कॅन्सर झाला म्हणजे टाटाला जाउन किमो घ्यायचं आणि बरं व्हायचं किंवा किमोत केस जातात एवढीच बहुमुल्य माहिती किमो सुरु व्हायच्या आधी मला होती. किमोचा फार त्रास होतो हेही ऐकून होते. पण किमोबददल बोलायला कुणीच पेशंट तयार नसतो. त्या नरकयातनांची आठवणही त्यांना नको असते. दडपून “काही त्रास होत नाही.” ते “नको ती आठवण” अशा दोन टोकांमधल्या प्रतिक्रिया असतात.
किमोथेरपी म्हणजे केमिकल्सनी औषधांनी केलेले उपचार. या औषधांनी शरीरात कुठेही पसरलेल्या कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात. प्रत्येक उपचारपध्दतीचे काही सामर्थ्य आहे. काही मर्यादा आहेत. शस्त्रक्रियेने कधीकधी टयूमर पूर्णपणे काढू शकत नाही. टयूमर खूप मोठा असल्यास किंवा नाजूक अवयव असल्यास रेडिएशन पूर्णपणे देता येत नाही पण किमोची औषधे मात्र रक्तात मिसळून शरीरातील प्रत्येक पेशीपर्यत पोहचतात. कॅन्सर जेव्हा एकापेशा जास्त ठिकाणी पसरलेला असतो तेव्हा किमो म्हणजे वरदानच. किमोची औषधे ही सहसा इंजेक्शन किंवा तोंडाने घ्यायच्या गोळया या स्वरुपात असतात. इंजेक्शन सलाइनमधून हळूहळू दिले जाते.
कॅन्सरच्या पेशी पटापट वाढतात या वेगामुळे त्यांच्या वाढीमध्ये अनेक त्रुटी राहातात व त्या त्यांचे नियोजित कार्य करु शकत नाहीत. एका अर्थाने कॅन्सरच्या पेशी म्हणजे वाया गेलेली, वाईट मार्गाला लागलेली मुले. समाजात / शरीरात अस्वस्थता निर्माण करणारी. किमोची औषधे वेगवेगळया प्रकारे या पेशींना मारतात. काही औषधे कॅन्सरच्या पेशींना मारतात. काही औषधे त्यांना वाढीपासून थांबवतात. काही पेशींतील DNA / RNA बनवणं थांबवतात. टयूमरचा प्रकार ,पेशंटचे वय, शारीरीक स्थिती, पेशंटवर होणरे साईड इफेक्टस या सर्वांचा साकल्याने विचार करुन औषधयोजना केली जाते. जास्त परिणामकारक होण्यासाठी खुपदा एकापेक्षा अधिक औषधे दिली जातात. “ किमोची” cycles ठराविक काळाने, ठराविक मात्रेत, ठराविक संख्येत दिली जाते. किमोच्या औषधांचा शरीरातील महत्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होत असतात त्यामुळे आयुष्यात एक औषध अमूकच मात्रेत देता येते. किमोची औषधे दररोज / एक दिवसाआड / दर आठवडयाला / पंधरा दिवसाला / 21 दिवसांनी अशी दिली जातात. अशी चार, सहा, आठ, बारा इ. Cycles दिली जातात. किमोची औषधे कॅन्सरच्या पेशींबरोबरच शरीरातील चांगल्या पेशींवरही हल्ला करतात. त्यामुळे हृदय, यकृत, किडनी इ. महत्वाच्या अवयवांवरही दुष्परिणाम होतात म्हणून दरवेळी पुढचे सायकल सुरु करायच्या आधी रुग्णाच्या विविध चाचण्या केल्या जातात. यकृत, मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालले आहे ना ? रक्तातील हिमोग्लोबिन, लाल – पांढ-या पेशी, प्लेटलेटस यांचे प्रमाण ठिक आहे ना ? पेशंटचे वजन, शरीरीक स्थिती, इतर साइड इफेक्टस या सर्वाचा साकल्याने विचार करुन पुढचे औषध दिले जाते. C. T. Scan, सोनोग्राफी व इतर टेस्टचा वापर करुन औषधांचा टयूमरवर होणारा परिणाम जोखतात. त्याप्रमाणे औषधांची मात्रा बदलतात. अनेकदा प्रथम किमो देउन टयूमरचा समूळ नायनाट करण्याचा डॉ. प्रयत्न करतात. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना वाटते कि इतक्या टेस्ट का करतात पण अतिशय गुंतागुंतीचे असे हे शास्त्र आहे. पेशंटच्या आयुष्याशी संबंध असल्यामुळे डॉ. ना अतिशय विचारपूर्वक औषधयोजना करावी लागते. अनेक नवनवीन प्रभावी औषधांच्या शोधामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणा-या कॅन्सरवरही उपचार होउ शकतात. उदा. काही प्रकारचे ब्लड कॅन्सर.
