मृत्युला सामोरे जाताना- भाग १
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कॅन्सर म्हणजे अकस्मात झडप घालणारा वेदनादायी मृत्यू ते कॅन्सर आणि त्याच्या अनुषगाने येणार्या इतर व्याधींमुळे होणार्या यमयातनांतून सुटका देणारा मृत्यू अशी मृत्यूची दोन टोकाची रुपे आपल्याला पाहायला मिळतात. काहीही असले तरी कॅन्सर म्हणजे मृत्यू हेच समीकरण जनसामान्यांच्या मनात घर करुन आहे. त्यामळे कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्ण आणि त्याचे नातेवाईंक मनातल्या मनात आवराआवरीचीच तयारी करु लागतात. कॅन्सरचे निदान झाल्यावर मीही अशीच निरवानिरव करु लागलेले..
मृत्यू कुठल्याही वयात आला तरी भयच मनात दाटते. वृद्धपणी आपण अंथरुणावर खिळल्यावर आपले कोण करणार? आपल्या साथीदाराचे काय होणार? ही भीती. माझ्यासारख्या मध्यमवयीन, अर्धवट संसार झालेल्यांना आपल्या लहान लेकरांचे काय होणार? त्यांच संगोपन कोण करणार? आपल्या जोडीदाराला आपल्यामागे किती कष्ट पडतील ही चिंता. या आजारचे गांभिर्य कळण्याचे वयचं नसलेल्या अजाण बाळांबद्दल काय बोलणार? पोटच्या गोळयाचं दुःख अमर्याद. त्यांच्या पालकांच्या दुःखाची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. खर्चिक उपचारांमुळे सगळयाच रुग्णांच्या घराचे अर्थकारण कमीअधिक प्रमाणात बिघडलेले.
कॅन्सरचे किंवा कुठल्याही जीवावरच्या दुखण्याचे निदान व्हायच्या क्षणापर्यंत प्रत्येक निरोगी माणूस स्वतःच्या मृत्यूची कल्पना अंगावर पडलेल्या पालीसारखी झटकून टाकत असतो. ‘मी मरायला कधीही तयार आहे. कशाला मरणाला घाबरायचे’? असे वरवर आपण बेफिकीरीचा आव आणून म्हणत असतो. आजूबाजूला यम आपले पाश फेकत असताना आपणही एक दिवस मरणार आहोत हया कल्पनेलाही सर्वसामान्य माणसाच्या मनात थारा नसतो. त्यामुळेच कॅन्सरचे निदान झाल्यावर अचानक आपल्याला दाराशी उभे ठाकलेले यमदूत दिसतात आणि आपण अंतर्बाह्य हादरुन जातो. अपुर्या राहिलेला इच्छा, आकांक्षा, कर्तव्य मनःचक्षूसमोर फेर धरतात, संसाराचे पाश मागेे ओढतात. जीवनाच्या सीमेपलिकडे असलेला अंधारी, अज्ञात प्रदेश मनात भिती उत्पन्न करतो. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? मृत्यूनंतर आपले काय होते? हा या भितीला फुटलेला अजून एक छोटासा फाटा. भिती नक्की कशाकशाची वाटते आणि त्याचे मूळ कारण काय? त्यावर उपाय काय? प्रश्नांचा पद्धतशीरपणे मागोवा घेतल्यास आणि शांत डोक्याने या निरगाठींची उकल केली तर येणारा मृत्यू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सन्मानाने स्वीकारता येईल. प्रियजनांच्या ताटातूटीने दुःख तर होणारच पण मागे राहिलेल्या आयुष्य उध्वस्त होणार नाही. जीवनाच्या लांबीरुंदीला जेव्हा मृत्यूच्या खोलीचे परिणाम लाभते तेव्हा आयुष्य अधिक अर्धपूर्ण बनते. आता औषधोपचारांनी आजार बरा झाला तरी मृत्यू आज नाही पण अजून १० वर्षांनी, २० वर्षांनी, २५ वर्षांनी तरी कुठल्यांना कुठल्या स्वरुपात गाठणारच आहे आपल्याला. तेव्हा हा केलेला गृहपाठ आयुष्यात अनेक कठीण प्रसंगी उपयोगी पडतो.
