मन वढाय वढाय… आणि कॅन्सर

डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

‘तुम्हाला कॅन्सर झाला आहे…’ असे जेव्हा डॉक्टर पेशंटला सांगतात तेव्हा नॉर्मल माणसाचे विश्व सोडून त्याचा एका वेगळयाच विश्वात प्रवेश होतो. पण हे जग नीट समजून घेतलं तर त्या पेशंटची नाव त्या भवसागरातून सुखरुप किनार्‍याला पोहोचू शकते. कसं ते अतिशय सकारात्मक पद्धतीने सांगताहते स्वतः या अनुभवातून गेलेल्या डॉ.ऋजुता कुशलकर.

प्रिय शितल,

कॅन्सर रुग्णांच्या या जगात तुला सह+अनुभूतीने प्रेमपूर्वक आलिंगन देते. ज्या दिवशी बाकीच्या सर्व शक्यता फेटाळून डॉक्टर दुःखी अंतःकरणाने आपल्याला सांगतात, ‘तुम्हाला कॅन्सर झाला आहे,’  त्या क्षणीच अचानक आपण नॉर्मल माणसांचे विश्र्व सोडून या वेगळया विश्र्वात प्रवेश करतो. या जगाचे कायदे, नियम, रीतीरिवाज पूर्णपणे वेगळे आहेत. जर नीट समजून घेतले तर यातून नाव सुखरुप किनार्‍याला लागेल. कॅन्सरच्या या जगातील तुझी सीनियर म्हणून मी तुला इथल्या व्यवस्थेशी परिचय करुन देते.

कॅन्सरविरुद्धचे हे युद्ध शारीरीक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि अर्थातच आर्थिक अशा अनेक पातळयांवर वेगवेगळी शस्त्रे वापरुन लढावे लागते. या लढाईत मनाच्या खंबीरपणाला असाधरण महत्त्व आहे. औषधांमुळे शरीराची ताकद कमी होते. मग मन रंजी होते. औषधांना मिळणारा प्रतिसाद कमी होतो. मन आणि शरीर यांचा या आजारात असा अन्योन्य संबंध आहे.

कॅन्सरमध्ये, किमा-रेडिओथेरपीमुळे शरीरात अनेक बदल होतात. मसालेदार, तिखट, तेलकट आहार शरीराला सोसत नाही. अन्नावरची वासना उडते. पचन व्यवस्थित होत नाही. तेव्हा कमी तेल-तुपाचा, कमी मसाल्याचा वापर करुन बनवलेला सात्विक, संतुलित, पौष्टिक आहार घ्यावा. ‘अन्न हे पूर्णब्रह्य’ अशी आदराची भावना मनात ठेवून ग्रहण करावा. जमेल तेवढा, झेपेल तेवढा चालण्याचा व्यायाम करुन, योगासने करुन शरीर तंदुरुस्त ठेवावे. तंदुरुस्त शरीर ढेपाळलेल्या मनालाही सावरायला मदत करते.

‘कॅन्सर’ हा शब्द उच्चारला तरी मनात भावनांचा कल्लोळ उठतो. ‘हे काय होत आहे, त्यावर उपाय काय?’ हे न समजल्याने आपण शोकसागरात बुडून जातो. आयुष्यावरला आपला ताबा सुटतो. सुरुवातीचा जोराचा लागलेला धक्का जरा ओसरला की आपणच आपल्याला सावरायचे. बुद्धीची कवाडे उघडी ठेवायची. आपणच आपल्याला स्वतः बाहेर काढून त्रयस्थपणे पाहायचे. मला काय होत आहे? कशामुळे होत आहे? त्यावर उपाय काय? ओैषधोपचार नीट करण्यापलिकडे मी अजून काय करु शकते? हे प्रश्न मनाला सतत विचारत राहावे. हे प्रश्न म्हणजे आरोग्याच्या कुलुपाची मास्टर की आहेत.

मनात सर्वप्रथम उठणारा प्रश्न म्हणजे, हा आजार मलाच का झाला? मी काय पाप केले? याचे उत्तर शोधण्यासाठी ‘कॅन्सर का होतो’ हे पाहूया. शास्त्रज्ञ असे म्हणतात की प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी असतात. आपण तनामनाने खंबीर असताना आपली प्रतिकारयंत्रणा या कॅन्सरच्या पेशींना मारुन टाकते. आपली प्रतिकारशक्ती दुर्बळ झाला की कॅन्सरच्या पेशी मोकाट सुटतात. कॅन्सर व्हायला कारणीभूत अनेक गोष्टी आहेत. ताणतणाव, चुकीची जीवनशैली, जंक फूड, हार्मोनचे असंतुलन ते प्रदूषण, किटकनाशकांचा अतिरिक्त वापर इ. यातील एक किंवा अनेक गोष्टी आपल्याला घातक ठरतात आणि आपल्याला कॅन्सर होतो. पण ‘घरातील मलाच का झाला?’ याचे उत्तर म्हणजे, रस्त्याने चालताना एखाद्याला ठेच लागते आणि एखाद्याला लागत नाही. तेव्हा नशीब आपले म्हणून पुढे चालावे. गेल्या जन्मीच्या किंवा या जन्मीच्या पापांचा आणि या आजाराचा काहीही संबंध नाही. असल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. तसा असता तर आपल्या आजुबाजूचे अनेक घोर पापी लोक हॉस्पिटलमध्ये दिसले असते! आपण सर्वसामान्य, पापीभीरु माणसे. एक-दीड वर्षांच्या मुलांनी आयुष्यात काय पापे केली तर त्यांना कॅन्सर होतो गं?  रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, बौद्ध धर्मगुरु दलाई लामा हे तर जगाला उद्धरणारे महापुरुष. त्यांना का व्हावा कॅन्सर? तेव्हा जितक्या लवकर तू हा प्रश्न मनातून काढून टाकशील तितक्या लवकर तू बरी होशील!

