किमोथेरपी

डॉ. ऋजुता  कुशलकर
drrujutak@gmail.com

माणसाला भितीही अज्ञात गोष्टींचीच वाटते. किमो आणि त्याचे साइड इफेक्ट्‌स याबद्दलही असेच प्रचंड अज्ञान जनमानसात आहे. या भीतीबद्दल शास्त्रीय पद्धतीने विचार न केल्याने, एकमेकांशी न बोलण्यामुळे ही भीती अजूनच वाढत जाते. या संकेतस्थळाच्या – कॅन्सर मंथनच्या माध्यमातून कर्करोग, त्यावरील उपचार, त्यांचे दुष्परिणाम आणि रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना येणार्‍या अनंत अडचणी या सर्वांसमोर मांडण्यात याव्या. त्यावर शास्त्रीय माहिती सांगावी. त्रास सुसह्य करण्यासाठी छोटे छोटे उपाय सुचवावेत. यावर साधकबाधक चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. इंटरनेटवर इंग्लिशमध्ये अशी माहिती खूप आहे. पण भारतातील जनतेसाठी ही माहिती मराठी-हिंदीमध्ये उपलब्ध व्हावी जेणेकरून या भयंकर आजाराचा सामना आपण धैर्याने करू शकू ही तळमळ आहे.

कॅन्सर झाला म्हणजे टाटाला जाऊन किमो घ्यायचं आणि बरं व्हायचं किंवा किमोत केस जातात एवढीच बहुमूल्य माहिती किमो सुरू व्हायच्या आधी मला होती. किमोचा फार त्रास होतो हेही ऐकून होते. पण किमोबद्दल बोलायला कुणीच पेशंट तयार नसतो. त्या नरकयातनांची आठवणही त्यांना नको असते. दडपून ‘काही त्रास होत नाही.’ ते ‘नको ती आठवण’ अशा दोन टोकांमधल्या प्रतिक्रिया असतात.

किमोथेरपी म्हणजे केमिकल्सनी/औषधांनी केलेले उपचार. या औषधांनी शरीरात कुठेही पसरलेल्या कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात. प्रत्येक उपचारपद्धतीचे काही सामर्थ्य आहे. काही मर्यादा आहेत. शस्त्रक्रियेने कधीकधी ट्यूमर पूर्णपणे काढू शकत नाही. ट्यूमर खूप मोठा असल्यास किंवा नाजूक अवयव असल्यास रेडिएशन पूर्णपणे देता येत नाही पण किमोची औषधे मात्र रक्तात मिसळून शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात. कॅन्सर जेव्हा एकापेक्षा जास्त ठिकाणी पसरलेला असतो तेव्हा किमो म्हणजे वरदानच. किमोची औषधे ही सहसा इंजेक्शन किंवा तोंडाने घ्यायच्या गोळ्या या स्वरूपात असतात. इंजेक्शन सलाईनमधून हळूहळू दिले जाते.

