ट्रीटमेंट संपल्यानंतर…

डॉ.  ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

कॅन्सरचे निदान ते शस्त्रक्रिया, किमो-रेडिएशन या सर्वात ८-९ महिन्यांचा काळ बाधिरावस्थेतच जातो.  रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भांबावलेल्या, घाबरलेल्या मनःस्थितीच हॉस्पिटलच्या चकरा मारत असतात.  डॉक्टराशी होणारा संवाद हा बुडत्याला मिळणारा मोठा आधार.  ‘घाबरु नका.  त्रास हळूहळू कमी होईल.  बरे होणार तुम्ही, ‘‘ हा दिलासा डॉक्टर सतत देत असतात.  जीवाच्या आकांताने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या शब्दांना घट्ट धरुन राहतात.  जसे काही हे शब्द हातातून सुटले तर दुःखाच्या महापुरात कुठल्याकुठे वाहात जाऊ ही भीती त्यांना! उपचार चालू असेपर्यंत ते कधी-संपणार? कधी संपणार? आता अमुक दिवस उरले, आता इतके दिवस उरले अशी आकडेमोड मनात कायम चालू असते.  तर उपचार संपले की असं करायचं, इकडे फिरायला जायंच, हे खायचं असे हजार बेत मन करत असतं.  ‘मैं और मेरी तनहाई अक्सर ये  बाते करती है….’.  मग एकदाचे उपचार संपतात.  हॉस्पिटलच्या वार्‍या थांबवणार याचा आनंदही होतो आणि डॉक्टरांना भेटता येणार नाही याचे दुःखही.  वेगात चाललेल्या आपल्या आयुष्याला एकदम ब्रेक लागतो.  एक पोकळी निर्माण होते.  आता पुढे काय? हे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.  ‘तुम्ही १/३ महिन्यांनी या रक्तांच्या अमूक चाचण्या आणि हे रिपोर्ट घेऊन या, मग आपण पुढचं पाहू.  तुम्ही तुमचं नेहमीचं जीवन जगू शकता.  नेहमीची कामं करा.  नोकरी/व्यवसाय करा.  आनंदात राहा.  काही प्रॉब्लेस आल्यास हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा.  ‘ डॉक्टर सांगतात रुग्णही हुश्श  म्हणून निःश्वास सोडतो.  ‘चला, आता परत पूर्वीसारखे होणार आपण.’ पण खरचं असं होत का?

किमोमुळे कॅन्सरच्या पेशी मरतात तशाच आपल्या संपूर्ण शरीरातील चांगल्या पेशीही काही प्रमाणात मरतात.  शरीरातील सर्व अवयवांवर व संस्थांवर किमोचा परिणाम होतो.  उदा.  मेंदू, ह्दय, हाडे, यकृत, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, मूत्रपिंडे इ.  किमो संपल्यानंतरही बराच काळ या औषधांचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवत राहातो.  आपल्याला कळणारे न कळणारे अनेक बदल शरीरात-मनात-स्वभावात होत असतात.  हे सर्व बदल सजगपणे टिपून, त्यामागची कारणे समजून घेऊन जर उपाययोजना केली तर राखेतून उठणार्‍या फिनीक्स पक्ष्याप्रमाणे परत भरारी घेता येते.

