उत्तर भारतातील लोक मराठी लोकांना दक्षिणेकडील लोक असं मानतात. तर मी बंगळुरूला गेल्यावर तिथल्या लोकांनी मराठी असलेल्या मला ‘तुम नॉर्थ इंडियन’ असा उल्लेख केल्यावर, आपण दक्षिणात्य की उत्तर भारतीय या पेचात पडले?

उत्तर भारतीय लोक ऐतिहासिक काळापासून मराठीजनांना दख्खनी म्हणजे दक्षिणेकडचे लोक मानत आले आहेत, पण दाक्षिणात्य म्हणजे ‘मद्रासी’ असा सर्व मराठीजनांना ठाम समज आहे. तसा तो माझाही होता. सगळे पुरुष पांढरी शुभ्र मुंडू नेसणार. कपाळावर चंदनाचे-भस्माचे उभे-आडवे गंध लावणार. श्यामलांगी, खात्यापित्या घरच्या बायका काळेभोर लांबसडक केस मोकळे सोडणार किंवा भरपूर मोगरा-अबोलीचे गजरे घालणार. माहेरच्या इमारतीत भरपूर मद्रासी होते. सर्वजण तोडकं-मोडकं मराठी बोलत. दक्षिणेतल्या वेगवेगळ्या राज्यांले होते ते. आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पण त्यातला भेदाभेद जाणून घ्यायची गरजच वाटली नव्हती. उजव्या नाकात हिऱ्याची चमकी आणि कानांत हिऱ्यांच्या कुडय़ा घालणाऱ्या काक्या फार प्रेमळ होत्या. गरमागरम इडल्या आणि स्वादिष्ट सांबार नेहमी घरी येत असे. मूगडाळीचे पायसम् किंवा नारळाचे दूध-गूळ घालून केलेली तांदळाची खीर तर अगदी आवडीची होती.

पीएच.डी. करत असताना लॅबमधल्या दोघी ‘मद्रासी’. एक केरळची तर दुसरी आंध्रची. पण मुंबईतच वाढलेल्या असल्याने जवळजवळ मराठी झालेल्या. त्यांच्या डब्यात क्वचित त्यांच्या पद्धतीच्या भाज्या किंवा इतर पदार्थ असत. नारळाचा वापर भरपूर असल्याने त्यांची चव सारखीच वाटायची. जिभेला पुरेसे ट्रेनिंग नव्हते!

२००० साली यजमानांच्या नोकरीनिमित्त आम्ही दोघं बंगळुरूला गेलो. बंगळुरू म्हणजे काय सांगावं महाराजा!!! ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ असं वाटायला लावणारी तिथली आल्हाददायक थंड हवा आणि त्या हवेत मिसळलेला सोनचाफ्याचा मादक, मंद सुवास! मुंबईच्या मानाने आकाराने खूपच लहान, पण वेगाने वाढणारे बंगलोर शहर. मुख्य शहरापासून लांब पण ऑफिसपासून जवळ असणाऱ्या ‘मारथहल्ली’/ मराठाहल्ली (?) गावात भाडय़ाने घर घेतले. छोटे-छोटे टुमदार बंगले छान रंगवून झकपक ठेवलेले. मुंबईच्या माणसांना ते एक अप्रूपच. घरमालक रेड्डी म्हणून आंध्र प्रदेशचा. त्याचं कुटुंब तळमजल्यावर. पहिल्या मजल्यावर एक मद्रासी कुटुंब आणि दुसऱ्या मजल्यावर आम्ही असा आटोपशीर मामला. पहिल्या मजल्यावरच्या आंटी सगळा वेळ घराच्या गच्चीत उभ्या राहून कुतूहलाने आम्हाला निरखीत होत्या. त्यांची ओळख करून घ्यायला गेलो. सुदैवाने त्यांना हिंदी येत होते. ‘‘तुम्ही मद्रासी का?’’ मी भाबडेपणाने प्रश्न केला. ‘आम्ही नाही बाई मद्रासी’, त्या फणकाऱ्याने उद्गारल्या. ‘आम्ही केरळचे.’ या बाईला इतकं रागवायला काय झालं याचा मी अचंबा करत राहिले!