कॅन्सरच्या पेशी पटापट वाढतात. या वेगामुळे त्यांच्या वाढीमध्ये अनेक त्रुटी राहतात व त्या त्यांचे नियोजित कार्य करू शकत नाहीत. एका अर्थाने कॅन्सरच्या पेशी म्हणजे वाया गेलेली, वाईट मार्गाला लागलेली मुले. समाजात/शरीरात अस्वस्थता निर्माण करणारी. किमोची औषधे वेगवेगळ्या प्रकारे या पेशींना मारतात. काही औषधे कॅन्सरच्या पेशींना मारतात. काही औषधे त्यांना वाढीपासून थांबतात. काही पेशींतील  DNA/RNA बनवणं थांबवतात. ट्यूमरचा प्रकार, पेशंटचे वय, शारीरिक स्थिती, पेशंटवर होणारे साईड इफेक्टस या सर्वांचा साकल्याने विचार करून औषधयोजना केली जाते. जास्त परिणामकारक होण्यासाठी खूपदा एकापेक्षा अधिक औषधे एकत्र दिली जातात. किमोची Cycles ठरावीक काळाने, ठराविक मात्रेत, ठराविक संख्येत दिली जातात. किमोच्या औषधांचा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होत असतात त्यामुळे आयुष्यात एक औषध अमुकच मात्रेत देता येते. किमोची औषधे दररोज/ एक दिवसाआड/ दर आठवड्याला/ पंधरा दिवसाला/२१ दिवसांनी अशी दिली जातात. अशी चार, सहा, आठ, बारा इ. cycles दिली जातात. किमोची औषधे कॅन्सरच्या पेशींबरोबरच शरीरातील चांगल्या पेशींवरही हल्ला करतात. त्यामुळे हृदय, यकृत, मूत्रपिंड इ. महत्त्वाच्या अवयवांवरही दुष्परिणाम होतात, म्हणून दरवेळी पुढचे सायकल सुरू करायच्या आधी रुग्णाच्या विविध चाचण्या केल्या जातात. यकृत, मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालले आहे ना? रक्तातील हिमोग्लोबिन, लाल-पांढर्‍या पेशी, प्लेटलेटस यांचे प्रमाण ठिक आहे ना? पेशंटचे वजन, शारीरिक स्थिती, इतर साइड इफेक्टस या सर्वांचा साकल्याने विचार करून पुढचे औषध दिले जाते. C.T. Scan, सोनोग्राफी व इतर टेस्टचा वापर करून औषधांचा ट्यूमरवर होणारा परिणाम जोखतात. त्याप्रमाणे औषधांची मात्रा बदलतात. अनेकदा प्रथम किमो देऊन ट्यूमरचा समूळ नायनाट करण्याचा डॉ. प्रयत्न करतात. रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना वाटते की इतक्या टेस्ट का करतात पण अतिशय गुंतागुंतीचे असे हे शास्त्र आहे. पेशटंच्या आयुष्याशी संबंध असल्यामुळे डॉक्टरना अतिशय विचारपूर्वक औषधयोजना करावी लागते. अनेक नवनवीन, प्रभावी औषधांच्या शोधामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्‍या कॅन्सरवरही उपचार होऊ शकतात. उदा. काही प्रकारचे ब्लड कॅन्सर.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे किमोचेही साईड इफेक्टस आहेत. किमोची औषधे वेगाने वाढणार्‍या पेशींना मारतात. मात्र असे करताना कॅन्सर पेंशींबरोबरच शरीरातील इतर चांगल्या पेशींवरही हल्ला करतात. उदा. लाल-पांढर्‍या रक्तपेशी, त्वचा, केस, तोंड ते गुदद्वार यावरचे श्र्लेष्मल पटल इ. शरीराचा सर्व तालच बिघडतो. शरीराच्या या प्रतिसादाने रुग्ण सैरभैर होतो. त्यातच शतजन्माचा थकवा तनामनाला शोधत येतो. रुग्ण ‘किमोचा’ मनोमन धसका घेतो. अनेक पेशंट या धसक्याने ‘किमो’अर्धवट सोडतात. उलट्या, अतिसार जंतुसंसर्ग यापायी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. मग किमोच्या दोन सायकलमधील अंतर वाढते. असे अंतर वाढले की औषधांची परिणामकता कमी होते. काही रुग्णांना तर साईड इफेक्टसचा इतका त्रास होतो की नाइलाजाने किमो मध्येच बंद कराव्या लागतात.

हे सर्व कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी सर्वप्रथम मन शांत ठेवावे. किमोचा त्रास झालातरी तो तात्पुरता असतो. किमो बंद झाल्यावर शरीर हळूहळू पूर्वपदावर येते. तेव्हा आजारातून बरे होण्यासाठी थोडा काळ त्रास सोसणे भाग आहे. कुठल्याही त्रासाचा किंवा संकटाचा पद्धतशीर सामना केल्यास त्याची तीव्रता खूप कमी होते. आपल्याला काय होते आहे? लक्षणे काय? का होत आहे? कारणे काय? याचा अंदाज एकदा आला की त्यावर काय उपाय करायचे हे ठरविता येते. कॅन्सरचा मुकाबला करताना हे भान रुग्णाने आणि त्यांच्या नातेवाइकांनी (कठीण गोष्ट आहे तरीही) कायम ठेवावे.

