“रेडिएशन” 

डॉ.  ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

कर्करोगाच्या उपचारामधील एक महत्वाचा घटक म्हणजे रेडिएशन थेरपी.  यात एक्स रे, गॅमा रे सारखे किरणोत्सर्गी किरण वापरून कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नष्ट करण्याचा किंवा त्यांची वाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो.

किमो, इम्युनोथेरपी, शस्त्रक्रिया या उपचारांबरोबर रेडिएशन थेरपी वापरली जाते.  कधी कधी रेडिएशन सर्जरी, किमोच्या आधी दिले जाते किंवा नंतर दिले जाते.  कर्करोगाचा प्रकार, ट्युमर चा आकार, स्वरूप, रुग्णाची शारीरिक स्थिती, वेदना इत्यादी अनेक गोष्टींवर रेडिएशनचा वापर कधी केला जाणार हे ठरते.  या सर्व उपचारांचा ट्युमरवर आणि रुग्णावर होणार परिणाम थोड्या थोड्या काळाने पाहून त्याप्रमाणे डॉक्टर उपचारात बदल करत असतात.  कर्करोगाच्या शेवटच्या टप्यात जेंव्हा आजार हाताबाहेर गेलेला असतो तेंव्हा वेदना कमी करण्यासाठीही रेडिएशनचा अतिशय छोट्या मात्रेत उपयोग केला जातो.

रेडिएशन देण्याआधी रुग्णाच्या सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे रिपोर्टसचा सखोल अभ्यास केला जातो.  ट्यूमरच्या आजूबाजूचे अवयव, ट्यूमरमधून जाणाऱ्या रक्तवाहिन्या, मज्जातंतू यांना कमीत कमी हानी पोहचेल अश्या पध्दतीने अतिशय कमी मात्रेत रेडिएशन दिले जाते.

रेडिएशन दोन प्रकारे दिले जाते.

  • शरीराच्या आतून (ब्रॅकिथेरपी) – ब्रॅकिथेरपी मध्ये शरीराच्या आत किरणोत्सर्गी पदार्थ ठेवला जातो.
  • शरीराच्या बाहेरून – जास्तीत जास्त रुग्णांवर बाहेरून रेडिएशन दिले जाते.

कोबाल्ट मशीन आणि लिनीअर अक्सिलेटर मशीन ही दोन प्रकारची मशिन्स रेडिएशन देण्यासाठी वापरली जातात.  कोबाल्ट मशीन मध्ये किरणोत्सर्गी कोबाल्ट असते.  त्यामधून तीव्र ऊर्जेचे गॅमा किरण बाहेर पडतात.  तर लिनीअर अक्सिलेटर मशीनमधून तीव्र ऊर्जेचे एक्स रे बाहेर पडतात.  मात्र रेडिएशनचे किरण साध्या डोळ्यांना दिसत नाही.

रुग्णाला योग्य स्थितीत झोपवून रेडिएशन देणे या सर्वासाठी जास्तीत जास्त ५ ते ६ मिनिटे लागतात.  रेडिएशनचा कोर्स हा एका आठवड्यापासून ते ६ – ७ आठवड्यापर्यंत असू शकतो.  रेडिएशन चालू असताना डॉक्टर वेळोवेळी रुग्णाची तपासणी करतात व त्याप्रमाणे पुढील उपचारांची दिशा ठरवतात.

कर्करोगाच्या पेशी फार जलद गतीने वाढतात.  ज्या भागाला रेडिएशन दिले जाते त्या भागातील पेशी रेडिएशनची तीव्र ऊर्जा शोषून घेतात.  त्यामुळे पेशींचे व त्यातील जनुका़चे मोठे नुकसान होते.  पेशी नीट वाढू शकत नाहीत व त्यांचे विभाजनही होऊ शकत नाही.  अशारितीने जास्तीत जास्त पेशी मेल्या म्हणजे ट्यूमर आक्रसतो आणि कर्करोग बरा होतो किंवा नियंत्रणात राहतो.

तोंड, घसा, गर्भाशय मुख, स्तन, ब्रेन ट्यूमर, लिम्फ नोडस् यांच्या कर्करोगामधे रेडिएशनने खूप फायदा होतो.  मात्र पोट, आतडी, यकृत, स्वादुपिंड यासारख्या कर्करोगात रेडिएशन सहसा दिले जात नाही.

रेडिएशन दिले जात असताना रुग्णाला कुठल्याही प्रकारची वेदना अथवा संवेदना ( उष्णता इ.) जाणवत नाही.  सुरवातीचे ८-१० सिट्टींग्स होईपर्यंत काही दुष्परिणामही जाणवत नाहीत.  मात्र त्यानंतर हळूहळू दुष्परिणाम जाणवायला लागतात.  रेडिएशन थांबल्यानंतर काही दुष्परिणाम हळूहळू कमी होतात तर काही कधीकधी वाढुही शकतात.

 

रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:

१.  नॉशिया, मळमळणे, उलट्या.

२.  अन्नावरची वासना जाणे.

३.  रेडिएशनमुळे अन्ननलिका प्रभावित झाली तर अन्न, पाणी गिळायला त्रास होऊ शकतो.  डॉक्टर हा त्रास कमी करण्यासाठी औषधे देतात.  रेडिएशन संपल्यावर हा त्रास बरा होतो.

५.  अतिसार किंवा बद्धकोष्ठ ( योग्य आहार आणि औषधांनी हा त्रास ही सुसहय होतो ).