प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे किमोचेही साईड इफेक्टस आहेत. किमोची औषधे वेगाने वाढण-या पेशींना मारतात. मात्र असे करताना कॅन्सरपेशीं बरोबरच शरीरातील इतर चांगल्या पेशींवरही हल्ला करतात. उदा. लाल – पांढ-या रक्तपेशी त्वचा, केस, तोंड ते गुदद्वार यावरचे श्लेषमल पटल इ. शरीराचा सर्व तालच बिघडतो. शरीराच्या या प्रतिसादाने रुग्ण सैरभैर होतो. त्यातच शतजन्माचा थकवा तनामनाला शोधत येतो. रुग्ण “किमोचा” मनोमन धसका घेतो. अनेक पेशंट या धसक्याने “किमो” अर्धवट सोडतात. उलटया, हगवण, जंतूसंसर्ग यापायी हॉस्पीटलमध्ये दाखल व्हावे लागते. मग किमोच्या दोन सायकलमधील अंतर वाढते. असे अंतर वाढले की औषधांची परिणामकता कमी होते. काही रुग्णांना तर साईड इफेक्टसचा इतका त्रास होतो की नाईलाजाने किमो मध्येच बंद कराव्या लागतात.
हे सर्व कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी सर्वप्रथम मन शांत ठेवावे. किमोचा त्रास झालातरी तो तात्पुरता असतो. किमो बंद झाल्यावर शरीर हळूहळू पूर्वपदावर येते. तेव्हा आजारातून बरे होण्यासाठी थोडा काळ त्रास सोसणे भाग आहे. कुठल्याही त्रासाचा किंवा संकटाचा पदधतशीर सामना केल्यास त्याची तीव्रता खूप कमी होते. आपल्याला काय होते आहे ? लक्षणे काय ? का होत आहे? कारणे काय ? याचा अंदाज एकदा आला की त्यावर काय उपाय करायचे हे ठरविता येते. कॅन्सरचा मुकाबला करताना हे भान रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी कायम ठेवावे ( कठीण गोष्ट आहे तरीही )
किमोथेरपीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना :
- किमोचा सर्वात वाईट परिणाम होतो पांढ-या पेशींवर. या पांढ-या पेशी म्हणजे शरीराचे जंतूपासून रक्षण करणारे सैनिक. त्यांची संख्या झपाटयाने कमी झाल्याने सर्दी खोकल्यासारखे साधे आजारही अक्राळविक्राळ स्वरुप धारण करतात. ताप, हगवण, उलटया इ. गोष्टींनी पेशंट हैराण होतो. हे आजार जर प्रतिजैविकांनी आटोक्यात आले नाही तर हॉस्पीटलमधे दाखल करावे लागते. मग दोन किमो मधील कालावधी वाढतो. म्हणून किमो चालू असताना जंतूसंसर्ग होउ नये म्हणून जपावे.
घरातल्या माणसांनी अतिशय स्वच्छता पाळावी. घरच्या मंडळींनाही सर्दी, खोकला, ताप आल्यास ताबडतोब औषध घ्यावे. भेटायला आलेली मंडळीही ट्रेन, बसचा प्रवास करुन आलेली असल्यास त्यांना हातपाय स्वच्छ धुवून मगच रुग्णाला भेटायला घावे. सर्दी, खोकला , ताप इ. संसर्गजन्य आजार झालेल्या पाहुण्यांनी शक्यतो रुग्णाला लांबूनच भेटावे.
