सुकेशिनी

 डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

किमोथेरपीत केस जातात म्हणून अनेक जण घायाळ होतात. पण सकारात्मक मन त्या वास्तवाला कसे सामोरे जाऊ शकते, हे या ह्रद्य मनोगतातून व्यक्त होते.

…. आणि माझ्या मऊ, मुलायम, काळ्यात किंचित लालसर छटा असलेल्या, स्टाइलमध्ये कापलेल्या केसांकडे पाहून डॉक्टरांनी एक निःश्वास सोडला. ‘ You will lose your hair’ ते हळुवारपणे म्हणाले. ‘I don’t care’ मीही बाणेदारपणे उत्तर दिले. या आजारातून बरे होण्यासाठी केसांची आहुती देण्याची माझी तयारी होती.

लोक उगाच किमोथेरपीत केस जाण्याला घाबरतात. तुमच्या जीव वाचत असेल तर केस गेले तर काय हरकत आहे? काहीतरी गमावल्याशिवाय काहीतरी मिळत नाही; हीच जगाची रीत आहे. इथे  तर आपल्या प्राणासारखी ब्रह्मांडातील अनमोल चीज! टक्कल असलेली माणसे काय कमी सुंदर दिसतात का? किती रुबाबदारपणे राहतात ती. पिक्चरमध्ये, सिरीयलमध्ये, आपल्या आजूबाजूला कितीतरी टकलू माणसे दिसतात. कुठे इतकं विचित्र वाटतं! त्यामुळे टक्कलाला अजिबात घाबरायचं नाही, असं मी मनाशी ठाम ठरवून टाकलं.

दुसर्‍या दिवशी किमोथेरपीच्या पहिल्या सायकलसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. तीन दिवसांनी ५१ इंजेक्शन आणि सलाईनच्या १५ बाटल्या शरीरात रिचवून मी घरी आले. पुढचे सहा दिवस काहीच झाले नाही. केस थोडेसे  निस्तेज झाल्यासारखे वाटले, पण बाकीचा त्रासच इतका होता की, केसांकडे पाहायला वेळ आणि भान दोन्हीही नव्हते.

मग ‘किमो’ चालू केल्यानंतरचा दहावा दिवस उजाडला. आंघोळ करताना बरेच छोटे-छोटे केस पाण्याबरोबर वाहत गेले. मी फारसे लक्ष दिले नाही. आंघोळ करून केस विचरायला बसले आणि … (इथे सांस-बहु मालिकांत वाजवतात तसे ढंच्याक-ढींच्याक म्युझिक आणि वेगवेगळ्या किंवा त्याच भावमुद्रेतील स्टील फोटो टाकायला हरकत नाही)… कंगव्यात केस निघाले. नंतर जितक्या वेळा डोक्यावरून कंगवा फिरवला तितक्या वेळा कंगवा भरभरून केस गेले. काहीही तक्रार न करता, वेदना न देता, शिशिर ऋतूच्या आगमनानंतर झाडावरची पाने हळूच गळून पडतात, तसे माझे केस गळू लागले. मी स्तिमित होऊन पाहात राहिले. थोडेस घाबरूनच केस विंचरणे बंद केले. संध्याकाळी केस विंचरताना सकाळचीच पुनरावृत्ती झाली. रात्री भाऊ घरी आला तर म्हणाला, ‘अगं ताई, तुझा भांग केवढा मोठा झालाय.’ मी कसंनुसं हसले. कॅन्सर-कॅन्सर म्हणजे काय, याचे दाहक चटके बसायला सुरुवात झाली होती.

अकरावा दिवस- कालच्यासारखेच खूप, खूप केस जाऊ लागले. ते कचर्‍यात कुणाला दिसू नयेत म्हणून मी धोरणीपणाने पेपरमध्ये गुंडाळून फेकले. उशीवर, बिछान्यावर, माझ्या खोलीत जमिनीवर सगळीकडे केसांचे साम्राज्य पसरले. ते केस गोळा करून कागदात गुंडाळणे हा माझा दिवसभराचा एक उद्योगच झाला. केसांची घनता एवढी कमी झाली की, केसांमधून डोक्याची त्वचा दिसू लागली.

बारावा दिवस- साठ टक्के केस गेले. आई पाहून न पाहिल्यासारखं करत होती. मी ‘किमो’ घेते आहे याचा धक्का बसेल म्हणून तिला स्पष्ट कल्पना दिली नव्हती. माझे ट्यूमरचे निदान, ओपन हार्ट सर्जरीप्रमाणे असणारी मेजर सर्जरी, ट्यूमरचे उपद्रवी (malignant) झालेले निदान- या सगळ्या घटना केवळ पंधरा-वीस दिवसांत घडल्या होत्या. तोच आई-बाबांसाठी एक मोठा धक्का होता.‘ट्यूमर पूर्णपणे काढता आला नाही. तो विरघळवायला हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यावी लागतील,’ असे सौम्य रूप आम्ही दोघांनी किमोथेरपीला दिले होते. केस जाताना पाहून अंधार्‍या रात्री रोरावणार्‍या थंडगार, बोचर्‍या वार्‍यासारखे वास्तव आईच्या अंगावर आदळले. आपल्या तरुण मुलीची ती दशा स्वीकारायला तिचे मातृह्दय काही तयार होईना! दिवसभर ती माझ्या डोक्याकडे पाहायचे निक्षून टाळू लागली.

