“मूगडाळीच्या पिठाचे थालीपीठ”

 

खूपदा रुग्णाला काहीतरी चटकमटक खायची इच्छा होते. किंवा थोड्या वेळात काहीतरी पोटभर, पौष्टिक काय बनवून द्यावे हा प्रश्न असतो. त्यासाठी मूगडाळीच्या पिठाचे थालीपिठ हा उत्तम पर्याय आहे.

नेहमी बेसनच्या पिठाचे अनेक चटपटीत पदार्थ केले जातात . परंतु ट्रिटमेंट चालू असताना बेसनाचे पदार्थ रुग्णाला पचत नाहीत. तेंव्हा बेसन ऐवजी मूगडाळीचे पीठ करून ठेवावे. आयत्यावेळी अनेक गोष्टींसाठी उपयोगी येते.

हे थालीपिठ पुदिना चटणी, लोणी किंवा सुक्या चटणी बरोबर खावे. सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा सुप + थालीपिठ असा मेनू रात्रीच्या जेवणासाठीही करू शकता.

पौष्टीक, चविष्ट, पोटभरे आणि थोड्या वेळात होणारे असे हे मुगडाळीचे थालीपिठ.

 

साहित्य:

तांदळाचे पीठ – ¼ वाटी,

मूगडाळीचे पीठ – 1 वाटी,

एक मध्यम बारीक चिरलेला कांदा,

एक लहान बारीक चिरलेले टोमॅटो,

कडीपत्ता, कोथींबीर बारीक कापलेली,

धणे – जिरे पावडर 3 चमचे,

हळद – पाव चमचा, हिंग – चिमूटभर,

मीठ – स्वादानुसार,

तेल.

कृती:

१. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथींबीर एका भांड्यात घ्या.

२. त्यात एक चमचा तेल, पाव चमचा हळद, ३ चमचे धने-जिरे पावडर, हिंग आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करा.

३. त्यात पाव वाटी तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.

४. नंतर एक वाटी मूगडाळीचे पीठ, थोडे मीठ, पाणी घालून चांगले मिक्स करा.

५. भज्यांच्या पिठापेक्षा हे मिश्रण थोडे घट्ट असावे.

६. एका तव्यावर थोडे तेल टाकून हे मिश्रण पसरावे. थालीपिठाला चार भोके करावित व त्यात थोडे तेल घालावे. वर झाकण ठेवून मध्यम आचेवर ३-४ मिनिटे शिजवावे.

७. झाकण काढून थालीपिठ उलटावे. थोडे तेल कडेने सोडावे. खरपूस होईपर्यंत ठेवावे.

८. गरम गरम थालीपिठ चटणी किंवा लोण्याबरोबर खायला द्यावे.

◆◆◆

n text