गर्दीची ठिकाणे टाळावीत. कामासाठी बाहेर जायचे असल्यास कमी गर्दीची वेळ निवडावी. किमो चालू असताना ( हॉस्पिटलला जाणे वगळता ) शक्यतो दूरचे बस, रेल्वेने प्रवास टाळावेत. आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतागृहे अतिशय अस्वच्छ असतात. त्यातून पेशंटला लगेच जंतूसंसर्ग होउ शकतो म्हणून त्यांचा वापर टाळावा. कधी कधी डॉक्टरच बाहेर जायचे असल्यास तोंडाला मास्क लावून जायला सांगतात. पाणी उकळून प्यावे. कुठेही बाहेर जाताना आपल्याबरोबर आपले एकवेळचे खाणेपिणे बरोबर ठेवावे. अंगावरचे कपडे, अंथरुण पांघरुण स्वच्छ वापरावे. - किमो चालू असताना नॉशिया, उलटया, मळमळ यामुळे अन्न् जात नाही. त्यामुळे अतिशय थकवा येतो. पेशंटचे वजन भराभर कमी होते. थकव्याने अन्नवरची वासना अजून कमी होते. हे दुष्टचक्र भेदणे अतिशय कठीण असते. यासाठी कमी तेलात / साजुक तुपात बनवलेले बिनातिखट, भरपूर भाज्या असलेला सात्विक चौरस आहार घ्यावा. ( असे जेवण कसे बनवावे यासाठी ‘ मी काय खाउ’ हा लेख पहावा. )
कितीही उलटया झाल्या तरी पोटातले सर्व अन्न उलटून पडत नाही. थोडेसे तरी पोटात शिल्लक राहते. तेव्हा एखादया व्रताप्रमाणे थोडे थोडे अन्न घ्यावे/ खात रहावे. भाजलेले चणे, राजगिरा चक्की, साळीच्या लाहया, फळे, भाताची पेज, भाज्यांचे सूप या गोष्टी नेहमीचे जेवण जात नाही तेव्हा खाव्यात. किमो घेतल्यानंतर 5 – 6 दि वसांनी हा त्रास कमी कमी होतो. - किमोच्या औषधांमुळे आतडयांची हालचाल मंदावते. त्यामुळे बध्दकोष्ठता होते. मूळव्याध, फिशर यासारखे विकार उदभवू शकतात. मलविसर्जन सुलभतेने व्हावे यासाठी डॉक्टरही औषध देतात. आहारातही दुधी, लाल भोपळा, पडवळ, शिराळा अशा भरपूर तंतूमय असलेल्या भाज्या खाव्यात. एक दिवसाआड पालेभाज्या खाव्यात. फळे खावीत.
- किमो, रेडिएशनमुळे सर्वांगाचा दाह होतो. कायम एका भटटीत असल्यासारखे वाटते. घशाला शोष पडतो. कितीही पाणी प्याले तरीही जीवाची तगमग थांबत नाही. ही आग आग कमी होण्यासाठी आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे ( दिवसाला 3 -4 लि. ) अगदी मोजून प्रयत्नपूर्वक प्यावे. नुसत्या पाण्याचीही चव नकोशी वाटते. उलटून पडेल असे वाटते. तेव्हा पाण्यात पुदीना, मध, लिंबू, आवळा / कोकम सरबत, थोडासा आल्याचा रस, सब्जा, तुळशीचे बी घालून चव बदलून प्यावे. शहाळपाणी दुपारी चारच्या आधी प्यावे. ( खूप शहाळपाण्याने पावसाळयात/ थंडीत कफ होण्याचा संभव असतो तेव्हा तारतम्याने प्यावे )
सर्वात उत्तम म्हणजे धणे – जीर्याचे पाणी. एक लिटर पाण्यात 2 – 3 चमचे धणे – जी-याची पूड ( 3 : 1 ) घालावी. दोन – तीन तासात हे पाणी संपवावे. दुपारी परत पूड घालून नवीन पाणी बनवावे. अंगाची लाही लाही खूप प्रमाणात कमी होते, ट्रीटमेंट संपल्यावरही धणे – जी-याचे पाणी पित राहिल्यास शरीर थंड राहते. - किमोमध्ये केस जातात. किमोच्या तीव्रतेप्रमाणे कमी – अधिक प्रमाणात केस जातात. स्त्रियांना तर त्याचा फारच धक्का बसतो. जीवावरचं केसांवर नि भावलं म्हणावं आणि पुढे निघावं. हातापायाची नखे काळी पडतात. चेहराच काय सर्व शरीरच काळे ठिक्कर पडते. आरशात पाहू नये असे वाटते. विद्रुप शरीराकडे पाहून दुर्बल झालेलं मन खंतावतं. असा ग्रहण लागलेला रुग्ण पाहून, सुह्रदांच्या काळजाला चरे पडतात तर इतरजनांच्या नजरेतील कीव पाहून रुग्ण घायाळ होतो. पण ट्रिटमेंट संपल्यावर केस हळूहळू परत येतात. त्वचाही आपला मूळ वर्ण घेते.
