या संकेतस्थळाचा उपयोग कसा करावा?
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujuta@gmail.com
कॅन्सर हा अवाढव्य आजार आयुष्याला दशांगुळे व्यापून उरणारा. एक हत्ती आणि सात आंधळे मधील गोष्टी सारखे. रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय कॅन्सरशी शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा अनेक आघाड्यांवर लढत असतात. डाॅक्टर रुग्णाचा जीव कसा वाचेल यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत असतात. संशोधक पेशींच्या/ जनुकांच्या पातळीवर काय बदल होताहेत याचा शोध घेताहेेत. या संशोधनावर आधारित नवीन औषधे औषधकंपन्या तयार करताहेत. उपचाराच्या नवीन पद्धती, नवीन औषधे, नवीन संशोधन इ अनेक गोष्टींची माहिती देणारी अनेक संकेतस्थळे माहितीजालावर उपलब्ध आहेत. मात्र बहुतांशी इंग्लीश मधे. कॅन्सर मंथन या संकेतस्थळाच्या माध्यमातून रुग्णाला पडणारे प्रश्न, येणार्या अडचणी, उपचारांचे साइड इफेक्टस्, मनाला येणारे नैराश्य इ अनेक बाबींवर अनुभवांवर आधारित शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मायबोलीतून अशी माहिती देणार्या संकेतस्थळाची उणीव कॅन्सर मंथन मुळे भरून निघेल अशी आशा आहे.
कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्ण आणि कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात होतो. सकारात्मक विचार करा असे सगळे सांगतात पण म्हणजे नक्की काय करायचे हे कुणीच सांगत नाही आणि मृत्यूच्या छायेत तो करणेही कठीण. कॅन्सरच्या अग्निदिव्यातून जात असताना अनेक बरे वाईट अनुभव आले. स्वत:ला काय त्रास होतो याचे बारीक निरीक्षण केले. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. इंटरनेटवर शोध घेतला. इतर रुग्णांचे अनुभव वाचले. या सर्व अनुभवातून सुचलेले विचार आणि पाळलेले आचार इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कॅन्सरचे निदान, औषधे, डॉक्टरांचे उपचार यांना पर्याय म्हणून हे उपाय नाहीत तर पूरक म्हणून आहेत हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
हे लेख त्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या गटांमधे विभागले आहेत.हे सर्व लेख एका बैठकीत वाचून ठेवून देऊ नये. जसजसे उपचार पुढेपुढे जातील तसतसे नवनवीन अ्नुभव, शंका, अडचणी येत जातील. त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित लेख परत परत वाचत राहा. त्यावर सकारात्मक रीतीने विचार करत राहा. येणाऱ्या अडचणींतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत राहा.
मुख्य प्रश्न होता काय खावे आणि काय नाही? कॅन्सर रुग्णाने काय खावे? काय पचेल? कोणते पदार्थ टाळावेत? इंटरनेटवर बराच शोध घेतला. त्यातील बहुतेक आहाराचे प्रयोग हे पाश्चात्य आहारावर आधारित होते. तसा आहार घेणे आपल्या भारतीयांना रुचणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारही नाही. पाश्चात्य आहारातील गुणधर्म आणि फायदा आपल्या भारतीय आहारात कसा आणावा यासाठी बरेच प्रयोग केले. ते इतर रुग्णांना ही आवडले म्हणून ‘मी काय खाऊ?’ मधे सांगितले आहे.
तसेच हे खाद्यपदार्थ कसे बनवावेत हे प्रत्यक्ष ‘ Rujuta’s Non-spicy Receipes for Patients’ या You Tube channel वर पाहाता येईल.
कॅन्सर का होतो, कारणे, लक्षणे, निदानासाठी कराव्या लागणार्या चाचण्या याबद्दल लेख आहेत.
