आमचं जगच वेगळं
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
भारतभर कर्करोगासंदर्भात जनजागृती करणार्या ‘कॅन्सर पेशंट एड असोसिएशन’ तर्फे दरवर्षी २२ सप्टेंबर हा ‘रोझ डे’ म्हणून साजरा केला जातो. नुकत्याच साजर्या झालेल्या ‘रोझ डे’ निमित्त कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाबरोबर जगतानाचे हे अनुभव.
मी जेव्हा नॉर्मल माणसांच्या जगात राहात होते तेव्हाची गोष्ट. नॉर्मल माणसे आयुष्याच्या रॅटरेसमध्ये पळणारी. पळापळा , कोण पुढे पळे तो… पुढे राहण्यासाठी एकमेकांविरुद्ध डावपेच, वर चढणार्याचे पाय ओढणं, कुणाला चांगली संधी मिळाली तर मनातून त्याबद्दल धुसफुस इत्यादी सगळं साग्रसंगीत चालू असतं. सर्व सुखसोयी असूनही, इच्छाआकांक्षा पूर्ण होऊनही, कायम असमाधानी राहणारा हा वर्ग. त्यातील ५-१० टक्के माणसे जरा हटके. ती या शर्यतीत मागे पडलेली…
मीही अशाच रॅटरेसमध्ये यथाशक्ति पळत होते. वाण नाही पण गुण लागलेला. ‘काहीतरी कमी आहे’ असं सारखं मनाला जाणवत होतं. पण ते ‘कमी’ काय हे काही कळत नव्हतं. एक्सप्रेस वेवरुन पळता पळता माझ्या गाडीला करकचून ब्रेक लागला! एक्सप्रेस वे माझ्यासाठी अचानक संपलेला आणि कड्याच्या टोकावर मी उभी होते. समोर खुलं आभाळ आणि खाली दाट जंगलानं व्यापलेली खोल दरी! एका असाध्य, दुर्मीळ प्रकारच्या कॅन्सरनं माझ्या शरीराला ग्रासलेलं. नवर्याला म्हटलं. ‘चल बाबा गुडबाय. पिल्लाला घेऊन तुला आता एकटंच चालायचय.’ कारण कालपर्यंत आपली असणारी माणसं आता शहाणी होऊन, एकतर आम्हाला सोडून गेलेली किंवा काठावरून गंमत पाहणारी. नवरा मोठ्या धीराचा म्हणाला, ‘आशेच्या चिवट तंतूला धरून राहू. जंगलात न तुडवलेल्या वाटा असतात. त्या शोधू. थोडी माणसं आहेत अजून आपल्याबरोबर, जमेल तेवढं खेचून नेऊ.’
मीही मग गळलेलं अवसान गोळा केलं आणि सहज कुठेतरी फिरायला जावं त्या वृत्तीने किमो घ्यायला हॉस्पिटलमध्ये जायला लागले. आजारी पडल्यावर वाटायचं की, ‘मीच का?’ किंवा, ‘मीच नॉर्मल माणसांपासून अशी वेगळी का पडले आहे? बाकीचे लोक पाहा कसे मजेत पळताहेत’. हॉस्पिटलमध्ये जायला लागल्यावर, जरा भान आल्यावर जाणवलं की, माझ्यासारखी खूप माणसं सायडिंगला फेकली गेली आहेत. आमच्या जीवनाची गाडी हळूहळू यार्डात जाणार मोडीत काढायला. डॉक्टरांनी सांगितलं, ‘माझी गाडी रिपेअर करण्याच्या पलीकडे गेली आहे.’ मग कमलेशने जगभरच्या वेगवेगळ्या प्रयोगाचा कानोसा घेतला आणि मी त्याप्रमाणे माझी गाडी दुरुस्त करायला लागले. पहिल्यासारखं पळायला येईना तिला, पण बर्यापैकी चालू लागली. कड्याच्या पोटातून जाणारी अनवट वाटआम्हाला सापडलेली. ‘युरेका’ असे आनंदाने आम्ही ओरडलो आणि या वाटांची माहिती दुसर्यांनाही देऊ लागलो. यमाच्या हस्तांदोलनाने भ्यायलेले रुग्ण आणि त्यांच्या ताटातुटीच्या कल्पनेने विव्हळ झालेले रुग्णांचे सुहृद असा सगळा लवाजमा. गांजलेले लोक या भीतीच्या रानात अशा वाटांबद्दल कोणी सांगतंय म्हटल्यावर आमच्याशी बोलायला यायला लागले.