कुठलाही गंभीर आजार आणि मृत्यू यांच्याशी निगडीत असलेला पहिला आणि खूप छळणारा प्रश्न म्हणजे ‘मीच का?’ आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाची निरोगी माणसे पाहिली की स्वतःच्या दुर्दैवाद्दल खूप वाईट वाटते. सरळ उत्तर नसणारा हा प्रश्न आहे. पूर्वजन्माच्या कर्मांची फळे किंवा या जन्माच्या पापांची सजा हे आपल्या तोंडावर निर्दयपणे फेकलं जाणारं उत्तर. पण पूर्वजन्म कुणी पाहिलाय? आणि या जन्मीच्या पापाचं म्हणल तर पापभीरु, चारचौघं सर्वसामान्य माणसे जितकं पाप करतात तितकच पाप आपण करतो. समाजाला नानातर्हेने वेठीस धरणारे बुरख्याआडचे गुुन्हेगार तर सुखात आयुष्य घालवताना आपण पाहातो. तेव्हा हे उत्तर काही खरं नाही.
‘मीच का’? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निसर्गात सापडतं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. अंडयात/गर्भात असलेलं पिल्लू, नुकतेच जन्मलेले पाडस, स्थलांतर करणारे तरुण प्राणी-पक्षी ते जखमी, गालितगात्र झालेल्या म्हातार्या सिंहाला खाणारे तरस यातील कुणालाच ते चुकले नाही. विविध रोग, अन्नाची कमतरता, दुष्काळ, पूर, भूकंप, परभक्षी शिकारी अशा नानाप्रकारे निसर्ग प्राणीमात्रांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. लढाई, दहशतवाद, अपघात अशी मानवनिर्मित कारणेही त्याला हातभार लावतात या सर्वांमुळेच जीवसृष्टीचा तोल सांभाळला जातो. या जीवनचक्रात आपणही फिरत असतो. पण मृत्यूचा प्रकाशझोत आपल्यावर पडल्यावर अन्याय झाल्याची भावना मनात घर करते. तसे पाहिल्यास कुुणाच्याच जीवाची शाश्वती नाही. निरोगी माणसालाही अपघात, बॉम्बस्फोट इ. च्या रुपात मृत्यू कधीही गाठू शकतो. जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तर हजारो लोक एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. हजारो कुंटुब उध्वस्त झाली. हे विश्व नश्वर आहे ही संकल्पना एकदा नीट समजून घेतली की ‘मीच का?’ या वेदनेची धार खूप बोथट होते.
या जगाच्या रंगभूमीवरुन आपल्या एविझट होण्यामुळे काही प्रश्न उद्भवतात त्यांचा विचार करुया. सर्वात मोठा प्रश्न आर्थिक. आपल्यानंतर आपल्या जोडीदाराचं आणि मुलाबाळाचं कसं होणार ही विवंचना फार मोठी. विशेषतः कर्त्या पुरुषाला. यासंबंधी सविस्तर उहापोह ‘आजाराचे अर्थकारण’ या प्रकरणात केला आहे. जमतील तितके पैशाचे, मालमत्तेचे व्यवहार मार्गी लावणे हा त्यावरचा व्यावहारिक उपाय.
आयुष्याचा बरावाईट उपभोग घेऊन झाल्यावर वृद्धापकाळी आजाराने गाठल्यास त्यातून येणार्या शारीरीक दौर्बाल्याची आणि परावलंबित्त्वाची भिती वाटते. त्यावेळी आपलं कोण करणार ? ही मोठी काळजी. पण त्याबद्दल चिंता करुन काही उपयोग नाही. त्यावेळेला जे होणार ते आपण थांबवू शकत नाही. ते शांतपणे, क्षमाशील वृत्तीने सहन करावे. घरच्या लोकांवर भार घालायचा नसल्यास शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी काही ठिकाणी हॉस्पाइसची सुविधा आहे. वेदनाशामक औषधे देऊन येणारा मृत्यू खूप सुसह्य केला जातो.
संसार अर्धवट असताना आपल्या अजाण मुलांचे काय होणार, त्यांचे संगोपन करायला आपण नसणार ही चिंता काळीज पोखरते. पण मुलांना आपला विश्वास बसणार नाही इतकी समज असते. त्यांना समजेल अशा भाषेत आजाराचे गंभीर स्वरुप सांगितले तर नक्की समजते. मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हा माझा मुलगा पावणेचार वर्षांचा होता. त्याला आम्ही सर्व एक्स रे , स्कॅन्स दाखविले. त्याला समजेल अशा स्वरुपात माझा आजार, त्यावरचे उपचार सांगितले. माणूस मेल्यावर कसा देवबाप्पाकडे जातो आणि परत काही काळाने पुन्हा लहान बाळ होऊन पृथ्वीवर येतो या जीवनचक्राशी त्यांची तोंडओळख करुन दिली. त्या इवल्याशा जीवाने आम्हाला या कठीण काळात कल्पनेपलिकडे साथ दिली. आप्रस्वकीयांच्या निर्दयी वागण्याचा हसत हसत सामना केला. सर्व प्रसंगाला धीराने तोंड दिले.
