Madras Cucumber Sambar (मद्रास काकडीचे सांबार)

मद्रास काकडीचे सांबार

भारतात नाना तऱ्हेच्या भाज्या मिळतात. पण फ्लाॅवर, कोबी अशा मोजक्या भाज्या सोडल्या तर खूपशा भाज्या आपल्याला माहीतही नसतात. मद्रास काकडी ही अशीच कमी माहित असलेली भाजी. बाजारात जेव्हा आपण ही अंडाकृती, पिवळ्या -केशरी हिरव्या रंगाची थोडेफार काकडीशी साधर्म्य असलेली भाजी पाहतो तेव्हा मनात कुतूहल जागृत होते पण त्याच्या पलीकडे जावून आपण त्या भाजीबद्दल जास्त विचार करत नाही.

मद्रास काकडी ही काकडीच्या कुळातील हायब्रीड भाजी आहे. कोहळा, खरबूज वर्गीय फळे यांच्याशी तिचे साधर्म्य आहे. दक्षिण भारतात (म्हणजे पूर्वीच्या मद्रास प्रांतात ) याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते म्हणूनही नाव मद्रास काकडी. डोसाकाय, मंगलुरु सौतेकाय असेही म्हणतात. यापासून चवदार, रसदार सांबार, भाज्या बनवल्या जातात.

यात अ आणि क जीवनसत्वे भरपूर असतात. अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजेही मुबलक असतात. फायबर भरपूर. याची सौम्य चव आणि गंध सांबाराच्या चवीत मिसळून जातो.

अगदी झटपट होणारी ही पाककृती आहे. गरमा गरम सांबार -भात -तूपासोबत भाजलेला पापड घेतला तर रसना तृप्त होते आणि ते समाधान आतपर्यंत झिरपत जाते. शांत, सुखी झोपेची ती नांदी असते.