ऋणानुबंधाच्या गाठी

                                           डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

कुठलंही नातं वा ओळखपाळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करणार्‍या दाम्पत्याची कहाणी. तसेच ही साखळी अविरत राखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या माणसांचीही….

अठ्ठावीस वर्षांच्या गौराम्मांची मोठी लगबग उडालेली. कुटुंबही मोठं. पती सिद्धप्पा बंगलोरमधील मोठे नामांकित वकील. सुसंस्कृत, हुशार, श्रीमंत खानदानी कुटुंब. तीन मुली, एक मुलगा. धाकटी श्वेता तर अवघी दोन वर्षांची. शाळेत जाणारी मुले, तान्ही श्वेता, कोर्टात जाणार यजमान, पै-पाहुणे, नातेवाईक यांची सरबराई करता करता दिवस कसा सरे हेच गौराम्मांना कळत नसे. सर्व कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं. आताही सुजाता, अनिता, सुनील शाळेतून परत यायची वेळ झाली होती. त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवले होते. दुपारी खायला उपमा, गुलाबजामून बनवून ठेवले होते. धाकट्या श्वेताकडे पाहायला म्हणून आईला बोलावले होते. जरा डॉक्टरकडे जायचं होतं. गळ्याशी छोटी गाठ आली होती. दोन-तीन तासांचं तर काम. गौराम्मांनी सर्व  आवराआवर नजरेखालून घातली आणि यजमानांबरोबर त्या डॉक्टरकडे गेल्या.

डॉक्टरांनी तपासलं. तातडीने काही चाचण्या केल्या. त्यांचा चेहरा गंभीर झाला. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. त्या सावळ्या तजेलदार तरुणीला आणि तिच्या कर्तबगार विद्वान पतीला काय सांगावे हेच कळेना. त्या तरुण दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. गौराम्मांच्या डोळ्यासमोर त्यांची लहान-लहान पिल्ले आली. कसं होणार या पिल्लांचं? संध्याकाळी परतू म्हणून निघालेल्या गौराम्मा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या. लगेचच ऑपरेशन झाले. Papillary Carcinoma of Thyroid. थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असे निदान झाले. आता मात्र ‘टाटा’ शिवाय पर्याय नव्हता. किरणोत्सर्गी आयोडीनचे उपचार करावे लागणार होते. किरणोत्सर्गी आयोडीन घेतले की पेशंट स्वतःच किरणोत्सर्गी बनतो. म्हणून त्याला शिशाच्या भिंती असलेल्या खोलीत वेगळेच ठेवतात. आत जाण्याची परवानगी कुणालाच नसते. जेवणाचे ताटही फटीतून आत सरकवले जाते. १०-१५ दिवस अगदी एकांतवासाची शिक्षा!

गौराम्मांना टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून सिद्धप्पांनी जवळच्या हॉटेलमध्ये मुक्काम टाकला. सिद्धप्पा अगदी सैरभैर झालेले. बायकोला असा जीवघेणा आजार झालेला. भविष्य सारे अंधकारमय. त्यात या अफाट मुंबई महानगरीत कुण्णी म्हणून ओळखीचे नाही. सुखदुःखाच्या दोन गोष्टी बोलायलाही कुणी नाही. वेळ घालवायला म्हणून अस्थिर मनाने त्यांनी लोकल ट्रेनचे तिकीट काढले. बोरीवली-परळ-चर्चगेट अशा फेर्‍या मारू लागले. ट्रेनमध्ये समोर बसलेल्या एका अनोळखी माणसाने त्यांच्या मनाची चलबिचल ओळखली. ‘‘का तुम्ही इतके अस्वस्थ आहात? काय झालं?’’ आपुलकीच्या त्या दोन शब्दांनी सिद्धप्पांचा बांध फुटला. रुद्ध कंठाने त्यांनी आपली कर्मकहाणी ऐकवली. त्यावेळी सिद्धप्पांना कल्पनाच नव्हती की, प्रत्यक्ष देवच त्यांच्यासाठी अशोक जावकर हे नाव धारण करून समोर बसला होता. सिद्धप्पांची कहाणी ऐकून जावकरांचे हृदय हेलावले. ‘‘अरेरे, फार वाईट वाटले.’’ अशी कोरडी सहानुभूती दाखवून आपल्या स्टेशनवर उतरून जाणे  जावकरांच्या स्वभावात बसणारे नव्हते. आपल्या चार मुलांच्या आईला वाचविण्याची धडपड करणार्‍या त्या भल्या माणसाला आपण काहीतरी मदत करावी असे त्यांना वाटले. ‘कशाला हॉटेलमध्ये एकटेच राहता या अनोळखी शहरात’? जावकर सिद्धप्पांना म्हणाले, ‘माझे घर टाटा हॉस्पिटलच्या समोरच आहे. तुम्ही माझ्याकडे राहा. हॉस्पिटलमध्ये फेर्‍या मारणे सोपे जाईल. मीही थोडीफार मदत करू शकेन.’ ठकसेनांच्या महानगरीत अनोळखी माणसावर विश्वास कसा ठेवावा या विचाराने नको नको म्हणार्‍या सिद्धप्पांना बळेबळेच ते आपल्या घरी घेऊन गेले. शैला जावकरदेखील अशा परोपकारी नवर्‍याला शोभेशा सहचारिणी! एकही प्रश्न न विचारता त्यांनी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत केले. आपला नवरा करणार ते योग्यच करणार हा त्यांचा गाढ विश्वास. असे दाम्पत्य विरळाच!