नंतर कळले की दक्षिणेत तामिळनाडूच्याच रहिवाशांना मद्रासी म्हणतात. आंध्रप्रदेश- तेलगु, कर्नाटक- कन्नड, केरळ- मल्याळी अशी प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आहेत आणि बाकी सर्व भारतभर आहे. त्याप्रमाणे दोन राज्यांमध्ये थोडीथोडी तेढही आहे. हळूहळू पदार्थाचे आदानप्रदान होऊ लागले. नारळ जरी सर्वाच्याच पदार्थात खूप असला तरी चवीचवीत फरक होता. आंध्र प्रदेश म्हणजे मिरच्या पिकविणारा प्रदेश त्यामुळे त्यांच्या जेवणात मिरच्यांचा प्रचंड वापर. अगदी जहाल जेवण. बंगळुरूमध्ये उडीपी जेवणाचा नाही तर आंध्रच्या जेवणाचा फार बोलबाला. पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ते असं! जागोजागी आंध्र स्टाइलची हॉटेल्स. एकएकटे राहणारे लोक खूप असल्यामुळे थाळी सिस्टीम लोकप्रिय. मिनी मील आणि फुल मिल असे दोन प्रकार. केळीच्या हिरव्यागार आडव्या पानावर कोशिंबीर, चटणी, लोणचं, दही, पातळ भाजी, सुकी भाजी असं सगळं साग्रसंगीत वाढणार. हे सर्व दोन्ही जेवणांत हवं तितकं. फक्त भात तेवढा मिनी मीलमध्ये मर्यादित; फुल मीलमध्ये खाऊतेवढा. भाताबरोबर रस्सम् आणि सांबार. पहिल्या भातावर साजूक तुपाची धार. दाक्षिणात्य भात खाऊ, भात खाऊ असे आपण म्हणतो, पण भात खाण्याच्या त्यांच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यांच्या देशात गेल्यावर आम्ही दोघे अगदी थक्क झालो. पहिल्यांदा आंध्र हॉटेलमध्ये गेल्यावर दोघांसाठी दोन फुल मील मागवले. पहिल्यांदाच वेटरने जो भात वाढला तो पाहून आम्ही गार झालो. तो पहिला भात संपता संपेना. जेवून जेवून थकलो. आजूबाजूचे लोक भातावर भात खात होते. वेटर आमच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहात होते. ‘कसं होणार यांचं? एवढासा भात यांना खाववेना?’ सगळ्या हॉटेल्समध्ये भाताचं प्रमाण सारखंच. मग आम्ही शहाणे झालो. दोघांत मिळून एक मिनी मील संपवायला लागलो!

केरळ काळीमिरींचा देश. त्यामुळे त्यांच्या पदार्थात भरपूर काळीमिरी, हिरव्या-लाल मिरच्या, आल्याचा वापर. तामिळनाडूत लाल मिरच्या, खोबऱ्यांचं वाटण याचा वापर जरा कमीच. जेवण जरा सौम्य. सांबारा-सांबाराच्या चवीतही फरक. एवढंच कशाला सुप्रसिद्ध टळफ चाही एक जनरल सांबार मसाला आणि मद्रासी सांबार मसाला असे दोन वेगवेगळे प्रकार! हळूहळू भाषेतले भेदाभेदही आम्ही ओळखू लागलो. कुणी बोलत असले तर ही भाषा तेलगु, ही कन्नड, ही तमिळ, ही मल्याळी इतकेदेखील समजू लागले. अशा तऱ्हेने दक्षिणेतलं राहणं आम्ही सर्वेद्रियांनी अनुभवू लागलो.

शेजाऱ्यांनाही आमच्याबद्दल अमाप कुतूहल होते. ‘मुंबई’ नावाचा महिमा किती अगाध आहे, ते मुंबईच्या बाहेर गेल्यावर कळले. फॉरेनहून आलेल्या माणसाच्या खालोखाल मुंबईकराला महत्त्व! कामवालीच्या डोळ्यांत तर देवाघरी काम करण्याचे भाव! माझा गव्हाळ वर्ण तिथे गोरापान ठरला. माझे पंजाबी ड्रेस तिथे वाखाणले जात. वास्तविक मी आणि फॅशन म्हणजे ३६ चा आकडा. एका सकाळी माझी तेलगू घरमालकीण आणि मल्याळी आंटी घरी आल्या. मी फुलके करीत होते. गॅसवर पडल्यावर चेंडूसारखे टम्म फुगणारे फुलके दोघीजणी विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहात होत्या. घरमालकिणीकडे सहामासी चपात्या तर मल्याळी आंटी रोज चपात्या बनवायची, पण जाडय़ाभरडय़ा. त्यामुळे पातळ, लुसलुशीत, फुगलेल्या चपात्यांचे त्यांना नवल वाटत होते. फुलके खाली उतरवून मी त्यांना साजूक तूप लावत होते. त्यावर एक उसासा सोडून दोघी म्हणाल्या, ‘‘तूप लावते ना तू म्हणून छान होतात तुझ्या चपात्या.’’ (म्हणजे माझ्या करण्याचं कौशल्य काहीच नाही?) मल्याळी आंटी पुढे म्हणतात कशा, ‘‘पण तुम्हा नॉर्थ इंडियन लोकांना रोटय़ा चांगल्याच जमतात.’’ माझ्या डोळ्यांपुढे सरसोंका तेल डोक्याला चिप्प लावलेलं, भांगात सिंदूर घातलेलं, दोन्ही हातभर लाल बांगडय़ा घातलेलं, घुंघट काढलेलं असं माझं गरीब बापडं, भोळंभाबडं ध्यान उभं राहिलं. सगळीकडे अचानक राईच्या तेलाचा वास सुटला. ‘‘हम नही नॉर्थ इंडियन,’’ मी फणकाऱ्याने उद्गारले!

पूर्वप्रकाशित : लोकसत्तामधील लेखाचा दुवा