  • किमोचा सर्वांत वाईट परिणाम होतो पांढर्‍या पेशींवर. या पांढर्‍या पेशी म्हणजे शरीराचे जंतूंपासून रक्षण करणारे सैनिक. त्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने सर्दी खोकल्यासारखे साधे आजारही अक्राळव्रिकाळ स्वरूप धारण करतात. ताप, अतिसार, उलट्या इ. गोष्टींनी पेशंट हैराण होतो. हे आजार जर प्रतिजैविकांनी आटोक्यात आले नाहीत तर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. मग दोन किमोमधील  कालावधी वाढतो. म्हणून किमो चालू असताना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून जपावे.
  • घरातल्या माणसांनी अतिशय स्वच्छता पाळावी. बाहेर घातलेले कपडे रूग्णाजवळ ठेवू नये.घरच्या मंडळींनाही सर्दी, खोकला, ताप आल्यास ताबडतोब औषध घ्यावे.
  • भेटायला आलेली मंडळीही ट्रेन, बसचा प्रवास करून आलेली असल्यास त्यांना हातपाय स्वच्छ धुऊन मगच रुग्णाला भेटायला दयावे.
  • सर्दी, खोकला, ताप इ. संसर्गजन्य आजार झालेल्या पाहुण्यांनी शक्यतो रुग्णाला लांबूनच भेटावे.
  • गर्दीची ठिकाणे टाळावीत. कामासाठी बाहेर जायचे असल्यास कमी गर्दीची वेळ निवडावी. किमो चालू असताना (हॉस्पिटलला जाणे वगळता) शक्यतो दूरचे बस, रेल्वेने प्रवास टाळावेत.
  • आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतागृहे अतिशय अस्वच्छ असतात. त्यातून पेशंटला लगेच जंतुसंसर्ग होऊ शकतो म्हणून त्यांचा वापर टाळावा.
  • कधी कधी डॉक्टरच बाहेर जायचे असल्यास तोंडाला मास्क लावून जायला सांगतात.
  • पाणी उकळून प्यावे.
  • कुठेही बाहेर जाताना आपल्याबरोबर आपले एकवेळचे खाणेपिणे बरोबर ठेवावे.
  • अंगावरचे कपडे, अंथरूण पांघरूण स्वच्छ वापरावे.
  • किमो चालू असताना नॉशिया, उलट्या, मळमळ यामुळे अन्न जात नाही. त्यामुळे अतिशय थकवा येतो. पेशंटचे वजन भराभर कमी होते. थकव्याने अन्नावरची वासना अजून कमी होते. हे दुष्टचक्र भेदणे अतिशय कठीण असते. यासाठी कमी तेलात/साजूक तुपात बनवलेले बिनातिखट, भरपूर भाज्या असलेला सात्त्विक चौरस आहार घ्यावा. (असे जेवण कसे बनवावे यासाठी ‘मी काय खाऊ’ हा लेख पहावा.)
  • कितीही उलट्या झाल्या तरी पोटातले सर्व अन्न उलटून पडत नाही. थोडेसे तरी पोटात शिल्लक राहते. तेव्हा एखाद्या  व्रताप्रमाणे थोडे थोडे अन्न घ्यावे/खात रहावे. भाजलेले चणे, राजगिरा चक्की, साळीच्या लाह्या, फळे, भाताची पेज, भाज्यांचे सूप या गोष्टी  नेहमीचे जेवण जात नाही तेव्हा खाव्यात. किमो घेतल्यानंतर ५-६ दिवसांनी हा त्रास कमी कमी होतो.
