Green Liver Masala (हिरव्या मसाल्यातील कलेजी)
हिरव्या मसाल्यातील कलेजी
लहानपणी कधी आजारी पडलो, खूप अशक्तपणा आला की आजी सांगायची ,” काहीतरी पौष्टीक खा.” पचायला हलका तरीही ताकद वाढवणारा आणि तोंडाची रुची वाढवणारा पदार्थ म्हणजे पौष्टीक पदार्थ. मुगाचे कढण, भाज्यांचे सूप, चिकन सूप, तिळी कलेजीचा रस्सा हे काही पौष्टीक पदार्थ. या पदार्थांना आयुर्वेदही पौष्टीक मानतो आणि रुग्णाचे बल वाढवण्यासाठी आवर्जून खावे असे सांगतो. या पदार्थांमधे भरपूर प्रथिने असतात. प्रथिनांमुळे नवीन पेशींची निर्मीती केली जाते, शरीराची हानी भरून निघते. पण अजून असे काय असते या पदार्थांमधे जे आपल्याला शक्ती देते?
आधुनिक संशोधनात काही वेगळीच गोष्ट समोर आली. आपण खाल्लेल्या पिष्टमय पदार्थांचे शरीरात पचन होऊन साखर तयार होते. या साखरेवर अजून प्रक्रिया होउन ATP (Adenosine tri phosphate) हे ऊर्जा देणारे संयुग बनते. या प्रक्रिये मधे अनेक वितंचकांचा (enzymes) सहभाग असतो. यातील एक महत्त्वाचे वितंचक आहे
Co Q10.
निरोगी माणसाच्या शरीरात एका साखरेच्या रेणूपासून ATP चे 38 रेणू तयार होतात. आपण जेव्हा प्रतिजैविके किंवा तत्सम भारी औषधे घेतो तेव्हा ही प्रक्रिया मंदावते व आपल्याला थकवा येतो.
भिजवलेले मूग, कलेजी यांमधे Co Q10 भरपूर प्रमाणात असते म्हणून हे पौष्टीक पदार्थ खाऊन आपल्याला तरतरी येते.
नैसर्गिक तर्हेने आपल्या शरीरात ताकद वाढावी यासाठी सादर आहे चमचमीत ‘ हिरव्या मसाल्यातील कलेजी’ !!