किमो चालू असताना आंघोळीच्या आधी 10 मिनीटे हातापायांची नखं आणि शरीराला खोबरेल तेल हलक्या हाताने लावावे. पीअर्स किंवा बेबी सोप वापरावा. त्याने त्वचा कारडी पडत नाही. शरीर कमी काळवंडतं आणि नंतर मूळ वर्णही लवकर परत येतो. - नाकातील केस आपल्या अस्तित्वाचे अवडंबर न माजवता मोठे कार्य करत असतात. बाहेरुन येणारी हवा हे केस गाळून आत पाठवतात. पण नाकातील केसही गळून गेल्यामुळे बाहेरच्या हवेतील सूक्ष्म कण नाकाला गुदगुदल्या करु लागतात. नाकपुडीतील त्वचा कोरडी पडते. गरम श्वास आत जाउ लागतो. सर्दी झाल्यासारखे वाटून डोके जड होते. कितीही वाफ घेउन ही अस्वस्थता जात नाही. यावर अगदी साधा उपाय म्हणजे नाकाच्या आत दिवसातून दोन – तीन वेळा खोबरेल तेलाचे बोट फिरवायचे. सर्व अस्वस्थता लगेच दूर होते.
- किमोमुळे प्रत्येक सायकलच्या सुरवातीचे 4 – 5 दिवस अतिशय थकवा येतो. अगदी श्वास घेणे देखिल जड वाटावं इतका थकवा येतो. आपल्याच हातापायाचं आपल्याला ओझं होतं. नेहमीची कामेही करायला होत नाहीत याचे मनाला फार क्लेश होतात. रुग्ण मनाने खचतो. थकवा वाढतो तसे नैराश्यही वाढते. पण हळूहळू हा थकवा जातो. खाणे व्यवस्थित जायला लागल्यावर रुग्ण बराचसा पूर्वपदावर येतो. तोपर्यंत पुढच्या किमो सायकलची वेळ होते ! धटटयाकटटया पेशंटला कमी थकवा येतो तर दुस-या आजारांनी आधीच शरीर खिळखिळे झालेल्या रुग्णाला जास्त थकवा येतो. प्रत्येक कॅन्सरचा प्रकार हा रुग्णागणिक वेगळें रुप धारण करतो. त्यामुळे किमोची औषधे किती मात्रेत दिली जातात, प्रत्येक सायकल किती तासांचं/दिवसांचं आहे यावरही येणारा थकवा अवलंबून असतो. रुग्णाचे वय हाही एक महत्वाचा घटक आहे. थकवा आणि साइड इफेक्टस क्रमाक्रमाने वाढत जातात. या सर्व कारणांमुळे दोन कॅन्सर रुग्णांच्या आजाराची, औषधांची आणि इतर साइड इफेक्टसची तुलना कधी करु नये.