तेरावा दिवस- कोंबडे कितीही झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहतो थोडाच! कितीही लक्ष दिले नाही म्हणून केस जायचे राहणार थोडेच! संध्याकाळपर्यंत चांगले ज्वालामुखीच्या विवरासारखे टक्कल पडले. दहा टक्के केस फॉक्रच्या फ्रिलसारखे माझे डोके सुशोभित करू लागले. आई कुरकुरायला लागली की तू केस इतके जोरात कशाला विंचरतेस?

चौदावा दिवस- भर एप्रिलमधला मुंबईतला सुखद उकाडा चालू होता! खूप गरम व्हायला लागले. म्हटले आज जरा केसांवरून न्हाऊ. डोक्यावर पाणी घातले आणि काय आश्चर्य! ‘इक हवा का झोका आया टूटा डाली से फूल, टूटा डाली से फूल|’ असे झाले. डोक्यावरचे उरलेले केस पाण्याबरोबर वाहून गेले! माझ्या आजारावरून माझ्या केसांना ओवाळून टाकले!

डोक्यावरच्या या बहुसंख्याक केसांच्या गडबडीत अंगावर इतरत्र असलेल्या अल्पसंख्याक केसांकडे लक्ष द्यायला गेले चार दिवस वेळच मिळाला नव्हता. सहज आरशात पाहिले तर फार विचित्र दिसत होते. काय ते कळेना. थोड्याच वेळात डोक्यात प्रकाश पडला. (केस गेल्याने प्रकाशाला ही आता कमी अडथळा होतो आत जायला.) भुवयांचे आणि पापणीचेही केस गेले होते! इतकेच काय, अंगावरचे इतर ठिकाणचेही केस गायब! ‘किमो’ ची औषधे अगदी ‘अहर्निश आपल्या सेवेसाठी’ असल्यासारखी झपाटून काम करत होती. ओठ व नखांसकट सर्व अंगावरची त्वचा काळी पडली. डोळे निर्जीव झाले. त्यातली चमकच हरवली. काळवंडलेल्या चेहर्‍यावर हास्यही भेसूर दिसू लागले. म्हणजे इतके टक्कल पडूनही मी त्या मालिकांमधल्या किंवा पिक्चरमधल्या पात्रांसारखी उठावदार दिसतच नव्हते! उलट रामसेच्या पिक्चरमध्ये जो डरावना चेहरा असतो, तसा माझा चेहरा मेकपशिवाय दिसत होता. माणूस शिकतो तो अशावेळी! जेव्हा काळ्याभोर भुवया, लांबसडक पापण्या, चमकदार डोळे असतात आणि मुख्य म्हणजे शरीर निरोगी असते, तेव्हाच ते टक्कलही सुंदर दिसते! माझे हे बदलेले स्वरूप पाहून घरी अचानक आलेले सुहृद डोळ्यांतले पाणी लपवायला लागले. बाकीचे लोक डोळे विस्फारुन तर्ककुतर्क करू लागले. या दोन टोकांच्या नजरांची हळूहळू सवय होऊ लागली. पण घरातल्या सगळ्यांनी हसतमुखाने, धीराने हे टक्कल स्वीकारले.

कमलेश माझा बेटर हाफ मला म्हणाला, ‘तू या आजारातून बरी होणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. केस असणे-नसणे दुय्यम.’

‘तुझी ट्रीटमेंट संपली म्हणजे ब्राह्मी, माका घालून तेल तयार करून तुझ्या डोक्याला लावू. परत छान केस येतील,’ इति आई.

भावाच्या छोट्या छकुलीला (वय सहा महिने) मी सगळ्यात प्रिय होते, कारण घरात आम्ही दोघीच टकलू होतो!

माझा छोटा चार वर्षांचा मुलगा धावत येऊन त्याच्या मऊ हाताने मला मिठी मारायचा आणि त्याचे गोबरे गाल माझ्या गालावर घासत म्हणायचा, ‘आई, तू किती सुंदर दिसतेस. मला खूप आवडतेस.’ सौंदर्यं हे बघणार्‍यांच्या डोळ्यात असते हेच खरे!

थोड्या दिवसांनी माझी बहीण तिच्या दोन मुलींना (चिनू-वय वर्षे सात आणि अमू-वय वर्षे दोन) घेऊन आली. काही चुकार अर्धा टक्के केस ठाणे लढवत होते. त्यामुळे मोठीला कळेना हे नक्की काय झालेय? मी झोपलेले असताना चिनू दोन-चार वेळा येऊन माझ्या डोक्याला हात लावून गेली. बायकांना टक्कल पडलेले तिने कधी पाहिले नव्हते.

धाकटी अमूही दोन-चार वेळा तिच्या आईची नजर चुकवून माझ्याकडे येऊन गेली. गोड हसून गेली. बारकाईने मला निरखत ती बोबड्या वाणीने म्हणाली, ‘तुझे केस कापले?’

‘हो’ कल्पनेची गंमत वाटून मी मान डोलावली.

‘माझेपण कापलेले’. केस कमी म्हणून गेल्या मे महिन्यांत तिचेही टक्कल केले होते.

‘माझे बघ परत आले.’ आपले छोटे-छोटे कुरळे केस दाखवत ती म्हणाली, ‘तुझे पण येतील हं’!

लहान मुलांच्या तोंडून देव बोलतो! माझी किमोथेरपीची सहा सायकल्स संपली. रेडिएशन सुरू व्हायला अजून महिनाभर अवकाश आहे आणि माझ्या टकलाच्या विराण भूमीवर काळ्या-काळ्या सूक्ष्म केसाचे अंकुर दिसू लागले आहेत!

©डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – चतुरंग, लोकसत्ता २ ऑगस्ट २००८

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.

t