व्रात्य मुलगा अशी ज्याची ओळख होती, त्या महेशमधल्या प्रचंड ऊर्जेला योग्य दिशा देतानाच, त्याला जागतिक स्तरावरील स्क्वॉश खेळाडू म्हणून घडविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आई-वडिलांच्या परिश्रमाची ही कथा..

महेश हा अंजली आणि दयानंद माणगावकर या दाम्पत्याचा तीन वर्षांचा मुलगा. महाखोडकर, हाताला कायम चाळा. एका जागी स्वस्थ बसणार नाही. त्याला सांभाळायचं म्हणजे मोठं कठीण काम. दयानंदांनी बरेच पैसे खर्च करून नुकतंच घर सुशोभित करून घेतलं होतं, पण छोटय़ा महेशनं बॅटबॉल खेळून घरात बरीच तोडफोड केली.

बाबांनी रागावून दोनचार वेळा मारही दिला; परंतु नंतर बाबांनी एवढय़ाशा जीवाला मारून काय उपयोग? त्याला काय समजतं? असा विचार केला. सुज्ञपणे स्वत:च लहान मुलांच्या मानसिकतेवरची बरीच पुस्तकं घेऊन आले. त्यांचा अभ्यास केला. आपण ज्यांना अति चळवळी मुलं समजतो त्यांच्यात खूप ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा सृजनात्मक रीतीनं निचरा होणं गरजेचं आहे. त्या ऊर्जेला सकारात्मक वळण लावणं आवश्यक आहे, एवढं ज्ञान बाबांना त्या पुस्तकातून मिळालं. शाळेतही महेशच्या चळवळ्या स्वभावाचा शिक्षकांना त्रास होत होता. तेव्हा या अतिरिक्त ऊर्जेचं सर्वागीण व्यवस्थापन दयानंद आणि अंजलीला करायचं होतं.

आई-बाबांनी दोन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे, महेशला कॅसिओ शिकायला पाठवलं. सप्तसुरांनी त्याला बांधून ठेवलं. कॅसिओ वाजविताना रंगून जाऊन तो एका जागी बसू लागला. दुसरी गोष्ट म्हणजे, बोरिवलीतील एका क्लबचं सदस्यत्व घेतलं. महेशचे आई-बाबा दोघेही खेळाडू. दयानंद वेटलिफ्टिंगमधील मुंबई विद्यापीठाचा चॅम्पियन तर अंजली बास्केटबॉल खेळाडू. त्यामुळे खेळाचं जीवनातील महत्त्व दोघांना चांगलंच ठाऊक. रोज संध्याकाळी आई-बाबा घरी आले की, कटाक्षाने महेशला क्लबमध्ये पोहायला नेऊ लागले. छोटय़ा महेशनं पोहण्यात चांगलीच प्रगती केली. त्याची अतिरिक्त ऊर्जा खेळण्यात वापरली जाऊ लागली. घरातली त्याची मस्ती खूपच कमी झाली. दयानंद-अंजलीला हायसं वाटलं. हेच तर त्यांना हवं होतं, पण आयुष्याच्या एका मोठय़ा वळणावर त्यांच्याही नकळत ते झालं  होतं.

महेश आठ वर्षांचा असताना क्लबमध्ये स्क्वॉश नावाचा नवीनच खेळ सुरू झाला. स्क्वॉश म्हणजे काय, त्याचे नियम काय, कसं खेळायचं याबद्दल फारसं कुणालाच माहीत नव्हतं. छोटा महेश पोहायचं सोडून आईची नजर चुकवून स्क्वॉश कसं खेळतात ते भान विसरून पाहू लागला. हट्ट करून न पेलणाऱ्या जड रॅकेटनं खेळू लागला. स्क्वॉश खेळता खेळता तेच त्याचं ध्येय बनलं. नोव्हेंबर २००२ मध्ये तो ज्युनियर गटात महाराष्ट्र स्टेट ओपन टूर्नामेंट खेळला. तो जिंकला नाही, पण खेळला छान! त्याच्या खेळानं अनेक ज्येष्ठ खेळाडूंचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी खेळात आणखी प्रगती करायची असेल तर चांगले प्रशिक्षक हवेत, असं सुचविलं. बॉम्बे जिमखान्याचे प्रशिक्षक रमेश मोरे महेशच्या पायांच्या चपळ हालचालींवर खुश झालेले. त्यांनी महेशला शिकवायचं आनंदानं कबूल केलं. रमेश मोरेंनी महेशकडून खेळाचा पाया मजबूत करून घेतला.