त्या दिवसापासून मराठमोळ्या जावकरांनी कानडी सिद्धप्पांना आपले जिवलग मानले. निरपेक्ष स्नेहाला भाषेचा, प्रांताचा कधीच अडसर आला नाही! जावकर दाम्पत्याने सख्खे नातेवाईक करणार नाहीत अशी मदत सिद्धप्पांना केली. गौराम्मा हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत ते सिद्धप्पांना काहीही कमी पडू देत नसत. गौराम्मा हॉस्पिटलमधून परतल्या की लगेचच बंगलोरला जायच्या परिस्थितीत नसत. आपले नेहमीचे जेवणही जात नसे त्यांना. जावकर काकू गौराम्मांसाठी वेगवेगळ्या भाज्यांचे, कडधान्यांचे, डाळीचे सूप बनवत. त्यांना प्रेमाने थोडे थोडे भरवत. गौराम्मा जरा हिंडू-फिरू लागल्या की बंगलोरला परत जात.

सुरुवातीला दर तीन महिन्यांनी, मग सहा महिन्यांनी, मग वर्षांनी अशी तब्बल बारा वर्षे (१९८३-११९५) हे उपचारसत्र चालू होते. घरी दोन दिवस आलेले पाहुणे तिसर्‍या दिवशी कधी परत जाणार अशी आपण सामान्यजन वाट पाहतो. इथे तर वर्षानुवर्षं जावकर दाम्पत्याने गौराम्मांची सेवा केली. आपल्या कच्चाबच्च्यांना कधी या नातेवाइकाकडे तर कधी त्या मोलकरणीवर टाकून, कामकाज सोडून सिद्धप्पा गौराम्मांना घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये येत. हताशपणे बायकोच्या यातना पाहत असत. या काळात जावकर दाम्पत्य त्यांच्यामागे पहाडासारखे खंबीरपणे उभे राहिले. पुढे पुढे सगळा प्रपंच वार्‍यावर सोडून येणे सिद्धप्पांना जमेना. तेव्हा ‘घाबरू नका. ‘टाटा’ ची आघाडी आम्ही सांभाळू’ असा जावकरांनी धीर दिला.
मग ‘टाटा’ मध्ये गौराम्मांसाठी अपॉइंटमेंट घेणं, त्यांना एडमिट  करणं, हॉस्पिटलमधून परतल्यावर त्यांची काळजी घेणं, इत्यादी सर्व कामे जावकरकाका-काकू प्रेमाने कत. उपचारांचा गौराम्मांना खूप त्रास होत असे. मळमळणे, उलट्या होणे, या नित्याच्याच गोष्टी. कॅन्सर रुग्णाची काळजी घेणं हे मोठे जिकिरीचं, संयमाची कसोटी घेणारं काम. सख्खे नातेवाईकसुद्धा पाठ फिरवतात हा सर्वसाधारण अनुभव. जावकर दाम्पत्याने स्वतःची दोन लहान मुले असूनही या गोष्टींचा कधी बाऊ केला नाही. आपल्या लहानुल्यांना अशा किरणोत्सर्गी रुग्णामुळे अपाय होईल ही शंकाही त्यांनी झटकून टाकली. जावकरकाका गौराम्मांना कन्नड मासिके वाचायला आणून देत. गौराम्मांना विरंगुळा मिळावा म्हणून जावकर दाम्पत्य बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत.