मुले सर्व अडथळयातून पार पडून, शिक्षण पूर्ण करुन आयुष्यात स्थिरस्थावर होईपर्यंत तर आपले छत्र त्यांच्यावर नसणार ही उणीव कशी भरुन काढावी? मुलांचे (आणि त्याबरोबर आपोआप होणारे आपलेही) सक्षमीकरण-सबलीकरण! नेहमी घडणार्या छोटया छोटया गोष्टींमधून, त्यांच्या आवडत्या कार्टूनमधून, सिनेमांमधून मुलांशी हसतखेळत संवाद साधावा. ‘तुला या बद्दल काय वाटते? तसेच का वाटते? त्याचे भविष्यात परिणाम काय?’ असे प्रश्न विचारुन मुलांना स्वतंत्रपणे विचार करायची सवय लावावी. त्यांचा जगातील चांगल्या मूल्यांवर गोष्टीवर विश्र्वास राहिल हे पाहावे. पण त्याचबरोबर जगातील वाईट गोष्टींची जाणीव करुन द्यावी. त्यांच्यापासून आपले संरक्षण कसे करावे हे शिकवावे. कुठल्याही गोष्टीचा कालातीत, स्वतंत्र साकल्याने विचार कसा करावा, प्रतिपक्षाचा आदर ठेवूनही आपली मते ठामपणे कशी मांडावीत हे सांगावे. आपल्या कामाची पूर्णपणे जबाबदारी घेऊन दया, प्रेम क्षमाशील वृत्तीने तरीही कणखरपणे, मान ताठ ठेवून कसे वागावे, हे मुलांना शिकवता शिकवता आपलेही जगणे समृद्ध होत जाते. आपल्यामागे आपलं पिल्लू थोडं गांगरेलही पण नंतर आकाशी झेप घेईल इतकं बळ, इतका विश्वास आणि आपल्या प्रेमाचं संचित त्याला द्यावं. माझ्या लहानपणी आजी-आजोबांनी छोटया छोटया गोष्टींतून समजावलेलं, साध्या वाक्यांतून सांगितलेलं जीवनाचे तत्त्वज्ञान माझ्या मनात खोलखोल रुजून राहिले. या गंभीर आजारात मला लढायला बळ दिले त्याने. ‘माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मी असले- नसले तरी त्या प्रेमाची कवचकुंडले तुझं कायम रक्षण करतील.’ एवढा विश्वास आपण मुलांच्या मनात बिंबवावा. आयुष्यभर पुरतो तो. निरपेक्ष प्रेमाची अमृतधारा जीवनाला संजीवनी देते.
कॅन्सरशी ४ वेळा लढलेल्या ७६ वर्षांच्या रेखाताई आणि त्यांच्या यजमानांनी मला एक मोलाचा सल्ला दिला, ‘देवाकडून रोज एक फक्त एक दिवस – २४ तास मागायचे. ते २४ तास जणू शेवटचेच २४ तास असे समजून समरसून, आनंदाने जगायचे. रात्री झोपताना घालवलेल्या २४ तासांबद्दल देवाचे आभार मानायचे.’ पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी देवाकडे २४ तास मागायचे.’’ असं करता करता किती काळ आनंदात जाईल. काय झालं आपल्याला खूप आयुष्य नसंल तर! काय झालं आपल्याला पुढच्या ५-१०-२०-२५ वर्षांचं नियोजन करणं शक्य नाही तर! पण हातात असलेले २४ तास तर आपण भरभरुन प्रत्येक क्षण अन् क्षण जगू शकतो. आपल्या आजूबाजूला पाहा. बहुसंख्य नॉर्मल माणसं नुसती जिवंत असतात. आयुष्य जगत नसतात. आयुष्य किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे फार महत्त्वाचं आहे! आयुष्याचं फुल कोमेजायला लागलयं. ते आज नाहीतर उद्या कोमेजतेच. कॅन्सरचं अवकाळी निमित्त झालयं. परंतु इतका काळ ते फुल उमलंल याचा आनंद मनवायला नको?
कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा
रडत रडत की गाणं म्हणतं|
फुल कोमेजल्यावर त्याचं निर्माल्य व्हायला हवं.