असं हे कड्याच्या पोटाखालचं, एक्सप्रेस वेपासून दूर असलेलं वेगळं जग आमच्या ओळखीचं होऊ लागलं. या जंगलाच्या गच्चपणात अवघड वाटांवर आम्हाला दिसली माणुसकीची, निरपेक्ष प्रेमाची, अवीट वात्सल्याची स्वर्गीय फुले. निसर्गदेवतेने प्रसन्न होऊन अशा फुलांची पखरण केली आहे आमच्या वाटेवर!
आता बघा ना, शीलाकाकी माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणींची आई. आमचं बोलणं फक्त फोनवर. प्रत्यक्षात गाठभेट नाही. त्यांना माझ्या लेखांमध्ये स्वतःच्या अनुभवांचे, वेदनांचे प्रतिबिंब दिसले. काही साध्यासुध्या उपायांनी त्यांचा त्रास खूप कमी झाला. त्यांनी मला त्यांची तिसरी मुलगीच मानलं. ‘बाळा, तू आणि माझ्या मुली यांच्याशिवाय मला आजकाल कुणाशीच बोलावं वाटत नाही बघ.’ या आजाराने काकींना वेगळी दृष्टी दिली. संसाराच्या मोहपाशांतून, मायामोहाच्या जंजाळातून सुटण्याची धडपड करणार्या काकी माझ्यावर मात्र वात्सल्याचा वर्षांव करतात!
सदूकाकांचा कॅन्सर पसरत होता. वेगवेगळ्या रिपोर्टमधून ते समजायला लागलं. सदूकाकांचा डॉक्टरांपेक्षा कमलेशवर जास्त विश्र्वास . होणारा त्रास, देण्यात येणार्या औषधांचे परिणाम, रिपोर्टचा अर्थ असं सारं काही त्यांना समजून घ्यायचं असायचं. कमलेश मग इंटरनेटच्या महाजालातून आधी त्या सगळ्याचा अर्थ समजून घ्यायचा अन् नंतर त्यांना सांगायचा. कमलेशशी बोललं की काकांना फार समाधान वाटायचं. धीर यायचा. काका तर आता अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत, पण त्यांच्या आशीर्वादाचा ठसा आमच्या पाठीवर कायमचा आहे!
कर्करोगाचा शरीराला विळखा बसण्याआधी तो मनाला बसतो. अशा कर्करोगग्रस्तांचं मग एक वेगळंच जग बनतं. एकेक जण गळायला लागतात आणि उरलेले इतरांना साथ देत सोबत करत राहतात… एकमेकांना आधार देत असतात…
दुसर्यांदा कॅन्सर उलटल्यावर नीताच्या पायाखालची जमीनच सरकली. मी सांगितलं, ‘अगं, घाबरू नकोस. योग्य आहार-विहार, व्यायाम, योग आणि आयुर्वेद या सर्वांना घेऊन आपली तनामनाची टीम मजबूत करायची. मग कशाशीही लढायची भीती वाटत नाही.’ नीताने आपली टीम मजबूत केली. तिच्या चेहर्यावर हसू उमलेले आणि डोळ्यात आशा. ‘अगं, तुला पाहून मला बळ येतं बघ’. नीताच्या या बोलण्यानं खरं तर मलाच आत्मविश्वास मिळतो लढायला!
वंदनाच्या किमोथेरपी दरम्यान तिचा जोडीदार अचानक हार्ट ऍटॅकने जग सोडून गेला. हे दुःख वंदनाला जिव्हारी लागलं. आम्ही दोघी योगाभ्यासाला एकत्र जात असू. वंदनाची तब्येत बिघडत गेली तसे योगाभ्यासाला जाणे होईना, पण फोनवर रोज बोलणे चालू राहिले. तिच्या सासर-माहेरचेही माझ्यावर खूप माया करीत. एक दिवस सर्वांना दुःखात लोटून वंदना निघून गेली. माझा जीव फारच बेचैन झाला. ‘असं झालंच कसं?’ उत्तर न मिळणारा हा प्रश्न मी डॉक्टरांना वेड्यासारखा विचारू लागले. तिच्यावर आईसारखी माया करणार्या तिच्या शीतलकाकूंचाच मला फोन आला. म्हणाल्या, ‘हे बघ बाळ, प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा. नशीब वेगळं. वंदना गेली म्हणून तू धीर सोडू नकोस. तू नक्की बरी होणार. आणि हो, माझ्याकडे माहेरपणाला हक्काने येत जा. वंदना गेली, पण आम्ही आहोत तुला’. कुठे मिळेल हे धैर्य, मनाचा मोठेपणा आणि मायेची पाखर?
