Satvik Moong Vegetable (मूगाची उपवासाची भाजी)
आषाढ- श्रावण महिना आला म्हणजे सणवार , व्रतवैकल्ये, उपवास सुरु होतात. उपवास म्हणजे उप+वास. देवाच्या जवळ राहाणे. परमात्म्याशी तद्रुप होणे. यासाठी हलका आहार घेणे अपेक्षित आहे. परंतु उपवासाला साबुदाणा खिचडी, वडे असा तेलकट,जड आहार खाऊन पित्त मात्र उफाळते. त्याउलट वरीचा भात, मूगाची उपवासाची भाजी, भोपळ्याचे भरीत, राजगिर्याचेपीठ – रताळ्याचे थालीपिठ, ताक, लिंबाचे गोड लोणचे असा हलका आहार घेतला तर चवीतही बदल होतो आणि पोटालाही आराम मिळतो. जैन धर्मियही खूप दिवसांचे उपवास मूगाचे पाणी किंवा उकडलेले मूग घेउन सोडतात आणि मग हळूहळू नेहमीचा आहार घेतात.
केमोथेरेपी मधे कर्करोगाच्या पेशींबरोबर चांगल्या पेशींचाही नाश होतो किंवा नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा नवीन पेशींच्या निर्मिती साठी प्रथिनांची गरज लागते. म्हणून कर्करोग रुग्णांची ट्रीटमेंट चालू असताना डाॅक्टर हाय प्रोटीन डाएट घ्यायला सांगतात.
शाकाहारी जेवणात डाळी आणि कडधान्ये यांमधून प्रथिनांचा चांगला पुरवठा होतो. मूग-मसूर हे पचायला हलके परंतु राजमा, छोले, वाटाणे, पावटे इ. कडधान्ये पचायला जड. खाल्लयावर खूप गॅसेस होतात. म्हणून शक्यतो रुग्णांनी मूग-मसूर खावे.
आजारपणात भूक मंदावते, पचन नीट होत नाही. आयुर्वेदानुसार मूग जठराग्नी वाढवतात. हातसडीचा लाल तांदूळ आणि मूग हे रुग्णाच्या पोषणासाठी उत्कृष्ट मानले जातात.
ही मूगाची सात्विक भाजी बनत असतानाच साजुक तूप आणि जिर्याचा दरवळ भूक चाळवून जातो