  • किमोच्या औषधांमुळे आतड्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठता होते. मूळव्याध, फिशर यासारखे विकार उद्भवू शकतात. मलविसर्जन सुलभतेने व्हावे यासाठी डॉक्टरही औषध देतात. आहारातही दुधी, लाल भोपळा, पडवळ, शिराळा ,भेंडी अशा भरपूर तंतू असलेल्या भाज्या खाव्यात. एक दिवसाआड पालेभाज्या खाव्यात, फळे खावीत.
  • किमो, रेडिएशनमुळे सर्वांगाचा दाह होतो. कायम एका भट्टीत असल्यासारखे वाटते. घशाला शोष पडतो. कितीही पाणी प्याले तरीही जिवाची तगमग थांबत नाही. ही आग आग कमी होण्यासाठी आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. (दिवसाला २-३ लि.) अगदी मोजून प्रयत्नपूर्वक प्यावे.
  • नुसत्या पाण्याचीही चव नकोशी वाटते. उलटून पडेल असे वाटते. तेव्हा पाण्यात पुदीना, मध, लिंबू, आवळा/कोकम सरबत, थोडासा आल्याचा रस, सब्जा, तुळशीचे बी घालून चव बदलून प्यावे.
  • शहाळपाणी दुपारी चारच्या आधी प्यावे. (खूप शहाळपाण्याने पावसाळ्यात/थंडीत कफ होण्याचा संभव असतो तेव्हा तारतम्याने प्यावे.)
  • तांदळाची पेज, ताजे ताक यांनीही शरीराला थंडावा येतो.
  • सर्वांत उत्तम म्हणजे धणे-जिर्‍याचे पाणी. एक लीटर पाण्यात २-३ चमचे धणे जिर्‍याची पूड (३ः१) घालावी. दोन-तीन तासात हे पाणी संपवावे. दुपारी परत पूड घालून नवीन पाणी बनवावे. अंगाची लाही लाही खूप प्रमाणात कमी होते,
  • ट्रीटमेंट संपल्यावरही धणे- जिर्‍याचे पाणी पित राहिल्यास शरीर थंड राहते.
  • किमोमध्ये केस जातात. किमोच्या तीव्रतेप्रमाणे कमी- अधिक प्रमाणात केस जातात. स्त्रियांना तर त्याचा फारच धक्का बसतो. जिवावरचं केसांवर निभावलं म्हणावं आणि पुढे निघावं.
  • हातापायाची नखे काळी पडतात. चेहराच काय सर्व शरीरच काळे ठिक्कर पडते. आरशात पाहू नये असे वाटते. विद्रूप शरीराकडे पाहून दुर्बल झालेलं मन खंतावते. असा ग्रहण लागलेला रुग्ण पाहून, सुहृदांच्या काळजाला चरे पडतात तर इतरेजनांच्या नजरेतील कीव पाहून रुग्ण घायाळ होतो. पण ट्रिटमेंट संपल्यावर केस हळूहळू परत येतात. त्वचाही आपला मूळ वर्ण घेते.
  • किमो चालू असताना आंघोळीच्या आधी १० मिनिटे हातापायांची नखं आणि शरीराला खोबरेल तेल हलक्या हाताने लावावे. पिअर्स किंवा बेबी सोप वापरावा. त्याने त्वचा कोरडी पडत नाही. शरीर कमी काळवंडतं आणि नंतर मूळ वर्णही लवकर परत येतो.