या आजारात तू स्वतःच स्वतःला समजून घे. मला वाईट का वाटतेय, राग का येतोय, त्याचे मूळ कारण काय आहे, वडाचे तेल मी वांग्यावर तर काढत नाही ना याविषयी योग्य विचार कर, कारण तुझ्या आजुबाजूची अनेक माणसे अयोग्य, निरर्थक, वेदनादायी बडबड करतील. तुझे मन सागरासारखे विशाल कर. समुद्र कसा आपल्या पोटात सर्व घाण रिचवूनही स्वच्छ राहतो तसे आपल्याच लोकांचे बेताल वर्तन तू पोटात घाल. माणसांचा या आजारबद्दलच्या अज्ञानामुळे, भीतीमुळे तोल सुटतो. अशावेळी त्यांना अज्ञानी बालके समजून आपण मोठे व्हावे.

सुरुवातीला मनाची खूप तडफड होईल. आजुबाजूला आपल्याच एवढी निरोगी, तुरुतुरु काम करणारी माणसे पाहून मन तळमळेल. त्यातून किमोमुळे अधुनमधून शतजन्माचा थकवा आपल्याला शोधत येतो. साध्या साध्या गोष्टी अशक्यप्राय होतात. चिडचिड करु नकोस. शरीराची शक्ती हळूूहळू भरुन येईल. मुळात आपण जिवंत आहोत याबद्दल डॉक्टराचे आणि देवांचे आभार मान. हा कमजोर, अशक्त देहही आपलाच आहे. एकेकाळी आपण चांगल्याचुंगल्या पदार्थांनी, वस्त्र-आभूषणांनी त्यांचे लाड पुरवले होते. आता या देहाची वाईट स्थिती आली म्हणून खचून जाऊ नये. जे समोर येते त्याचा खळखळ न करता स्वीकार कर.
या आजारात मन अतिशय अस्थिर होते. सगळया चिंता, काळज्या अक्राळविक्राळ रुपे घेतात. त्यांच्याशी लढणारी आपली विवेकबुद्धी गालितगात्र होते. मेंदूमधले वायरिंग बदलते. आपल्याला कळत असते की आपण उगीच चिडचिड करतोय. लोकांवर ओरडतोय. पण हा सर्व त्रागा म्हणजे मनाला आलेले फ्रस्टेशन असते. आपण असहाय्य आहोत. दुसर्‍यावर अवलंबून आहोत. आपल्यामुळे दुसर्‍यांना खूप त्रास होतोय या अगतिकतेपायी ते आलेले असते. घडणार्‍या सगळया प्रतिकूल गोष्टींचा ‘मला हा असा कॅन्सर झालाय म्हणून… ‘असा संबध लावला जातो. पण असा आपल्याच जीवाला त्रास घेऊन आपण बरे होणार का? आपल्यासाठी खस्ता खाणार्‍या सुह्रुदांना काय वाटेल?  आपल्या मनाला समजावावे.

यातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण, ध्यान, योगसाधना. मी अजिबात अंधश्रद्धेचा परस्कार करत नाही. डोळसपणे देवाची भक्ती करावी. हा देव नेहमीसारखा अमूक केले नाही म्हणून कोपणारा, भक्ताला सळो की पळो करुन सोडणारा नाही. तो जगत्‌नियंता आहे. ही पृथ्वी, सूर्य, सूर्यमाला, अगणित आकाशगंगा निर्माण करणारा सामर्थ्यशाली, निगुर्ण, निराकार आहे. त्याच्या आकाराचा, रुपाचा, स्थानाचा कुणाला ठाव लागला नाही. सृष्टी निर्माण करणाराही तोच आणि सृष्टीचा विनाश करणारही तोच! तो परमदयाळू आहे. दुःखात तो मदत करायला नाना स्वरुपांत येतो. माणसातला चांगुलपणा म्हणजे देवत्व. ‘मी आतापर्यंत सर्व पूजापाठ, उपवास नियमित करत आले. मग हा आजार मला का व्हावा’ हा प्रश्नच निरर्थक आहे. सुखाबरोबर दुःख हा जगाचा नियम आहे. आपल्या दृष्टिने सुखी असलेल्या माणसाबरोबर आपली तुलना करु नये तर आपल्यापेक्षा दुःखी माणसे किती आहेत ती पाहावी. कुठलाही सुखी माणूस पूर्णपणे सुखी कधीच नसतो.’ सुख पाहता जवापाडे| दुःख पर्वताएवढे|’ अशीच स्थिती सगळीकडे असते. परिपूर्ण सुख – अॅबसोल्यूट  हॅप्पीनेस  कुठेच मिळत नाही.  उत्पत्ती आणि लय ह्या एकच जीवनचक्राच्या दोन बाजू आहेत हे एकदा मनाने स्वीकारलं (फार कठीण आहे असे मनात गोंदवून घेणे) की मनाची अस्वस्थता खूप कमी होते. आपल्यासमोर जे येते त्याला धीराने, हसतमुखाने सामोरे जाण्याने दु:ख खूप कमी होते. आपल्यासमोर जे येते त्याला तोंड द्यायला शक्ती येते. देवानेही जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यालाही सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी, मनाच्या पीडा, लोकनिंदा चुकली नाही. आजुबाजूला पाहा. आपल्यासारखे अनेक दुःखी लोक धडपडत हा भवसागर पार करताना दिसतील.