कॅन्सरवरचे उपचार, किमो -रेडिएशन यांची माहिती, त्या दरम्यान घ्यायची काळजी, साइड इफेक्टस आणि त्यावरचे उपाय याबद्दलही विस्तृत माहिती दिली आहे.
ट्रीटमेंट संपल्यावर रुग्णाची शारीरिक- मानसिक स्थिती नेमकी काय असते आणि परत हळूहळू पूर्वपदाला कसे यायचे यावर ‘ट्रीटमेंट संपल्यावर’ , ‘मन वढाय वढाय’ यात सांगितले आहे.
आयुर्वेदातील पंचकर्माचा शारीरिक – मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास कसा हातभार लागतो हे ‘ फिरूनी नवी जन्मेन मी’ आणि ‘ वेदनेचे व्यवस्थापन ‘ यात सांगितले आहे.
जेव्हा कुटुंबातील एका व्यक्तीला कॅन्सर होतो तेव्हा त्या कुटुंबाचा आर्थिक कणाच मोडकळीला येतो. या सर्व संकटात शांत राहून व्यावहारिक बाजू सांभाळणे हे मोठे धैर्याचे काम. या आणि इतर काही संबंधित विषयांचा उहापोह ‘आजाराचे अर्थकारण’ या लेखामधून केला आहे.
‘मी काय खाऊ?’, किमोथैरपी, रेडिएशन, ट्रीटमेंट संपल्यानंतर या लेखांच्या प्रती काढून ठेवा म्हणजे वेळो वेळी वाचायला रुग्णाला बरे पडेल.
इतर रूग्ण आणि त्यांच्या कुटूंबीयांनी या सर्वाला कसे तोंड दिले याच्या सत्यकथा ‘कॅन्सर कथा’ मधे दिलेल्या आहेत. त्या वाचून माणुसकीचे उदात्त, उन्नत दर्शन तुम्हाला घडेल. तुमचेही मनोबल वाढेल.
सारखा गंभीर विचार करून मनाला आलेला शीण घालवण्यासाठी विनोदी कथा ‘काही हलकं फुलकं’ मधे आहेत.
सर्वात शेवटी पण अतिशय महत्वाचे. काही कारणांमुळे कधीकधी कॅन्सर बरा होत नाही. शरीरभर पसरायला लागतो आणि रुग्णाची वाटचाल परलोकाकडे व्हायला लागते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा कठीण काळ. दुर्दैैवाने आपल्या कडे मृत्यूवर चर्चा कुणीच करत नाहीत. अशुभ मानले जाते. यशस्वी जीवन जगलेल्यांची जशी उदाहरणे दिली जातात तशी आजारी पडल्यावर धैर्याने, शांतपणाने मृत्यूला सामोरे जाणाऱ्यांबद्दल कुणीच बोलत नाही.
मृत्यूच्या भोज्याला मीही हात लावलाय. त्यावेळी मनात येणारे विचार, शारीरिक- मानसिक- व्यावहारिक अडचणी आणि त्यातून माझ्यापरीने काढलेला मार्ग यावर ‘मृत्यूला सामोरे जाताना -१, २’ हे लेख आहेत.
कॅन्सरच्या, फारशी चर्चा न झालेल्या बाबींवर, रुग्णाच्या दृष्टीकोनातून, हे लेख माझ्या आणि २००७ पासून माझ्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या अनुभवावर आधारित आहेत. ताप -सर्दीसारखा कॅन्सर सगळीकडे पसरत आहे. आपल्या परिचयातील रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या संकेतस्थळाबद्दल जरूर सांगा ही विनंती. गरजुंना मायबोली मराठीतून ज्ञान मिळून या भयंकर रोगाबद्दल असणारी अज्ञानरुपी भीती थोडीतरी कमी व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
चुकभूल माफ करावी.
सर्वेपि सुखिन: सन्तु | सर्वे सन्तु निरामय:|
सर्वे भद्राणी पश्यन्तु | मा कश्चित दु:खमाप्नुयात् |
