Sweet & Sour Mango Curry (आंब्याचे बाठोणे )
आंब्याचे बाठोणे
आंबा म्हणजे फळांचा राजा. थंडीत मोहोर घमघमायला लागला की तेव्हा पासूनच केशरी – पिवळ्याधम्मक आंब्याच्या मधूर आठवणी पंचेंद्रियांवर गारुड करतात. कापून खायचे आंबे आणि चोखून खायचे आंबे असे आंब्याचे दोन मुख्य गट. चोखून खायच्या रसदार आंब्यांपासून भातावर घेण्यासाठी बाठोणे बनवतात. कोकणात याला रायतं म्हणतात, कारवारकडे सासव तर मराठवाड्यात कायरस. अशी ही सर्वव्यापी पाककृती आहे.
छोट्या कैऱ्या झाडाला लगडल्यापासून बाळगोपाळांचे बारीक लक्ष असते. राखणदाराची , त्या घरातल्या लोकांची नजर चुकवून मुले कैऱ्या, आंबे पाडतात. खिसे भरून आणलेला माल मोठ्या अभिमानाने आजी आईला दिला जातो. त्याही माउल्या कच्च्या , पिक्या आंब्यांचे विविध पदार्थ करतात. हे पदार्थ खाताना चेहर्यावर आनंद फाकतो, बहुधा एक डोळा मिटतो आणि तोंडाने टॉक असा आवाज होतो.
चार पैसे जास्त मिळतात म्हणून आजकाल शेतकरी हे रसाच्या आंब्याची झाडे काढून हापूस आंब्याची लागवड करत आहेत. या स्थानिक प्रजातींनी त्या ठिकाणच्या हवामानाशी , परिसंस्थेशी जुळवून घेतलेले असते. रोगांनाही त्या समर्थपणे टक्कर देऊ शकतात. जैवविविधतेत मोलाची भर घालतात. या जैवविविधतेमुळे आपल्याला नानपरीच्या भाज्या, धान्ये, फळे खायला मिळतात.
तेव्हा या उन्हाळ्यात जिव्हेला रुचि आणण्यासाठी तर हे आंबटगोड बाठोणे बनवाच पण आपल्या मुलानातवंडांच्या समृद्ध उद्यासाठी, जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी हे बाठोणे जरुरच बनवा.
आपण जे खातो त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होत असतात !