  • नाकातील केस आपल्या अस्तित्वाचे अवडंबर न माजवता मोठे कार्य करत असतात. बाहेरून येणारी हवा हे केस गाळून आत पाठवतात. पण नाकातील केसही गळून गेल्यामुळे बाहेरच्या हवेतील सूक्ष्म कण नाकाला गुदगुदल्या करू लागतात. नाकपुडीतील त्वचा कोरडी पडते. गरम श्र्वास आत जाऊ लागतो. सर्दी झाल्यासारखे वाटून डोके जड होते. कितीही वाफ घेऊन ही अस्वस्थता जात नाही.
  • यावर अगदी साधा उपाय म्हणजे नाकाच्या आत दिवसातून दोन-तीन वेळा खोबरेल-तेलाचे बोट फिरवायचे. सर्व अस्वस्थता लगेच दूर होते.
  • किमोमुळे प्रत्येक सायकलच्या सुरुवातीचे ४-५ दिवस अतिशय थकवा येतो. अगदी श्र्वास घेणे देखील जड वाटावं इतका थकवा येतो. आपल्याच हातापायाचं आपल्याला ओझं होतं. नेहमीची कामेही करायला होत नाहीत याचे मनाला फार क्लेश होतात. रुग्ण मनाने खचतो. थकवा वाढतो तसे नैराश्यही वाढते. पण हळूहळू हा थकवा जातो. खाणे व्यवस्थित जायला लागल्यावर रुग्ण बराचसा पूर्वपदावर येतो. तोपर्यंत पुढच्या किमो सायकलची वेळ होते! धट्ट्याकट्ट्या पेशंटला कमी थकवा येतो तर दुसर्‍या आजारांनी आधीच शरीर खिळखिळे झालेल्या रुग्णाला जास्त थकवा येतो. प्रत्येक कॅन्सरचा प्रकार हा रुग्णागाणिक वेगळे रूप धारण करतो. त्यामुळे किमोची औषधे किती मात्रेत दिली जातात, प्रत्येक सायकल किती तासांचं/दिवसांचं आहे यावरही येणारा थकवा अवलंबून असतो. रुग्णाचे वय हाही एक महत्त्वाचा घटक आहे. थकवा आणि साइड इफेक्टस क्रमाक्रमाने वाढत जातात. या सर्व कारणांमुळे दोन कॅन्सर रुग्णांच्या आजाराची, औषधांची आणि इतर साइड इफेक्टसची तुलना कधी करू नये.
  • किमो ब्रेन – किमोमुळे मेंदूतल्या पेशींवरही परिणाम होतो. त्यामुळे स्वभावातही खूप बदल होतो. अस्वस्थता, चिडचिड, हताशपणा, राग, दुःख वाढत जाते. असेही कॅन्सर झाला म्हणून रुग्णाच्या मनाचा या भावना पिच्छा पुरवत असतात. या सगळ्याचा परिपाक म्हणून नैराश्य रुग्णाला घेरते. जसजशी किमोची सायकल्स होत जातात तसतसे नैराश्य वाढत जाते. काहीही करायची इच्छा न होणे, अतिशय थकवा, भूक न लागणे, खूप रडू येणे, छोट्या-छोट्या गोष्टींनी चिडणे, पाठच्या दुःखद घटनांची वारंवार आठवण होणे ही नैराश्याची प्रमुख लक्षणे. थकवा वाढतो तसे नैराश्य वाढते आणि नैराश्य वाढते तसा थकवा वाढतो असे दुष्टचक्र असते. यासाठी थोड्या  थोडया वेळाने नियमित पौष्टिक अन्न खावे. शरीराची ताकद टिकवून ठेवावी.  चांगली पुस्तके वाचून, संगीत ऐकून, योग, ध्यान-धारणा याद्वारे मनाची उभारी टिकवून ठेवावी. किमो थांबल्यावर हे बदल हळूहळू कमी होतात.

