बेंगळुरू मधली बदलती घरं
डॉ. ऋजुता कुशलकर
बेंगळुरू तसे पाहायला गेले तर हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन स्थान! होयसळ राजांच्या अमदानीतले. कुणी बल्लाळ नावाचा राजा शिकार करता करता जंगलात चुकला.त्या भुकेलेल्या राजाला एका म्हातारीने उकडलेली डाळ, कडधान्य खाऊ घातली, म्हणून राजाने खुश होऊन त्या जागेला नाव दिले बेळें(डाळ), बेंडा (उकडलेली), कालू (कडधान्ये), उरू (गाव)- बेळें बेंडा कालू उरू. उकडलेल्या डाळी कडधान्यांचे गाव. या नावाचा उल्लेख नवव्या शतकातील एका शिलालेखातही सापडतो. त्याचा अपभ्रंश होत ते झाले बेंगळुरू आणि इंग्रजांच्या आमदानीत बेंगलोर.
विजयनगर साम्राज्याचे थोर सेनापती केम्पे गौडा एकदा या ठिकाणी शिकार करत असताना त्यांनी एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. ही खरी पुरुष (पुरुषार्थाची) भूमी म्हणून त्यांनी सन १५३७ मध्ये एक किल्ला बांधला. किल्ल्यात चिकपेठ, बाळेपेठ अशा व्यापारी पेठा वसवल्या. शहाजी राजांना १६३८मधे बेंगुळूरूची जहागीर मिळाली. त्या वेळी राजां बरोबर इथे स्थायिक झालेली आणि कालानुरूप आपला थोडा वेगळा रंग टिकवत स्थानिक संस्कृतीत मिसळून गेलेल्या मराठी जणांची संख्याही बरीच आहे. पुढच्या २५०-३०० वर्षात हे शहर मुघल, म्हैसूर चे वोडीयार राजे, टिपू सुलतान, इंग्रज असे हस्तांतरित होत राहिले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी त्यांच्या शिस्तशीर स्वभावाला अनुसरून शहराचा नियोजनबद्ध विकास केला. मल्लेश्वरम, बसवंगुडीसारखे भाग विकसित केले. घरासाठी अगदी एक एकरापर्यंतचे प्लॉट्स, विस्तृत पदपथ, प्रशस्त रस्ते,उद्याने. सोसा-सोसाने नानापरीची वृक्षसंपदा जोपासणाऱ्या इंग्रजांना साथ मिळाली पुष्पप्रेमी बेंगुळुरवासीयांची. शांत कलासक्त स्थानिक लोकांनी घराभोवतीच नव्हे तर पदपथांवरही बगीचे फुलवले. पाण्याचे नियोजन पूर्वीच्या राजांनी ठिकठिकाणी तलाव बांधून, पाणी जमीनीत मुरण्यासाठी मुबलक पाणथळ जागा ठवून उत्तम केलेले. माणसे, पशुपक्षी, झाडेझुडपे सर्व जण गुण्यागोविंदाने नांदत होते. भरपूर सूर्यप्रकाश,वर्षातून आठ महिने रिमझिमणारा पाऊस, थंड हवामान आणि माणसांनी घेतलेली निगा या सर्व अनुकूल गोष्टी जुळून आल्याने हिरव्या बेंगुळुरुची ख्याती ‘गार्डन सिटी ‘म्हणून व्हायला वेळ लागला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावरही जे पी नगर, सदाशिव नगर, इंदिरा नगर, असे अनेक लेआऊट विकसित झाले. पण मूळ ढाच्याच्या सौंदर्याला धक्का लागला नाही. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत ही स्थिती कायम ठेवायला हातभार लावला तो बेंगळुरूमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संरक्षक दलाचे तळ, संशोधन संस्था यांनी. नेहरूंच्या प्रेरणेने सुरु झालेल्या आणि त्यांच्या सौंदर्य दृष्टीचा वारसा चालवणारी ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे. ऐसपैस जागेत पसरलेली, फुलझाडांनी बहरलेली ,दुर्मिळ वृक्षांनी नटलेली,हिरवळीने आच्छादलेली.
पै पै साठवून नव्याने विकसित होणाऱ्या लेआऊट मध्ये घर बांधणे सामान्य माणसाच्या आवाक्यातील गोष्ट होती. प्रत्येक बंगला सामान्य परिस्थितीतील मालकानेही कालात्मकरीत्या बांधलेला. नेत्रसुखद वास्तुरचना. घराला आतून बाहेरून सुंदर रंग दिलेला. घरे आतूनही चांगलीच प्रशस्त. प्रत्येक घराचे आंगण गृहलक्ष्मीने भल्या सकाळी झाडून, धुऊन काढलेल. त्यावर तांदळाच्या पीठाने काढलेली ठिपक्यांच्या रांगोळी, अणु रेणूच्या कक्षा समान. कुठेही घराला पोपडे आलेत, भेसूर विटा दिसताहेत, रंग विरलाय असे कुरूप दृश्य नाही.
प्रत्येक चांगल्या गोष्टींंना नजर लागते, तसे बेंगळुरूबाबतही झालं. एकेकाळचे धुक्याची शाल ओढून गुलाबी थंडीत सुशेगात झोपणारे शहर, आयटीमुळे जगाच्या नकाशावर झळकले. अमाप पैसा आला. लोकसंख्या वाढू लागली. त्या बरोबर जागांचे भावही वाढू लागले. घराच्या प्लॉट्सचे आकारही आक्रसत गेले. बंगल्यापेक्षा निवासी संकुलांना अधिक पसंती मिळू लागली. घरासाठी नारळीच्या बागा, शेते विकली गेली. तळी,पाणथळ जागा बुजवल्या गेल्या. त्याच बरोबर गेली सुखद थंडी आणि सकाळी चालून येणारे धुक्याचे लोट. झाडे फुले लावायला लोकांना आता वेळ नाही आणि तेवढे प्रेमही नाही. घनकचरा आणि सांडपाण्याचे नियोजन नाही, त्यामुळे जागोजागी असलेल्या निर्मळ तळ्यात आता दुर्गंधीयुक्त निळे पाणी वाहतेय. एका गार्डन सिटीचे रूपांतर काँक्रीटच्या जंगलात होतंय.
विकास नेहमी पर्यावरणावर घाला घालूनच करायला हवा का? ज्या पाश्चात्य देशांुमुळे आयटी क्षेत्र उर्जितावस्थेला आले, त्यांचा आपण या बाबतीत काही आदर्श घेणार आहोत का? आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण काय वारसा ठेवणार ? कॉंक्रीटची जंगले कि निसर्गाच्या हातात हात घालून केलेली वाटचाल?
©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
पूर्व प्रसिद्धी – वास्तुरंग, लोकसत्ता, २४ मार्च २०१२
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
ext
