएशन देण्याची (protracted fractional method) पद्धत त्यांनी सुरु केली.
१९११ मध्ये किरणोत्सर्गी आयोडीन विकसित केले गेले.
आतापर्यंत आपण कॅन्सरची सर्वसाधारण माहिती घेतली. यापुढील लेखात आपण कॅन्सरची लक्षणे जाणून घेऊया.
©डॉ. ऋजुता कुशलकर