खुपदा किमो चालू असताना प्रत्येक सायकलच्या सुरवातीचे ७-८ दिवस सोडले तर रुग्णाला फारसा थकवा जाणवत नाही, यामागे एकतर ‘यातून मी बाहेर पडणारच’ अशी जिद्द असते किंवा ‘मला काहीच झाले नाही.  मी नॉर्मल आहे.’अशी सत्य नाकारायची अवस्था असते.  या सर्व ट्रीटमेंटचा वेगही एवढा भन्नाट असतो की मन सुन्न झालेले असते.  ‘हरहर महादेव’ अशी गर्जना करत बेभानपणे तलवार चालविणार्‍या मावळयासारखी मनःस्थिती सर्व रुग्णांची असते.  सारी शक्ती एकवटून रुग्ण उपचारांना सामोरा जात असतो.  आणि उपचार संपल्यावर मात्र अचानक हाताशी आलेल्या रिकाम्या वेळेत झालेल्या हानीचा अंदाज येतो.  शतजन्माचा थकवा रुग्णाला शोधत येतो.  काम करताना अचानक हातपाय चालेनासे होतात.  साध्या साध्या कामांनाही खूप वेळ लागतो आणि थकून जायला होते.  स्वभावही अतिशय हळवा बनतो.  थोडया थोडया कारणांनी रडू यायला लागते.  ‘आतापर्यंत मी बरी होते.  उपचार संपल्यावर हा थकवा कसला? दुसर्‍यांनाही असे होते का? या शंकांनी आपण हैराण होतो.  पुढचे काही दिवस-महिने हा थकवा कायम राहतो.  काही काही रुग्णांमध्ये तर तो वर्षानुवर्षे राहतो.  त्यात अनैसर्गिक असे काहीही नाही.  प्रत्येक रुग्णाचा कॅन्सर वेगळा, उपचारांची तीव्रता वेगळी, कॅन्सर होण्याआधी असलेली शारीरीक स्थिती वेगळी त्यामुळे हा थकवा कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक रुग्णाला येतो.  कॅन्सर, त्यावरचे उपचार आणि, उपचारांमुळे होणारे साइड इफेक्टस, त्यानंतरचे आयुष्य याबद्दल बोलायला रुग्ण-त्यांचे नातेवाईक अजिबात तयार नसतात, आयुष्यातील त्या भितीदायक पर्वावर कायमचा पोलादी पडदा टाकलेला असतो त्यांनी पण म्हणूनच नवीन रुग्णांचे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.  त्यातही रुग्ण जर घरातील नावडती व्यक्ति असेल तर, ‘ती कॅन्सर पेशंट ट्रीटमेंट संपल्यावर लगेच नोकरीला जायला लागली.’ किंवा ‘तो अमूक पेशंट किमो घेऊनही कामावर जायचा.  याची आपली नाटकचं फार’ अशा तुलनेचे वाग्बाण रुग्णाला घायाळ करतात.  ‘आपल्यातच काहीतरी कमी आहे.’ असा न्यूनगंड देतात.

या थकव्यावर मात करण्यासाठी/ थकव्याशी जूळवून घेण्यासाठी आपल्या कार्यशैलीत अनेक बदल करावे लगतात.