बौद्ध तत्त्वज्ञान असं मानतं की कॅन्सर झाल्यावर माणसाची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. वेदनेच्या मार्गानेच जीवनाचे शाश्वत सत्य गवसते. बाहय संवदेना क्षीण व्हायला लागल्या की अंतरंगातील बासरीचे स्वर ऐकू येऊ लागतात. त्या दिव्य संगीताने ह्दयात ज्ञानाचा प्रकाश फाकतो. जाणीवा समृद्ध होतात. अलौकिक शांतीचा अनुभव येतो. त्या दिव्य तेजाने भयाचा, वेदनेचा अंधकार दूर पळतो. विष्णुच्या/ आपल्या कुलदेवतेच्या सगुण रुपाचे ध्यान करावे. नाम देहाच्या रंध्रारध्रातून प्रकटावे. असा हा सर्व पुण्याचा संचय घेऊन प्रसन्न मनाने त्या दिव्य, शाश्वत तेजात विलीन व्हावे|
तमसो मा ज्योर्तिगमय्
मृर्त्योSमा अमृतम् गमय।।
©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
मला आदर्शवत वाटणारी मृत्युला धैर्याने अलिंगन देणार्या डोरोथीची ही कथा. ‘दी तिबेटीयन बुक ऑफ लिव्हिंग ऍण्ड डाइंग’ मधील
(लेखक- सॉग्यल रिन्पोचे)
डोरोथी ही लंडनमध्ये राहणारी टूरगाइड आणि पुरातन वस्तूतज्ञ. आयुष्याच्या शेवटी तिला बौद्ध तत्त्वज्ञानाने आकर्षून घेतले. कॅन्सर तिच्या शरीरात खोलवर पसरला होता आणि एकेक अवयव निकामी होत होते. वेदनाशामक गोळया घेऊनही असह्य वेदना होत असत. खाणे-पिणे जवळजवळ थांबत आले होते. परंतु मित्र-मैत्रिणी भेटायला आल्यावर तिच्या चेहर्यावर अपार आनंद आणि शांती विलसत असे. काळाने झडप घालाण्यापूर्वी तिने सर्व व्यावहारीक गोष्टींची पूर्तता केली. आपल्या जाण्यानंतर कुणालाही थोडाही त्रास होऊ नये हा तिचा उद्देश्य. घरी एकटीने राहाणं मुश्कील झालं तसं ती हॉस्पाइसध्ये गेली. वर्षानुवर्ष कलात्मक वस्तूंनी भरलेलं तिचं घर, पण सहजपणे तिने त्या घराचा निरोप घेतला फक्त एक छोटीशी बॅग बरोबर घेऊन.
हॉस्पाइसमधील खोलीत तिने मंदिरातले पवित्र वातावरण निर्माण केले. तिच्या बौद्ध गुरुंचा फोटो टेबलावर असे. त्यासमोर कायम एक मेणबत्ती लावलेली. इंद्रधनुष्याचे सुंदर चित्र तिला पडल्यापडल्या दिसावे अशा तर्हेने समोरच्या भिंतीवर लावलेले. सुह्दांनी आणलेली सुंदर, सुवासिक फुले खोलीभर. सर्व परिस्थिती जणू तिच्या नियंत्रणाखाली होती. हसतमुखाने, आत्मविश्वासाने ती सर्वांचं स्वागत करत असे. तिला पाहून तिच्या मित्रमैत्रींणींना मनोमन उमजले की मृत्यू ही घाबरण्याची गोष्ट नाही. शरीर दिवसेन्दिवस क्षीण होत असताना तिच्या चित्तवृत्ती मात्र तेजाने बहरत होत्या. देहाची जीर्ण वस्त्रे उतरवून पुढच्या प्रवासाला जायला तिचा आत्मा तयार होता. ती रोज ध्यान करत असे. मित्रमैत्रिणी तिच्याबरोबर मंत्राची आवर्तने करीत, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचत किंवा शांतपणे बसून राहात. ‘आता थोडाच काळ’ असे तिने गुरुंना सांगितले, गुरु म्हणाले, ‘त्या दिव्य प्रकाशात मन शांत कर.’’
तिच्या शेवटच्या दिवसांत सलाईनवाटे द्रवपदार्थही अंगात जाईना. मृत्यूचा थेट अनुभव घेता यावा, त्या दिव्य प्रकाशात न्हाता यावं म्हणून तिने वेदनाशामक औषधेही नाकारली. हातपाय पोटाशी घेऊन गर्भातील बाळासारखी सारखी ती निपचित पडून राहीली. जाणीव-नेणीवेचा लपंडाव चालू होता. अचानक एका क्षणी तिने मैत्रिणीला डोळयांनी सांगितले,’ आलं बोलावणं’ दोन श्वासानंतर तिचा जीव कुडीतून उडून गेला. दिव्य तेजात विलीन झाला! 🙏🙏🙏
r own text