किमो घेताना हॉस्पिटलमध्ये घ्यायची काळजीः

१) आजकाल किमो छोट्या-छोट्या हॉस्पिटलमध्येही दिले जाते म्हणून किमो घ्यायच्या आधी हॉस्पिटलमधला स्टाफ किमो देण्यासाठी प्रशिक्षित आहे ना? इर्मजन्सीमध्ये डॉक्टर्स चोवीस तास उपलब्ध आहेत का? आयसीयू सारख्या सुविधा आहेत का? याची चौकशी करावी.

२) किमोसाठी कुठली औषधे दिली जाणार, कुठल्या क्रमाने दिली जाणार हे लिहून नीट लक्षात ठेवावे. किमो चालू असताना त्या औषधांच्या क्रमावर आपलेही लक्ष असू द्यावे. औषधांचे साइड-इफेक्टस, त्यावर संभाव्य उपाय, पेशंटला काय त्रास झाला तर हॉस्पिटलमध्ये यायचे, चोवीस तास उपलब्ध असणारा फोन नंबर (डॉक्टरांचा) असे सगळे नीट विचारून ठेवावे.

३) किमोचा डोस हा काही तास ते २-३-५ दिवस इतका असतो. हॉस्पिटलमध्ये राहायची गरज असल्यास पेशंटच्या जेवणाची, नातेवाईकांच्या राहण्याची काय सोय आहे हे पाहून ठेवावे.

४) किमोला जाताना जितके जमेल तितके भरपूर खाऊन जावे. भरल्या पोटी किमोचे साईड इफेक्टस कमी होतात हे एक कारण आणि दुसरे म्हणजे किमो सुरू झाल्यावर नॉशिया, मळमळणे इ. गोष्टींमुळे खाणे कमी जाते. एक दिवसाचेच किमो असेल तर प्रवासाला लागणारा वेळ, किमोला लागणारा वेळ अधिक दोन तास असा हिशोब करून २-३ वेळचे घरचे खाणे जसे चपाती-भाजी, खिचडी-पुलाव, फळे बरोबर घेऊन जावे. शक्यतो बाहेरचे, हॉटेलमधले खाऊ नये. जास्त दिवस ऍडमिट व्हायचे असल्यास फळे, लाडू, भाजलेले चणे, बिस्कीट, राजगिरा चिक्की असा सुका खाऊ जवळ ठेवावा कारण किमो सुरू झाल्यावर नेहमीचे जेवण जात नाही.

५) औषधांची ऍलर्जी, रक्तदाब, मधुमेह, ऍसिडीटी, बद्धकोष्ठता/अतिसार इ. कुठलाही आजार रुग्णाला असल्यास किमो चालू करायच्या आधी डॉक्टरांना कल्पना द्यावी. अर्थात डॉक्टर विचारतातच पण कधी कधी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात.

६) किमो घेताना आधीच्या किमोला काय त्रास झाला. उदा. खूप उलट्या, नॉशिया, बद्धकोष्ठता/अतिसार इ. गोष्टी आवर्जून डॉक्टरांना सांगाव्यात म्हणजे या किमोला तसा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टर औषधयोजना करतात.

७) रुग्णाला झालेला त्रास, शंका असे सर्व एका छोट्या डायरीत लिहून ठेवावे. डॉक्टरांना भेटायला जाताना ही डायरी आर्वजून न्यावी. म्हणजे नंतर काही विचारायचे राहिले असे होत नाही.

किमो पोर्ट

किमोची औषधे सहसा हातातील शिरेतून सलाईनद्वारे दिली जातात. काही किमोनंतर हातातील रक्तवाहिन्या सापडणे  कठीण होत जाते आणि किमोसाठी सलाईन लावणे वेदनादायी होते. रुग्णाची शक्तीही कमी कमी होत गेल्याने खूप चिडचिड होते. या टोचण्यापायी कधीकधी तर ‘किमोच नको’ असे वाटण्यापर्यंत रुग्ण वैतागू शकतो. क्वचित कधीतरी सलाईनची सुई बाहेर निघून औषध आजूबाजूला पसरू शकते. अशा घटनेनंतर तेथील भाग काळवंडतो. डॉक्टर त्यासाठी काही मलम देऊ शकतात. डॉक्टरांना विचारून किमो संपल्यानंतर तेवढ्या भागाला बर्फ लावल्यानेही बरे वाटते.

नेहमीनेहमी टोचण्याच्या ह्या त्रासातून मुक्ती हवी असेल तर ‘किमो पोर्ट’ हा एक चांगला पर्याय आहे. एका छोट्या डबीला जोडलेली एक बारीक रबरी नळी असे पोर्टचे स्वरूप असते. पोर्ट छातीच्या किंवा पोटाच्या क्वचित हाताच्या त्वचेखाली लावले जाते. रबरी नळी छातीच्या किंवा गळ्यातील मोठ्या शिरेतून हृदयाच्या जवळपास जाईल अशी टाकली जाते. या पोर्टमधून सलाईनची सुई टोचून किमो दिले जाते.