स्क्वॉशचा महेशनं अगदी रात्रंदिवस ध्यास घेतला. शाळेतून घरी आल्यावर कोणीही न सांगता तो पटकन अभ्यास आटोपून घ्यायचा. संध्याकाळी पाच वाजता क्लबमध्ये जायचा. मग दोन-तीन तास सराव, फिटनेस ट्रेनिंग. अंजलीनंही या सर्वाला सक्रिय पाठिंबा दिला. या दरम्यान विविध स्पर्धामधून भाग घेणं सुरूच होतं, पण यश मिळत नव्हतं. दुसऱ्या फेरीत तो नेहमी बाद होत असे. हिरमुसत असे, पण आईनं नेहमी धीर दिला. ‘‘जिंकणं महत्त्वाचं नाही, चांगलं खेळणं महत्त्वाचं. कधीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडशील. तोपर्यंत हिंमत हरायची नाही.’’ दुसऱ्या खेळाडूंचा खेळ अथकपणे बारकाईनं पाहून महेश आपल्या खेळात सुधारणा करत राहिला. शेवटी या दुष्टचक्रातून बाहेर पडायची संधी आली. एका छोटय़ा स्पर्धेत तो दुसरी फेरी जिंकून पुढे गेला. ती स्पर्धाही जिंकली. आत्मविश्वासानं त्यानं नवी भरारी घेतली ती सरळ चेन्नई येथील सब ज्युनियर नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप (२००३) जिंकूनच. त्या वेळी तो अवघा नऊ वर्षांचा होता. ही स्पर्धा जिंकण्याच्या आधी महेशनं बाबांकडं एक वेगळं मागणं मागितलं, ‘‘मी ही स्पर्धा जिंकलो तर मला मलेशियातील स्पर्धा खेळण्याची संधी द्या.’’ या वयात मुलं खाऊ, खेळण्यासाठी हट्ट करतात. हा नऊ वर्षांचा मुलगा जगाआगळा हट्ट करत होता. बाबांनी आनंदानं त्याचा हट्ट पुरविला आणि महेश मलेशियातील ‘पेनांग इंटरनॅशनल ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप’ स्पर्धा (११ वर्षांखालील वयोगट) २००४ मध्ये जिंकला आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा सिलसिला सुरू झाला.