  • सर्वप्रथम आपल्याला नेहमीपेक्षा जास्त थकवा येतोय हे जाणून घ्यायचं आणि ते स्वीकारायचं.
  • कामाचा अनुक्रम ठरवायचा. कुठलं काम महत्त्वाचं आणि कुठलं कमी महत्त्वाचं.  कामांना छोटया छोटया गटांमध्ये विभागायचं.
  • थोड्या थोडया वेळानंतर विश्रांती घ्यायची, मी सुरुवतीला पंधरा मिनीटे काम तर अर्धा तास विश्रांती अशा रीतीने काम करत असे.  हळूहळू हे गुणोत्तर बदलत जाते.
  • कधीही धाप लागेपर्यंत किंवा हातपाय आता चालत नाहीत, श्र्वास लागतोय अशी स्थिती येईंपर्यंत काम करु नये.
  • आपल्या शरीराचं म्हणणं नीट एकेलं तर आपोआप शरीराच्या गरजा आणि मर्यादा दोन्ही कळतात.
  • आजारी पडायच्या आधी जसे आपण भराभर काम करायचो किंवा काम रेटून नेऊ शकायचो तसं आता होत नाही याची खंत करुन दुःखी होऊ नये.
  • जीव तोडून परफेक्ट कामं करण्यापेक्षा आपल्या वेगाने, तब्येतीला झेपतील अशा तर्‍हेने कामं करावीत. आपण अस्तित्वात असणे हे मुलाबाळांसाठी फार महत्त्वाचे आहे याचे सदैव भान ठेवावे!
  • वरवर जर रुग्ण नॉर्मल दिसत असेल, हसतमुख असेल तर त्याला होणार्‍या त्रासाची, थकव्याची कल्पना इतरांना येऊ शकत नाही. जी व्यक्ती या यातना सहन करत असते तिलाच याची कल्पना असते.  इतरांना त्याची यथार्थ कल्पनाही येणे शक्य नाही.  त्याबद्दल रुग्णाने वाईट वाटून घेऊ नये.
  • ‘आपल्याला पूर्वी इतकं काम होत नाही थकवा येतो. अमुक अमुक त्रास होतो.’ हे घरातील, ऑफिसमधील संबंधितांना विश्र्वासात घेऊन शांतपणे सांगावे.  अनेकदा परत परत सांगावे लागते, तेव्हा त्रागा करु नये.
  • उपचार संपल्यावर अनेकदा मसालेदार, चटपटीत, हॉटेलचे पदार्थ खायची रुग्णाला अनावर इच्छा होते. किमोमुळे आपले तोंड ते गुदद्वार यामधील संपूर्ण पचनसंस्थेवर परिणाम झालेला असतो.  किमो संपल्यानंतरही पचनसंस्थेला पूर्वपदावर यायला अनेक महिने लागतात.  तेव्हा उपचारदरम्यानचाच सात्त्विक, तिखटशिवायचा आहार काही काळ चालू ठेवावा.  क्रमाक्रमाने तिखट, गरम मसाल्याचा वापर वाढवून आपल्याला काही त्रास तर होत नाहीना हे पाहावे.
  • आपल्या महत्त्वाच्या अवयवांची (उदा. मेंदू, ह्दय, यकृत इ.) झालेली झीज भरुन काढण्यासाठी पौष्टिक अन्न खावे.  सुका मेवा, डाळी, कडधान्ये, मासे, चिकन इ.  पदार्थांतून भरपूर प्रोटीन मिळते.  चपाती/भाकरी, भात, वरण, भाज्या, कोशींबीर, मर्यादित मासांहार, फळे असा चौरस आहार घ्यावा.
  • किमोमुळे, कॅन्सरमुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. जंतूसंसर्ग चटकन गंभीर रुप धारण करतो.  म्हणून किमो दरम्यान गर्दीची, अस्वच्छ ठिकाणे टाळण्याचा डॉक्टर आपल्याला सल्ला देतात.   किमो-रेडिएशन संपल्यानंतर महिन्याभरात पांढर्‍या पेशींची संख्या पूर्ववत होते.  तरीही चटकन जंतूसंसर्ग होऊ शकतो.  आजारी पडल्यावर मग अँटिबायोटीक्स घ्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा; या सर्व प्रकारात आपले बरे होणे लांबणीवर पडते.  म्हणून होताहोईल जंतूसंसर्ग टाळावेत.
  • त्याकरिता उपचार संपल्यावर ही २-३ महिने गर्दीची, अस्वच्छ ठिकाणे टाळावीत.
  • शक्य असल्यास काही काळ तरी टे्रनने, एसटीने २-३ दिवसांचा प्रवास करुन दूरदूर जाणे टाळावे. या प्रवासादरम्यान सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे म्हणजे युरीनरी इन्फेक्शनसारख्या आजारांना आमंत्रण.
  • प्रवास करणे निकडीचे असल्यास आपल्याबरोबर पाण्याचा भरपूर साठा ठेवावा. (प्रवासदरम्यान मिळणार्‍या मिनरल वॉटरच्या शुद्धतेबद्दलही खात्री नसते.) बरोबर घरचे जेवण, सुके खाणे, फळे ठेवावित.  ज्याठिकाणी राहणार तिथे पथ्याच्या जेवणाची सोय आहे ना? स्वच्छ प्रसाधनगृहे आहेत याची खात्री करुन घ्यावी.  पाणी उकळवून प्यावे.
  • डोळयांची दृष्टी थोड्या काळापुरती मंदावते.
