ऐका देवा तुमची कहाणी. आटपाटनगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पावसाळ्यादिवशी तो लेकीसुनांसह शेतावर जाई. धाकटय़ा सुनेला मात्र जेवण बनवायला घरी ठेवी. सुनेला माडीवर अध्र्या भाकरीपुरते दाणे मिळाले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. इतक्यात तिथे देव कुष्ठय़ाच्या रूपात आले. सुनेने त्याच्या अंगाला तेल लावून आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. कुष्ठय़ाच्या रूपातील देवाने तिला आशीर्वाद दिला. ‘तुला काही कमी पडणार नाही, असाच  तुझा आत्मा देव थंड करील.’  श्रावण आला की पावसाळयात उगवणाऱ्या केनीकुर्डूची भाजीची हटकून आठवण येते आणि त्या बरोबरच या काहणीचीही! आणि धाकटय़ा सुनेसारखाच घरी आलेल्याला प्रेमाने खाऊ घालणाऱ्या नानी-आईची.

केळी-नारळ-सुपारी-पानवेलीच्या छोटय़ा छोटय़ा वाडय़ांमध्ये वसलेली लाल कौलारू घरे. कुडाच्या स्वयंपाकघरात नानीचं (आजीचं) जेवण चुलीवर रटारटा शिजत होतं. कुडाच्या फटींतून, हिरव्या पानांतून गाळून हळदीचा सूर्यप्रकाश आत येत होता. शिपत्या वाडीतून येणारा गार वारा फटींतून चुलीतला निळा धूर बाहेर नेत होता. त्या धुराच्या-प्रकाशाच्या कवडशांमधून धुळीचे कण मजेत तरंगत होते. मी आणि माझी बहीण-आम्ही फ्रॉकमधल्या पोरी उंबरठय़ावर बसून नाना-नानीची गडबड पाहत होतो. नानी पहाटेच उठून भाजीपाल्याचा विक्रा करायला बाजारात गेली होती. ती येईपर्यंत नानांनी आम्हाला खायला देणं, आंघोळीला पाणी देणं, वाडीत येणाऱ्या माणसांना गुळाचा चहा देणं एवढंच काय पण एका बाजूला भात, डाळ चुलीवर शिजवून ठेवलेली. वाडीतून कोवळी दुधी-पडवळ-शिराळा आणून ठेवलं. वाल सोलून ठेवलेले. अगदी कैरी-नारळाची चटणीही वाटून ठेवली. नानीने बाजारातून आल्यावर वाल-शिराळा भाजी करायला घेतली. चुलीवर भाजी शिजत टाकून तिने वाडीत एक चक्कर टाकली. तोंडाने कायम एका बाजूला बडबड किंवा गाणी चालू होती. ‘xxx मेलं आपण जरा नहलो (नसलो) की बहून रेतात (बसून राहतात.)’ असा मजुरांबद्दलचा तिचा त्रागा होता. वाडीतले मजूर ठरलेले होते. खणण्यासारख्या मेहनतीच्या कामाला ‘गो’ आणि इतर कामाला बाया. अधीमधी उशिरा येणं, दारू पिऊन कामाला न येणं, बायांचं कामासाठी दुसऱ्या गावी जाणं असं सगळं साग्रसंगीत चालू असायचं. बोलण्यात दोन्ही पक्ष जबर. दोन्ही पक्षांच्या अधूनमधून तलवारी काढून चकमकी होत असत. इतक्या कटकटी करूनही रोज सगळे एकमेकांबरोबर काम कसं करतात, याचा मला प्रश्न पडे. बारा वाजले. नानीची भाजीही तयार झाली. मजुरांची जेवणासाठी घरी जायची वेळ झाली. छबीबरोबर नानीची काल लवकर जाण्याबद्दल थोडय़ा वेळापूर्वी खडाजंगी झाली होती. ‘नानी, सालली गं मी.’ छबीमावशी जाता जाता म्हणाली. ‘छबे, अटे ये, जेव्या का केलं?’ छबीमावशी यापुढे घरी जाऊन जेवण बनवणार असते. ‘नय, पोरीन् धान केलं अहेल. कायतरी भाजी करीन.’ ‘खम (थांब) जरा. ही भाजी घेन् जा. नानीने पितळेच्या चकचकीत तांब्यात तीन-चार जणांना पुरेल अशी भाजी तिला दिली. न् हे पाव (पाहा). कालसा (कालचा) तांब्या तू आणला नय आज. दोपारा घेन ये, नायतर उद्याला मी काय देव्याही नय’ नानीने कृतक् कोपाने धमकी दिली. ‘नय् नानी, दोपारा येताना आणते दोनी तांबे तुह्य़े. नय् खात तुह्य़े तांबे.’ छबी हसत हसत घरी निघाली. तोपर्यंत नानांनी आम्हाला जेवायला म्हणून केळीची पाने दांडातल्या पाण्याने धुवून आणलेली. आम्हाला वाढून नानी जेवायला बसली. जेवण सुरू करायच्या आधी आजीने आपल्या पानातून एक घास चुलीला, एक मुंग्यांना, एक कावळ्याला आणि एक गाईला बाजूला काढला. सर्व भूतमात्र तिच्या कुटुंबात समाविष्ट होते. सर्व चराचराशी तिचं अद्वैत होतं. वाडीतलाच भाजीपाला, नारळ वापरून केलेलं साधं जेवण असायचं. परंतु अतिशय चविष्ट आणि मायेने बनवलेलं, प्रेमाने वाढलेलं. फणसासारखं प्रेम बाहेरून खडबडीत, आतून रसाळ गरे. आजच्या आहारशास्त्रानुसार पाहिलं तर सर्व घटकांनी परिपूर्ण!