६.  अंगाचा दाह होणे.  शरीरात अतिशय उष्णता निर्माण होणे.

७.  अतिशय थकवा येणे.

८.  जीभ, तोंड, गळा, मान या भागांना दिलेल्या रेडिएशनमुळे तिथल्या स्नायूंच्या हालचाली मंदावणे.

गिळायला त्रास होणे.  तोंडाचा दाह होणे, तोंडात व्रण होणे, जिभेला फोड होऊ शकतात.  कधीकधी आवाजातही बदल होऊ शकतो.

९.  छातीला दिलेल्या रेडिएशनमुळे फफ्फुसाला इजा होऊन श्वसनाला त्रास होऊ शकतो.

१०.  मेंदूला दिलेल्या रेडिएशनमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, त्या भागातील केस जाणे इत्यादी होऊ शकते.

११.  कोरडा खोकला येऊ शकतो.

रेडिएशन दरम्यान  घ्यायची काळजी

रेडिएशन साठी आठवड्यातील पाच दिवस दररोज रुग्णालयात जावे लागते.  त्या धावपळीनेही रुग्ण थकून जातो.  जर रेडिएशन शस्रक्रिया आणि किमो नंतर असले तर आधीच थकलेला रुग्ण अजूनच थकतो आणि रेडिएशनची धास्ती घेतो.  दीर्घकाळ चाललेल्या उपचारांमुळे रुग्ण मानसिक दृष्ट्याही दुर्बळ झालेला असतो.  शारीरिक थकव्यामुळे मानसिक  दौर्बल्यही वाढते.

काही सोप्या उपायांमुळे रेडिएशनचा  त्रास कमी होउ शकतो

१.  अंगाचा दाह होतो, उष्णता वाढते यासाठी भरपूर पाणी प्यावे.  दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्यावे.

धने-जिरे, सब्जा, तुळशीचे बी इ.  घालून पाणी प्यावे.  त्याने शरीराला थंडावा येतो.

डायबेटीस नसल्यास घरी बनवलेले आवळा, लिंबू, कोकम सरबत घ्यावे.

२.  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताजे ताक ( सुंठ + जिरे पावडर + हिंग + सैंधव घालून ) दिवसाला २-३ ग्लास प्यावे.)

३.  उलटीची भावना, मळमळणे यासाठी — (आले + लिंबू + सैंधव) घ्यावे.

४.  अतिसार –  ताक, आलं + लिंबू + सैंधव.

५.  बद्धकोष्ठता –  मिक्स व्हेज सूप, इसबगोल, औषधे.

६.  थकवा –  पौष्टीक गोष्टी थोड्या थोड्या खाणे.

७.  पेज, दूध, ताक, सूप, सरबत असे पदार्थ जास्त घेणे.

८.  नाचणी सत्व, रव्याची व तांदळाची खीर अथवा पेज.

९.  काळपटपणा –  काळवंडलेल्या भागावर रेडिएशन संपल्यावर डॉक्टरांच्या सल्लयाने अॅलोवेराचे जेल, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल हलकेच लावावे

१०.  सुती सैल कपडे घालणे.

११.  डॉक्टरना आपल्या समस्या मोकळेपणाने सांगणे.

१२. आतून  तोंड  येणे, तोंड उघडता न येणे यासाठी रेडिएशन संपल्यावर दिवसातून 2-3वेळा  साजूक तूप तोंडाला आतून लावणे.  साजूक तूप + गरम पाण्याच्या गुळण्या करणे.

१३.  बिनतिखट किंवा कमी तिखट, भरपूर भाज्या असलेला रसदार आहार घ्यावा.

तेलकट, तिखट, चमचमीत पदार्थ टाळावेत.  दुधी, शिराळा, लाल भोपळा, कोहळा, काकडी, पालेभाज्या यांचा आहारात जास्त उपयोग करावा.  या भाज्यांनी शरीराला थंडावा येतो,  पोट साफ होते.

१४.  गोड संत्री, मोसंबी, डाळिंब,सफरचंद, उन्हाळ्यात कलिंगड,टरबूज ही फळे जरूर खावीत.

१५.  राजगिराच्या लाह्या, साळीच्या लाह्या दुधात, ताकात घ्याव्यात.

१६.  पित्तशमन – मोरावळा, गुलकंद.

कॅन्सर वरच्या उपचारांमुळे म्हणजे  शस्त्रक्रिया, किमो, रेडिएशन मुळे झालेले साइड इफेक्टस कधीकधी बराच काळ रहातात.  त्यासाठी चिडचिड करू नये, निराश होऊ नये.  डॉक्टरांना मोकळेपणाने आपला त्रास सांगावा.  दुसर्या रुग्णांशी बोलावे.  त्यांच्या कडूनही काही उपयुक्त गोष्टी कळू शकतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शरीराशी, मनाशी संवाद साधावा.  काय केले , काय खाल्ले म्हणजे त्रास होतो हे शोधावे .  त्या गोष्टी आठवणीने टाळ्याव्यात.

त्याच बरोबर कुठल्या गोष्टीने बरे वाटते याचाही शोध घ्यावा.  मनाची उभारी टिकवून ठेवावी.

आतापर्यंतच्या लेखांतून आपण कॅन्सरवरच्या उपचारांबद्दल चर्चा केली.  या पुढच्या लेखात आपण उपचार संपल्यावर परत पूर्वपदाला येण्यासाठी काय करायचे ते पाहू.

©डॉ.  ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.