पोर्टचे फायदे-तोटेः

१) पोर्ट हे त्वचेच्या खाली असल्याने त्या जागी फक्त एक फुगीर उंचवटा जाणवतो. या व्यतिरिक्त इतर त्रास नाही.

२) पोर्टमुळे किमो घेणे फारच सुसह्य होते. जर रुग्णाच्या शिरा सहजासहजी सापडत नसतील किंवा खूप किमो घ्यायचे असतील तर तुमच्या डॉक्टरशी किमो सुरू व्हायच्या आधीच पोर्टबद्दल बोलून घ्या. एका छोट्या शस्त्रक्रियेने पोर्ट बसवता येते. आर्थिक दृष्ट्या पोर्ट बसवणे थोडे खर्चीक आहे. पण त्यामुळे पुढच्या अनेक त्रासातून सुटका होते.

३) ज्या हॉस्पिटलमध्ये किमो घेणार असाल तिथल्या नर्सेसना पोर्ट हाताळण्यासाठी श्वास प्रशिक्षण मिळाले आहे का याची चौकशी करा.

४) पोर्टमध्ये क्वचित कधीतरी जंतुसंसर्ग होऊन खूप ताप येऊ शकतो. असे झाल्यास तातडीने पोर्ट काढून टाकावे लागते.

५) पोर्ट लावल्यावर खूप वजन उचलणे, झटक्याने खाली वाकणे, मान गरकन फिरविणे, हाताचे-छातीचे जास्त ताण देणारे कठीण व्यायाम करू नये.

६) किमो चालू नसताना दर ४-८ आठवड्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पोर्ट फ्लश करून घ्यावे. त्यामुळे पोर्टमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.

७) योग्य काळजी धेतल्यास पोर्ट २-३ वर्षेही शरीरात राहू शकतो.

आजच्या घडीला तरी किमोला पर्याय नाही. त्याचबरोबर नवनवीन अधिक परिणामकारक आणि कमी साइड-इफेक्टस असणारी औषधे उपलब्ध होत आहेत. किमो घेताना, व्यवस्थित खाणे-पिणे ठेवले, चांगल्या छंदात मन गुंतवले, नियमित थोडा व्यायाम करून शरीर स्वस्थ ठेवले तर किमोही सुसह्य होते.

किमोला जाताना पोटभर, खाऊन जावे. बरोबर एक-दोन डबे घेऊन जावे. दिवसभरात २-३ लीटर पाणी प्यावे. छान गाणी ऐकत किंवा विनोदी व्हिडिओ बघत किमो घ्यावे.

किमो दरम्यान करायचे मेडिटेशन

किमो घेेताना ‘आता मला त्रास होणार इ.इ’ अशा नकारात्मक भावना मनात ठेवू नये. डोळे बंद करावे. हळूहळू एका लयीत थोडासा दीर्घ श्र्वास घ्यावा. ‘हे सलाईन मधून येणारे औषध म्हणजे अमृत आहे. माझ्या शरीरातील कॅन्सरच्या पेशींचा नाश करत आहे. माझे शरीर पूर्ववत होत आहे’ असा विचार करावा. आपल्या सीटीस्कॅन/पेटस्कॅन बघून कॅन्सरच्या पेशी कुठेकुठे आहेत याची रुग्णाला कल्पना  असते. त्या त्या ठिकाणी आपले लक्ष जास्त केंद्रित करावे. सोनेरी/पांढर्‍या शुभ्र/किंवा आपल्या आवडत्या रंगाच्या प्रकाशाने आपले पूर्ण शरीर भरून गेले आहे अशी कल्पना करावी. हा सुंदर प्रकाश आपले शरीर निरोगी करतो आहे, मन आनंदी करतो. आपण आयुष्यातील सर्व दुःख, संताप, हताशपणा विसरतो. अखिल विश्वातील शांती आपल्या तनामनात वस्तीला येते.

यापुढील लेखात आपण रेडिएशन, त्याचे साइड इफेक्टस् , घ्यायची काळजी याबद्दल माहिती घेउया.

©डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर

drrujutak@gmail.com

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.