- किमोमुळे मेंदूतल्या पेशींवरही परिणाम होतो. त्यामुळे स्वभावातही खूप बदल होतो. अस्वस्थता, चिडचिड, हताशपणा, राग, दु:ख वाढत जाते. असेही कॅन्सर झाला म्हणून रुग्णाच्या मनाचा या भावना पिच्छा पुरवत असतात. या सगळयाचा परिपाक म्हणून नैराश्य रुग्णाला घेरते. जसजशी किमोची सायकल्स होत जातात तसतसे नैराश्य वाढत जाते. काहीही करायची इच्छा न होणे, अति शय थकवा, भूक न लागणे, खूप रडू येणे, छोटया छोटया गोष्टींनी चिडणे, पाठच्या दु:खद घटनांची वारंवार आठवण होणे ही नैराश्याची प्रमुख लक्षणे. थकवा वाढतो तसे नैराश्य वाढते आणि नैराश्य वाढते तसा थकवा वाढतो असे दुष्टचक्र आसते. यासाठी थोडा थोडा वेळाने नियमित पौष्टिक अन्न खावे. शरीराची ताकद टिकवून ठेवावी आणि चांगली पुस्तके वाचून, संगीत ऐकून, योग ध्यान – धारणा या द्वारे मनाची उभारी टिकवून ठेवावी. किमो थांबल्यावर हे बदल हळूहळू कमी होतात.
किमोथेरपी घेताना हॉस्पिटलमधे घ्यायची काळजी :
- आजकाल किमो छोटया–छोटया हॉस्पिटलमधेही दिले जाते म्हणून किमो घ्यायच्या आधी हॉस्पिटलमधला स्टाफ किमो देण्यासाठी प्रशिक्षि त आहेना ? इर्मजन्सीमध्ये डॉक्टर्स चोविस तास उपलब्ध आहेत का ? आयसीयू सारख्या सुविधा आहेत का ? याची चौकशी करावी.
- किमोसाठी कुठली औषधे दिली जाणार, कुठल्या क्रमाने दिली जाणार हे लिहून नीट लक्षात ठेवावे. किमो चालू असताना त्या औषधाच्या क्रमावर आपलेही लक्ष असून दयावे. औषधांचे साइड– इफक्टस, त्यावर संभाव्य उपाय, पेशंटला काय त्रास झाला तर हॉस्पि टलमध्ये यायचे, चोवीस तास उपलब्ध असणारा फोन नंबर ( डाक्टरांचा ) असे सगळे नीट विचारुन ठेवावे.
- किमोचा डोस हा काही तास ते 2-3-5 दिवस इतका असतो. हॉस्पिटलमधे राहायची गरज असल्यास पेशंटच्या जेवणाची, नातेवाईकांच्या रहाण्याची काय सोय आहे ते पाहून ठेवावे.
- किमोला जाताना जितके जमेल तितके भरपूर खाउन जावे. भरल्या पोटी किमोचे साईड इफेक्टस कमी होतात हे एक कारण आणि दुसरे म्हणजे किमो सुरु झाल्यावर नॉशिया, मळमळणे इ. गोष्टींमुळे खाणे कमी जाते. एक दिवसाचेच किमो असेल तर प्रवासाला लागणारा वेळ, किमोला लागणारा वेळ अधिक दोन तास असा हिशोब करुन 2-3 वेळचे घरचे खाणे जसे चपाती– भाजी, खिचडी – पुलाव, फळे बरोबर घेउन जावे. शक्यतो बाहेरचे हॉटेलमधले खाउ नये. जास्त दिवस ॲडमिट व्हायचे असल्यास फळे, लाडू, भाजलेले चणे, बिस्कीट, राजगिरा चिक्की असा सुका खाउ जवळ ठेवावा कारण किमो सुरु झाल्यावर नेहमीचे जेवण जात नाही.
- औषधांची ॲलर्जी, रक्तदाब, मधुमेह, ॲसिडीटी, बध्दकोष्ठता/ हगवण इ. कुठलाही आजार रुग्णाला असल्यास किमो चालू करायच्या आधी डॉक्टरांना कल्पना दयावी. अर्थात डॉक्टर विचारतातच पण कधी कधी छोटया छोटया पण महत्वाच्या गोष्टी राहून जातात.
- किमो घेताना आधिच्या किमोला काय त्रास झाला उदा. खुप उलटया, नॉशिया, बध्दकोष्ठता/ हगवण इ. गोष्टी आवर्जून डॉक्टरांना सांगाव्यात म्हणजे या किमोला तसा त्रास होउ नये म्हणून डॉक्टर औषधयोजना करतात.
– डॉ. ऋजुता कुशलकर