नानीच्या अनेक डिशेस् मजुरांमध्ये फेमस होत्या. बरं एवढं तेल घातलेली, आलं-लसूण-जिरं-खोबऱ्याचं वाटण लावलेली शेवग्याच्या-मुळय़ाच्या पाल्याची, आकूच्या देठांची वाल-सुकं घालून केलेली शाक (आमटी) तर फारच लोकप्रिय. ‘नानी, बऱ्याच दिहात तू शाक नय केली. केली का दे हं.’ लक्ष्मण तात्या घरी जाता जाता सांगायचे. दुसऱ्या दिवशी लोटाभर शाक जेवणाच्या वेळी नानी त्याच्या हातात द्यायची. नानीचं करणंही पसा-पायलीचं. सात पोरं आणि सासू मिळून दहा माणसं होती तिच्या घरात. आता पोरं घरटय़ातून उडून गेली तरी हाताला लागलेली सवय काही जात नव्हती. दर मे महिन्यात ती अजूनही शंभर-दोनशे आंबे मिठात टाकायची. दहा किलोचं तरी लोणचं घालायची. पाच-सात किलोचे पापड. भंडारवाडय़ात-कोळीवाडय़ात कुणी आजारी पडलं की नानीला सांगावा यायचा. की नानी चालली खारवलेला आंबा किंवा लोणचं घेऊन. आधी का कळवलं नाही याबद्दल त्या बाईला हमखास दोन शिव्याही मिळत असत. नानांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या म्हाताऱ्या आनंदीचा वाटा सणासुदीला तिच्या घरी आवर्जून जात असे. ‘अगं, तुझ्या नानीला गावभर वाटायला पाहिजे म्हणून ती एवढं ढीगभर करते.’ अशी नानांची आमच्याजवळ लटकी तक्रार असली तरी मध्यान्हकाळाला दारात कुणी गरीबबापडा आला तर ‘त्याला जेवण वाढ गं’, असं त्यांचंच फर्मान निघे. इतरवेळी नानींची ना नसे पण मटणकोंबडीचं महागमोलाचं जेवण असलं की तिच्या थोडं जिवावर येई. ‘अटू दे, माह्य़ा वाटणींह वाढ त्येला. देव पण आला अहेल त्याह्य़ा रूपात!’ अशी नानांची भाबडी श्रद्धा होती. फार काही श्रीमंत नव्हते ते. खाऊन-पिऊन सुखी होते. दोन वेळेला घरच्याच भातभाजीची सोय होती. वर्षांला दोन पातळं-धोतरजोडी मिळाली की समाधान पावायचे. पण आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी भुकेलेल्याच्या मुखी घालण्याची दानत होती. माणुसकीचा निर्मळ निवळशंख झरा खडबडीत दगडधोंडय़ांतून झुळुझुळु वाहात होता.