  • वाचण्याची शक्ती कमी होत, वाचण्यात मी म्हणजे बकासूर. दिवसाला ४००-५०० मराठी आणि २००-३०० इंग्लिश पानांचा फडशा पाडायचे.  पण किमोनंतर दिवसाला १५-२० पाने वाचणे मुश्किल झाले.  विचारगर्भ आणि गंभीर पुस्तक असले तर 5पानेही वाचायला होइनात.  मेंदूला झिणझिव्या येऊ लागल्या.  एक दिवस जर २५ पानांपेक्षा जास्त वाचले तर दुसर्‍या दिवशी मेंदूला भयंकर क्षीण येऊ लागला.  एका टप्प्यावर तर माझे वाचनच बंद होते की काय अशी चिंता मला वाटू लागली.  पण नंतर आहे ती परिस्थिती स्वीकारली, नियमित गाजराचा ज्यूस, नेत्रस्नान यामुळे डोळे बरेच सुधारले.  दिवसाला ५० पानापेक्षा जास्त स्वतःहून वाचन नाही.  गंभीर असेल तर ५-१० पाने अशी मर्यादारेषा आखून घेतली.
  • किमोमुळे आपल्या मेंदूतल्या पेशींवर व शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूच्या जाळयावरही परिणाम होतो. त्याला ‘किमो ब्रेन’ म्हणतात.  हा परिणाम १ ते ३ वर्षे टिकतो.  हळूहळू कमी होतो.
  • शरीरातील काही भागांची संवेदना कमी होते. शरीरातील त्राण कमी झाल्यामुळेही वेदना जास्त जाणवतात.  काही काही गोष्टींचे विस्मरण होते.  गोष्टी पटकन आठवत नाहीत.
  • निर्णयक्षमता कमी होते.  गुतांगुंतीचे निर्णय घेताना हबेलउडी उडते.
  • विचार आणि कृती यांचा ताळमेळ चुकतो. त्यामुळे हातापायांच्या हालचालींतील सुसुत्रता कमी होते.  चालताना तोल जाईल असे वाटते.
  • खूप माणसे एकत्र असतील तर भांडण दूरची गोष्ट पण चाललेला हास्यविनोदही कर्कश्य वाटतो. मोठया आवाजातील बोलणे, रेडिओ, टि.व्ही ही सहन होत नाही.
  • नैराश्य पटकन आणि छोटया छोटया गोष्टींनीही येते.
  • कुठल्याही गोष्टीचा संबंध कॅन्सरशी जोडण्याकडे प्रवृत्ती वाढते. ‘मी अशी आजारी पडलेय म्हणुन असं होतय.’ या विचाराने वारंवार डोळयांतून पाणी येते.
  • या काळात घरात किंवा कामाच्या ठिकाणी होणारे वादविवाद (भांडणे, टोमणे, विखारी दृष्टी, द्वेष यांचा रुग्णांवर विपरीत परिणाम होतो.
  • अनेकदा रुग्णांना अमूक अमूक गोष्टी नैराश्यमुळे होत आहेत हेेही समजत नाही.
  • नैराश्यामुळे थकवा वाढतो आणि थकल्यामुळे नैराश्य वाढते. या दुष्टचक्रात रुग्ण भरडून निघतो.
  • नैराश्य वाढत राहिले तर भूक, निद्रा, प्रतिकारशक्ती या सर्वांवर प्रतिकुल परिणाम होतो. आजारातून बरे होणे दुरावते.  कधी कधी कॅन्सरही डोके वर काढू शकतो.
  • आपल्या आजारवर खूप पैसा खर्च झाला, आपल्याला आता पूर्वीसारखे काम होत नाही, आपला आता कुंटुबाला काही उपयोग राहिला नाही असे विचार करुन खूप रुग्ण स्वतःला दोष देतात. तसा स्वतःला दोष देऊ नये.  कुंटूब हे एकमेंकाना सुख दुःखात साथ देण्यासाठी असते.  आजारात, अडचणीत सावरुन घेण्यासाठी असते.  आतापर्यंत तुम्ही कुंटूबासाठी खस्ता काढल्यात, आता कुंटूबाला तुमच्यासाठी काही करायची संधी द्या.  खाण्यापिण्याचे व्यवस्थित पथ्य सांभाळून, आंनदी वृत्तीने उपचार घेऊन तुम्ही लवकर बरे झालात म्हणजे सर्वांचे श्रम कारणी लागले.
  • आपल्याला दुसर्‍याने केलेली मदत, आपण बरे व्हावे यासाठी केलेली धडपड कृतज्ञतेने स्वीकारणे हा मोठा धडा या आजारात शिकायला आहे.

कॅन्सर होण्याआधी आपण आपल्या शरीराला गृहीत धरुन वाट्टेल तसे ताबडवलेले असते.  आक्रंदणार्‍या मनाला, चेहर्‍यावर हसरा मुखवटा घालून फसवलेले असते.  या सर्वांविरुद्ध आपल्या शरीर आणि मनाने केलेली बंडाळी म्हणजे कॅन्सर! तेव्हा कॅन्सर होण्यामागची कारणे समजून घ्यायची.  जरा उसंत घेऊन आपलं काय-कसं बिनसत गेलंं याचा आढावा घ्यायचा.  तनामनाला पुरेशी विश्रांती द्यायची.  फार गरज   असते त्यांची! संतुलित आहार, योग्य व्यायाम, योगाभ्यास, ध्यानधारणा आणि आपल्या जीवनाकडे बघायच्या दृष्टिकोनात अंतर्बाह्य बदल यासर्व गोष्टींच्या अथक प्रयत्नांनी या आजारातून नवी झळाळी घेऊन आकाशात मुक्त झेप घ्यायची आहे!

©डॉ.  ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – यशस्वी जीवन संघर्ष, २०१२, संपादिका प्राची सरपोतदार

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.