स्क्वॉशनं महेश पुरता झपाटून टाकलं. स्क्वॉशशिवाय त्याला काही दुसरं काही दिसेना. बॉम्बे जिमखान्याचे प्रसिद्ध कोच वामन आपटे यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं. पुढे त्यांच्या शिफारशीमुळं इजिप्तमधील जगप्रसिद्ध कोच आमीर वाही महेशला शिकवू लागले. रोज सरावासाठी तो बोरिवलीहून चर्चगेटला जाऊ लागला. कठोर तपश्चर्येला प्रारंभ झाला. महेशची खेळाप्रतीची निष्ठा पाहून अंजलीनं आपला व्यवसाय बाजूला ठेवला आणि त्याच्या सर्वागीण प्रगतीसाठी ती झटू लागली.  छोटी हॉटप्लेट, कुकर, दोन-चार भांडी, मसाले असा भातुकलीचा संसार बाळगत ट्रेनिंग, स्पर्धासाठी अंजली महेशबरोबर इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, इजिप्त, मलेशिया, भारतातील विविध शहरांमध्ये महिना- दोन महिने संसार मांडू लागली. महेश बर्गर, पिझ्झा असे जंक फूड खात नाही. त्यामुळे त्याच्या पोटात शक्यतो भारतीय पद्धतीचा चौरस, परिपूर्ण आहार जावा म्हणून धडपडू लागली. अंजली महेशची पूर्ण काळजी घेणारी आई, प्रवासाचे तिकीट, व्हिसा, हॉटेल बुकिंग इ.चे आरेखन करणारी ट्रॅव्हल एजंट, ट्रेनिंग-स्पर्धाचे नियोजन सांभाळणारी व्यवस्थापक, त्याच्या खेळाची विश्लेषक, त्याच्या शाळेचा अभ्यास करून घेणारी शिक्षिका, त्याच्या सुखदु:खात वाटेकरी होणारी जीवलग मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावते. जगभरातील खेळाडूंच्या खेळाचा तिनं अभ्यास केला. महेशनं सराव कुठे-कुणाबरोबर करावा याचा विचार तिच्या डोक्यात सतत असतो. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान त्याचे प्रतिस्पर्धी कोण, त्यांचे कच्चे-पक्के दुवे, खेळताना वापरावयाचे डावपेच ते दोन सेट्सच्या मध्ये १० सेकंदाचा ब्रेक असतो तेव्हा महेशला धीर देणं, पुढची व्यूहरचना ठरवणं, सामना संपल्यानंतर त्याच्या क्लांत शरीराला पूर्वपदावर आणणं इतकी ती या सर्वात गुंतलेली असते. गेली दहा वर्षे अंजली ही पूर्णपणे महेशमय आणि स्क्वॉशमय झालेली आहे.

महेश शाळेत फार काळ उपस्थित राहून रूढार्थानं चाकोरीतलं शिक्षण घेऊ शकला नाही. खेळानं त्याला लहान वयातच कुठल्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड द्यायला शिकविलं. अगदी खूप वर्षे पाठराखण करणाऱ्या त्याच्या शाळेनं त्याला दहावीच्या वर्षांत उपस्थितीच्या कारणावरून शाळा सोडायला भाग पाडलं, तरी तो आणि त्याची आई डगमगले नाहीत. खेळावर लक्ष केंद्रित करत त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवलं. २००३ पासून महेश भारतातील ११, १३, १५, १९  या वर्षांखालील वयोगटातील नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकला आहे. या वर्षी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून त्यानं एक विक्रमच केला आहे. १९ वर्षांखालील वयोगटात तो आणखी एक वर्ष खेळू शकेल आणि अजून एका विक्रमाची नोंद त्याच्या नावावर होईल, अशी आपण आशा बाळगूया.

२००४ पासून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरही मलेशिया, कोरिया, जर्मनी, हाँगकाँग, ब्रिटन येथीलही स्क्वॉश स्पर्धा जिंकला आहे. २००९ मध्ये १५ वर्षांखालील वयोगटात महेशनं अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी ब्रिटिश ओपन स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. आतापर्यंत भारतातल्या फक्त एकाच खेळाडूनं ही स्पर्धा जिंकली होती, तो म्हणजे सौरव घोशाल. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा महेश हा भारतातील दुसरा खेळाडू. या स्पर्धेदरम्यान कडाक्याच्या (-३ अंश सेल्शियस) थंडीत महेशची बोटं फुटून रक्तस्राव होऊ लागला. रॅकेट हातात धरणंही मुश्किल झालं. तिथं औषधंही सहजतेनं उपलब्ध होईनात. बाबांनी भारतातून तातडीनं औषधं पाठवली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही मन एकाग्र करून महेशनं ही स्पर्धा जिंकली.

आज १९ वर्षांखालील वयोगटात महेशला भारतात प्रथम मानांकन आहे, तर जगात दुसरं. पुरुष गटात भारतात चौथं मानांकन आहे.

आपल्या चळवळ्या पिल्लावर न रागावता दयानंदांनी शांत डोक्यानं महेशमधील ओसंडणाऱ्या ऊर्जेला खेळाकडे वळवलं. अंजलीनं स्वत:चं आयुष्य मुलाच्या खेळासाठी वाहून घेतलं आणि महेशनं कठोर परिश्रमानं या सर्वाचं चीज केले.

पूर्वप्रकाशित : लोकसत्तामधील लेखाचा दुवा