आईच्या माहेरी निदान खाण्या-पिण्याची तरी ददात नव्हती. पण वडिलांच्या घरी आजीला-बायला कोंडय़ाचा मांडा करून संसार चालवावा लागे. आजोबा आजारपणामुळे लवकर निवृत्त झालेले. तुटपुंजे पेन्शन, वाडी नसल्याने घरचा भाजीपाला नाही. भात तेवढा शेतात पिके. त्यावर वर्ष काढायचं. मात्र बाय अतिशय कष्टाळू. तिच्याच मावशीच्या वाडीत कामाला जायची. पोरं-नवऱ्याला खायला घातल्यावर तिला काही उरेलच याची शाश्वती नाही. मग पेज पिऊन दिवस काढायचा किंवा उगाचच नाना व्रतवैकल्यांच्या नावाने निर्जळी उपवास करायचा. त्याही परिस्थितीत शेतावर काम करणाऱ्या बाया आल्या तर आपल्यापुढचं वाढलेलं ताट त्यांच्यापुढे सरकवायची दानत होती तिच्यात. पुढे मुले चांगली शिकली. सुस्थितीत आली, पण ‘त्या’ दिवसाच्या आठवणीने तिच्या डोळ्यांत पाणी तरळे, आवाज जड होई. त्या उपासमारीच्या, कष्टांच्या, दु:खाच्या उदरातून जन्मलेल्या, उमललेल्या मायेची पखरण ती आल्या-गेल्यावर खायला घालून करी. आमच्या घरी काम करणाऱ्या मावशीबायचा नवरा अकालीच गेला. घरी काहीही विशेष बनवलं की तिच्या मुलांसाठी आई वाटा बाजूला काढायचीच, पण बायही आग्रहाने मावशीबायला खाऊ घालायची. नवऱ्याच्या आठवणीने तिचा जीव गलबलायचा. ‘खा गं बिसारे.’ बाय तिच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवून म्हणायची. खाणारी आणि खाऊ घालणारी दोघीही गहिवरायच्या.

आईचं करणंही पसा-पायलीचं. आईची शाळा घराजवळच होती. आईच्या शाळेतली गरीब मुलं, लांबून येणाऱ्या शिक्षिका, इतर कर्मचारी यापैकी कुणीही डबा आणला नाही की आई त्यांची रवानगी आमच्या घरी करी. घरी अन्नपूर्णेची थाळी होती. दोन माणसं जास्तीची जेवून जातील एवढं जेवण नेहमी घरी असे. बाय संकोचलेल्या बायांना, मुलांना जेवण गरम करून वाढत असे. जुन्या काळातली असूनही तिचे जातीपातीचे अवडंबर नव्हते. बायला एकदा भेटलेल्या बाया तिच्या प्रेमातच पडत. सुबत्तेने तिच्या संवेदनांना गंज चढला नाही. दुसऱ्याच्या वेदनांनी, दु:खाने, भुकेने ती कासावीस होत असे. जमेल तेवढी मदत करत असे. एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या भूमीची ती कन्या होती. सर्वाना खाऊ घालणाऱ्या बळीराजाची ती वंशज होती.

नाना-नानी आणि बाय परधामाला गेले तेव्हा दुरून दुरून बायाबापडय़ा येऊन धाय मोकलून रडल्या. त्यांच्या प्रेमळ शब्दांची, मायेच्या स्पर्शाची आठवण करकरून रडल्या. आपण गेल्यावर असं रडायला कोण येणार? नि:स्वार्थी प्रेमाच्या बंधनांनी आपण माणसं बांधली आहेत का?

मध्यान्ह समय झालेला, आमची जेवणं आटपत आलेली, आवराआवरी चालली होती. रेखाला-कामवालीलाही आज जरा उशीरच झालेला. मुलगा मला म्हणाला, ‘आई, रेखामावशीला जेवण ठेवलंय ना तू, तर त्यात ताकाची वाटी आधी बाजूला ठेव. म्हणजे मला उरलेलं ताक संपवायला बरं.’ सगळेच गुण बाळात जीन्समधून संक्रमित होत नाहीत. काही काही गुण आईच्या पेशीद्रव्यातूनही येतात. माणुसकी, दुसऱ्यांबद्दलची कळकळ ही आजीच्या मायेच्या स्पर्शातून आणि आजोबांच्या उदार वागण्यातून नातवंडांत उतरते!

असा हा आपल्या घासातला अर्धा घास भुकेल्यामुखी घालण्याचा वसा. अशी ही साठा उत्तराची कहाणी-सफळ संपूर्ण.

पूर्वप्रकाशित : लोकसत्तामधील लेखाचा दुवा