रिनाची आणि माझी ट्रीटमेंट जवळपास एकाच वेळी सुरू झाली. दोघींचेही कॅन्सर तसे असाध्य. आम्हा दोघींची जिद्द ही सारखीच. अजून एक साम्य म्हणजे रिनाचा नवरा आणि कमलेश हे दोघेही आपआपल्या पत्नीला वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे. धडपडणारे रिनाला मुलं नव्हती. त्यामुळे माझ्या छोट्यावर तिचा फार जीव. दुुर्दैेवाने तिचा आजार आटोक्याबाहेर गेला. अंतिम शाश्र्वत सत्याकडे तिची वाटचाल सुरू झाली. आम्ही जमेल तेव्हा तिला भेटत असू. ‘तुम्ही आलात की तिला खूप आनंद होतो.’ तिचा नवरा सांगायचा. फोनवर बोलणं रोजचंच होतं. तिला होणारा त्रास, वाटणारी भिती वाटून घ्यायला तिला एका समदुःखी मैत्रिणीची गरज होती. त्याही परिस्थितीत ती माझ्या प्रकृतीची काळजी करायची. हृदयावर दगड ठेवून मी तिच्याबरोबर रोज गप्पा मारत असे. ती गेल्यावर दोन दिवसांनी तिच्या नवर्याने कमलेशला फोन केला. ‘असं वाईट घडलं खरं, पण तुम्ही ऋजुताला सांगू नका. तिला खूप धक्का बसेल. त्या देाघी चांगल्या मैत्रिणी बनलेल्या ना. ऋजुताला जपा. ती नक्की बरी होणार.’ स्वतः शोकसागरात बुडालेला दुसर्याला जपत होता.
दूर गावातून सोनाचा फोन आला तेव्हाच तिच्या सानुलीचा कॅन्सर उपचारांपलीकडे गेला होता. डॉक्टर फक्त वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून औषधे देत होते. इतक्या लांबूनही तिच्या दुःखाने आमची हृदये इकडे पिळवटून निघत होती. देवाने हा प्रसंग कट्टर दुश्मनावरही न आणावा. त्या मंगल तत्त्वात विलीन व्हायला ती सानुली मोठ्या धैर्याने, भक्तिभावाने निघाली होती. आम्ही सर्वजण फक्त असहाय्य, मूक साक्षीदार होतो. अखेर तो दिवस उजाडलाच. सोनाशी फोनवर काय बोलायचं? कसं बोलायचं? माझ्याच काळजाचा तुकडा गेल्यासारखं मला वाटत होतं. इतक्या चार महिन्यांत त्याच दिवशी दिवसभरात आमचा फोन झाला नाही. मन सुन्न झालं होतं. सोनाच्या दुःखाची मला कल्पनाच करवत नव्हती. रात्री सोनाचाच फोन आला.‘ताई, का गं आज फोन केला नाहीस? बरं नाही का तुला? फार त्रास करून घेऊ नकोस गं स्वतःला. देवाचं लेकरू होतं ते, देव घेऊन गेला. तुझ्या तब्येतीला जप आणि उद्या मला फोन कर हं इतके दिवस करत होतीस तसा.’ दुःखाने उन्मळून पडलेली सोना माझं सांत्वन करीत होती.
अश्रूंचे लोट प्रेमाचे, स्नेहाचे मळे फुलवताहेत. वेदनेच्या बीजातून जाणिवेचा वृक्ष अंकुरलाय. असं हे आमचं वेगळं जग! रॅटरेस, एक्सप्रेस-वे पासून खूप खूप दूर. दुसर्यांच्या वेदनेला फुंकर घालताना स्वतःचे दुःख विसरणारी, आत्मशक्ती अनुभवणारी जगावेगळी माणसं आम्ही!
©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
पूर्वप्रसिद्धी – चतुरंग, लोकसत्ता २४ सप्टेंबर २०११
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
—
own text