कुठलेही सुख किंवा दुःख एकेकटे येत नाही. ते पॅकेज डील असते. दुःखाच्या काळया ढगाला रुपेरी किनार असते वेगळया दृष्टीची, मनःसामर्थ्यांची! ‘मला का हा आजार झाला’?  असा निगेटिव्ह विचार करुन कुढत बसू नये. त्यातून काय शिकता येईल, कसा मार्ग काढता येईंल याचा विचार करावा. प्रत्येक दुःख आपल्याला अगणित गोष्टी शिकवते. ज्या सामान्य आयुष्यक्रमात आपण शिकलेलो नसतो. एक प्रकारचा क्रॅश कोर्सच म्हणा ना! आपलीच आपल्याशी नव्याने ओळख होते. आपल्या देहाचे, मनाचे बोलणे आपल्याला समजू लागते. भोवताली जन्मलेल्या गोतावाळयात आपले कोण, परके कोण, याचा उलगडा होतो. देव एक दार बंद करतो तेव्हा मदतीची अनेक दुसरी दारे उघडतात. लोकांचे प्रेमळपणे बोलणे, चांगले वागणे आपण पूर्वी अध्याह्यत धरत होतो. आता त्याच गोष्टी कुणी आपल्यासाठी केल्या तर मन कृतज्ञतेने भरुन जाते. छोटया छोटया गोष्टीत आनंद शोध. असे अगणित आनंदाचे क्षण आपल्या आजुबाजूला असतात. सुखाचे मोठे घबाड मिळेल म्हणून आपण एरवी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. झाडावर फुललेले फूल किंवा तारेवर गाणारा पक्षी पाहून मन आनंदाने भरुन जाते. हा आनंद आतून येतो. त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मग मेंदूच्या आज्ञेवरुन वेगवेगळया ग्रंथींमधून आरोग्यासाठी उपयुक्त अशी रसायने शरीरात सोडली जातात. शरीराचे बिघडलेले संतूलन परत मूळ जागी यायला लागते. शरीर जसजसे तंदुरुस्त होते तसतसे मन/मेंदू अधिकाधिक पॉझिटिव्ह होत जातो. ठप्प पडलेले आरोग्याचे चक्र पुन्हा सुरळीत चालू होते.

ध्यानधारणा, योगाभ्यास करुन तुझे मन एका अपूर्व आनंदाने भरुन जाईल. यमदूत तुला डोक्यावर छत्रचामर धरुन उभे राहिलेले देवदूत वाटतील. मृत्युच्या शीतल छायेत अवर्णनीय मनःशांती मिळेल. संसारातील क्षुल्लक गोष्टींचा ताप तुला होणार नाही. प्राणिमात्रांबद्दलच्या करुणेने तुझे मन विशाल होईल. ज्ञानेश्वर म्हणतात, त्याप्रमाणे ‘विश्र्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले’ असे वाटेल. ऐलतीर-पैलतीराच्या या सेतूवरुन दोन्हीकडचे विहंगम दृश्य तुला पाहायला मिळेल. कशातही न गुंतता, कमळाप्रमाणे अलिप्त राहून तू या जगाचा रसास्वाद घेऊ शकशील. मग एका सुंदर सकाळी, कोवळया उन्हात न्हातानाची सृष्टी पाहताना किंवा चंद्राच्या रुपेरी, गूढ चांदण्यात अवंगुठून निद्रीस्त झालेले जग पाहताना तुझ्या मनात कृतज्ञता दाटून येईल. कृतज्ञता ही नवीन दृष्टी देणार्‍या कॅन्सरबद्दल! जगण्याचाच एक उत्सव होईल. तेव्हा तो परमदयाळू परमात्मा मातेच्या वत्सल हातांनी तुला हलकेच कुरवाळत असेल!
तुझीच,
ऋजुता

©डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – शब्द रुची, ग्रंथाली प्रकाशन, आरोग्य विशेषांक फेब्रुवारी २०१५

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.