मृत्यू, समाधान आणि मनःशांती
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
मी आणि माझे यजमान डॉ. कमलेश दोघेही पक्के मुंबईकर, ऑगस्ट २००० मधे बंगलोरला आलो. मुंबईत असताना आम्ही दोघेही भारतीय कंपन्यांमध्ये काम करत होतो. इथे यजमानांची बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी होती. एका दिवसात आमचे विश्र्वच बदलले.
बंगलोर म्हणजे तरुणाईचे गाव. आयटीची पंढरी. पैशाचा महापूर. तरुणांच्या हातात खुळखुळणारा अमाप पैसा, परदेशवार्या, चकाचक मॉल्स, पिझ्झा-बर्गर. एम.जी. रोड-ब्रिगेड रोडला गेलो तर बंगलोर आहे की अमेरिका असा प्रश्न पडावा. कंपनी पिकनिकस्, विकेन्ड गेट-टूगेदर अशी अमेरिकन लाइफस्टाइल चालू झाली. एक-दोन वर्षांनी या सर्वांनी केलेले गारुड ओसरले. ‘ something ismissing’ चा भुंगा मेंदू पोखरु लागला. सगळया ऐवर्श्यांत राहूनही ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे वाटू लागले. काय खटकते आहे ते काही कळेना. आमचीच नाही तर महाराष्ट्रातून आलेल्या बहुतेकांची ही व्यधा होती.
असे वरवर सर्व व्यवस्थित चालू असताना परत आमच्या आयुष्यात भयंकर उलथापलथ झाली. काहीही बाह्य लक्षणे दिसत नसताना मला मार्च २००६ मधे अतिशय दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनाही फारशी आशा नसल्याने आम्ही ट्रीटमेंटसाठी परत मुंबईला आलो. यमदूत घरात ठिय्या देऊन बसले. ८-१० महिने धुमशान ट्रीटमेंट झाली पण कॅन्सर काही दाद देईना. सर्वाना गुड-बाय करायची वेळ आली.
मग आम्ही दोघांनी ही लढाई आमच्या पद्धतीने लढायची ठरवली. जगभरातल्या कॅन्सवरच्या संशोधनाचा कमलेशने कसून अभ्यास केला. मला सारांशरुपाने सांगितला. मला जमेल तितके मी आचरणात आणले. आयुष्याकडे पाहायची दृष्टी बदलली. लाईफस्टाइल बदलली. स्ट्रेस किल्स. तेव्हा छोटया छोटया गोष्टींनीही येणारा ताण काढून टाकायचा प्रयत्न केला. संतुलित आहार, व्यायाम, योग, ध्यान-धारणा यांचे सकारत्मक, चांगले परिणाम दिसू लागले. मृत्यूच्या छायेतही अपूर्ण मनःशांती मिळू लागली.
आम्ही आता दुसर्या रुग्णांना समुपदेशन करतो. धीर देतो. आम्हाला उमजलेला ज्ञानाचा फारदा त्यांनाही देतो. रुग्णांचा आहार सुधार, ध्यानाचे धडे द्या. योगनिद्रेने वेदनाशमन कसे करावे, घरच्या लोकांचे शंकासमाधान करा या सर्वांतून आम्हाला भरभरून समाधान मिळू लागले. पेशट, त्यांच्या घरचे लोक आणि आम्ही यांच्यात एक ‘दर्दका रिश्ता’ किंवा ‘दुःखाचा आनंदमय सेतू’ तयार झाला.
आता आम्हाला कळले की बंगलोरला काय उणे होते ते. बंगलोरला आपण सुबत्तेच्या महापूरात बेटांवर राहतोय. तिथल्या स्थानिक लोकांशी, प्रश्नांची आपला काहीही संबंध नाही. दुसर्याला काहीतरी द्यायची उर्मी माणसात, स्वाभाविकपणे असते. त्या उर्मिला व्यक्त व्हायला मार्ग नाहीय. माणसामाणसात आपण सेतू बांधलेच नाहीत. म्हणून आपल्याला एकाकी वाटतयं, खारीचा वाटा उचलूया. छोटया छोटया गोष्टींनी सुरु करुया. बंगलोरला परत आल्यावर छोटे छोटे सेतू कसे बांधायचे याची रुपरेषा मनात तयार व्हायला लागली आहे
.©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
पूर्वप्रसिद्धी – गणेशोत्सव विशेषांक, इंदिरा नगर मराठी मंडळ, बंगळुरु. ऑगस्ट २००९
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
ext