मे महिना, दिवाळी, नाताळमध्ये गौराम्मांबरोबर त्यांची चार मुलेही येत. सगळ्यात मोठ्या डॉ. सुजाता त्या दिवसांची आठवण काढत पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात, ‘‘एका छोट्या वन बीएचके घरात आम्ही दोन कुटुंबातली मिळून दहाजण राहत असू, पण जावकर काका-काकूंनी आम्हाला कधीही परकेपणा जाणवू दिला नाही. आमच्याकडून एक पैही त्यांनी घेतली नाही. त्यांच्या या सेवावृत्तीचे मोल पैशात करणं म्हणजे त्यांच्या महानतेचा उपमर्द होईल. बँकेत काम करणार्‍या एकट्या माणसाच्या पगारात काकू हसतमुखाने सर्व सांभाळून न्यायाच्या याचं आता खरंच नवल वाटतं. सुखवस्तू माणसाने आलेल्या अतिथीला जेवू घालणं इतकीही दानत आजकाल उरलेली नाही. अशा काळात जावकर काका-काकूंनी त्यांच्या भाकरीतील अर्धी भाकर आम्हाला दिली. त्यांच्या मुलांचे लाड कमी करून आमची हौसमौज पुरवली. आमच्यासाठी नारायणच नराचे रूप घेऊन आला! अम्माला कॅन्सर झाल्यावर अनेक नातेवाइकांनी आमच्याकडे पाठ फिरवली. अशा वेळी नात्याचे ना गोत्याचे असे जावकर काका-काकू आमचे जीवीचे जिवलग झाले. त्यांचे ऋण कशानेही न फिटणारे. त्यांचे निरपेक्ष, अकृत्रिम प्रेम हेच आमच्यासाठी अनमोल धन!’’

सन २००९. पंचवीस वर्षे कॅन्सरशी झुंज देऊन गौराम्मांनी त्याला शेवटी पराभूत केलं. लेकी-सुना नातंवडानी भरलेल्या घरात त्या बंगलोरला सुखाने नांदत आहेत. मुले इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लवकरच समजूतदार झाली. उत्तम शिकली. सर्व सुवर्णपदक विजेती. डॉ. सुजाता-एम.डी. (पॅथॉलॉजी), डॉ. श्वेता-एम.डी.डी.एम., सुनील-एल.एल.एम., अनिता- सॉफ्टवेअर इंजिनिअर. गौराम्मांच्या संसाराचा मोगरा असा रसरसून बहरला आणि कर्तृत्वाच्या गगनावर वेलू चढला. जावकरकाकांची मुलेही छान शिकली. मुलगा तर इंजिनिअरिंगसाठी बंगलोरला सिद्धाप्पांकडेच राहिला. दोन्ही मुले सॉफ्टवेअर क्षेत्रात शिरली. लग्नं, मुलेबाळे होऊन सगळे मार्गी लागले. मराठमोळ्या जावकर आणि कानडी सिद्धप्पांचे हे एकत्र कुटुंब, फक्त तनाने दोन वेगळ्या शहरात राहणारे. सुखदुःखात, कार्यात, तर कधी अशीच आठवण आली म्हणून दोन्ही कुटुंब मुंबई-बंगलोर अशी जा-ये करीत असतात. सिद्धप्पा आता खूप थकले आहेत, पण जावकरकाकांच्या मुलांच्या वरातीत उत्साहाने नाचले.

असे हे परोपकारी जावकरकाका माझ्या गिरीश काकांचे बँकेतले सहकारी. २००० साली आम्ही दोघे बंगलोरला स्थायिक झालो तेव्हा जावकरकाकांनी आम्हाला सिद्धप्पांच्या ताब्यात दिले. त्या अनोळखी राज्यात सिद्धप्पांच्या कुटुंबाने आम्हाला प्रेमाने सामावून घेतले. पुढे २००६ साली मला कॅन्सर झाल्याचे निदान कळल्यावर डॉ. सुजातादीदीने संपूर्ण बंगलेार हलवलं. ओळखीपाळखी काढून बंगलोरमधील सर्वोत्तम सर्जनची अपॉइंटमेंट मिळवली. प्रत्येेक वेळी डॉक्टरकडे जाताना ती स्वतः आमच्याबरोबर असे. माझ्या शस्त्रक्रियेच्या वेळीसुद्धा ती ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होती. नंतरच्या १५ दिवसांच्या हॉस्पिटल वास्तव्यात ती रोज एक फेरी मारत असे. या आजाराशी झुंजायला जे मानसिक आणि आध्यात्मिक बळ लागते ते मला सुजातादीदीने पुरवले. गौराम्मा रोज माझ्या आणि माझ्या मुलाच्या आठवणीने त्यांच्या भरल्या संसारात डोळे टिपतात. आम्ही पुढील उपचारांसाठी मुंबईला आल्यावर जावकर काका भेटायला आले. ‘‘बाळा लवकर बरी होशील तू.’’ परमेश्वराच्या वत्सल मायेने त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा त्यांच्या डोळ्यात बहुधा गौराम्मा आणि त्यांच्या पिल्लांचे चेहरे तरळत असणार!

अशा देवमाणसांच्या ऋणातून अंशतः उतराई होण्यासाठी आम्ही दोघे इतर कॅन्सर रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंतरात्म्यातील स्नेहाचा हा वेलू असाच वाढू दे. त्याच्या बहराने सर्वांचे आयुष्य उजळून निघू दे.

©डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्व प्रसिद्धी – चतुरंग, लोकसत्ता ७ मे २०११

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवर अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.

wn text