।।मृत्योSर्मा अमृतं गमय।।

डॉ. ऋजुता कुशलकर,
drrujutak@gmail.com

यक्षाने धर्मराजाला विचारले, ‘‘या जगात सर्वांत आश्चर्यकारक कुठली गोष्ट आहे?’’ धर्मराजाने सांगितले, ‘‘आपल्याला एक दिवस मृत्यू गाठणार आहे हे माहित असूनही सर्वजण या नश्वर जगात, मोहमायेत अडकून राहतात ही सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट आहे.’’ अतिशय दुःख देणारा, नुसत्या अस्तित्त्वाने थरकाप उडवणारा मृत्यू ते जीवनाची गुहथे सांगणारा सखा आणि पुढे वेदनांपासून मुक्ती देणारा त्राता असा माझा मृत्यूसमवेत प्रवास झाला त्याचा हा लेखाजोखा.

लहानपणापासून मृत्यू कधी जवळून पाहिला नाही. शहरात राहिल्याने असेल असा प्रसंग कधी आला नाही. कुणाच्याही, मरणाची बातमी आल्यावर/तिथे जाऊन आल्यावर आजी-बाय आणि आईची बातचीत कानावर यायची. ‘‘अगदी शांतपणे प्राण गेले त्याचे मोठं भाग्याचं मरण’’ किंवा ‘’जीव खूप तडफडला. कशाकशात जीव अडलेला तिचा’’. मरणार्‍या माणसाच्या मनात काय भावना असतात? कशामुळे एखाद्याला शांतपणे मृत्यू येतो तर एखाद्याचा जीव तडफडतो? कदाचित कधीच उत्तर न मिळणारे प्रश्न पडायचे मला.

लग्नानंतर मृत्यूचे अगदी जवळून दर्शन झाले. लग्नानंतरच्या आठ वर्षांत सहा मिसकॅरेज झाले माझे. प्रत्येकवेळी ते बाळ मला सोडून जाताना मीही अंशाअशाने मरत राहिले. पुष्कळवेळा ‘माझं बाळ तर गेलं, मी का जिवंत आहे?’ असे दुःखी विचार मनात यायचे. देहातून मुक्त होण्यासाठी जीव तडफडायचा पण तीव्र इच्छा असूनही आयुष्य संपवण्याची हिंमत झाली नाही. ही तीव्र इच्छा खूपदा होणार्‍या कमी-अधिक गंभीर स्वरुपांच्या आजारातून डोकावत राहिली.

‘मला मरायचं आहे. देवा मला ने ’ या माझ्या इच्छेची पूर्तता देवाने करायला घेतली लग्नानंतर १२ वर्षांनी.  त्याआधी त्याने आमच्या आयुष्यात एक बाळ पाठवून दिलेलं आणि तेव्हा मला मरायची अजिबात इच्छा नव्हती. कधी नव्हे ते आयुष्य समरसून, आससून जगत होते मी. आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. त्यात मृत्यूवर लावलेला अलार्म इतक्या उशीराने पण कर्कश्यपणे वाजायला लागलेला. नवर्‍यात, मुलात अगदी घरातदारात जीव अडकलेली मी सर्वसामान्य, संसारी बाई. जीव खूप तडफडला माझा. आई-मुलाची ताटातूट करणारा क्रूर मृत्यू. आधी मुलाला आईपासून दूर नेत होता. आता आईला मुलापासून अलग करायला आलाय. ‘अरे यमा, आई-मुलांचे तळतळाट लागतील रे तुला’.

मुलगा अवघ्या पावणेचार वर्षांचा. नीट तहान-भूक लागलेली सुद्धा कळत नाही त्याला. आतापर्यंत मला सोडून कधी राहिला नाही. काय होईलं त्याचं? कसा वाढेल तो? परक्या ठिकाणी नवरा मुलाला कसं सांभाळेल? एक बाई मुलांना एकहाती, जिकीरीने का होईना वाढवू शकते पण पुरुषासाठी ते कठीणच. माझ्या सासूबाईंही सुखाचे दिवस आल्यावर अचानक निर्वतलेल्या. त्याचं आणि माझ्या नवर्‍याचं फार मेतकूट. तो आहेही मातृमुखी. नशीबात काय त्याच्या गृहसौख्य नाही?

आईचा मृत्यू जवळून पाहून आणि त्यानंतरची जगराहाटी विषण्णतेने अनुभवून कमलेश जाणता झालेला. माझे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांनाही ह्दयाला मिठी मारलेला आणि फुप्फुसात पसरलेला ट्यूमर पाहून माझी फारशी आशा नव्हती. मी ‘हरहर महादेव’ म्हणून लढायला सज्ज झाले. भूलतज्ज्ञ डॉ. सुधाकर आमच्या कुंटुबाबद्दल काही खास कारणाने आत्मीयता बाळगणारे. माझा हात घट्ट धरुन प्रेमाने थोपटत म्हणाले, ‘टेक ओन्ली वन डे ऍटअ टाइम. फक्त एका दिवसचाच एका वेळी विचार कर.’  माझ्या आयुष्याची गॅरण्टी फक्त आजचा दिवस. उद्याच्या दिवसाची शाश्वती नाही. दोन पाच-दहा वर्षांच प्लॉनिंग माझ्यासाठी कालबाह्य झालेलं. काय माहित किती वेळ माझ्या नशीबात होता? पाणावलेल्या डोळयांनी माझा बेटर हाफ म्हणाला, ‘’मी नोकरी सोडतो. मुंबईला आपल्या माणसांत जाऊ. जितका वेळ मिळेल तितका एकत्र आनंदात घालवूया.’’ माणूस गेला की उरतात त्याच्याबरोबर घालवलेले सुख-दुःखाचे क्षण! दुसरं काही नाही. संध्याकाळच्या कातरवेळेला हात कामात गुंतलेले असताना कुणाच्या तरी ओठांवर आपल्या आठवणीने हसू आणि डोळयांत आसू यावे एवढीच इच्छा जाणार्‍या जीवाची! एवढचं मागं ठेवून जातो आपण!

ऑपेरशन झाल्यापासून सात-आठ महिने सुन्न मनःस्थितीच गेले. किमो झाले. रेडिएशन संपत आले. उन्हाळा संपला. पावसाळा गेला. थंडी पडू लागली. दिवाळीचा प्रसन्न गंध चुरचुरीत हवेत मिसळला. एकावेळी एकाच दिवसाचा विचार करायचा. या नरकयातना आजच्याच दिवस. उद्याच्या यातना वेगळया. आजचा आणि उद्याचा काही संबंध नाही. असे करता करता मी सहा महिने जगले होते. डोळयांतून अर्निबंध अश्रू वाहू लागले. अश्रू दुःखाचे उद्याच्या अनिश्चिततेबद्दल.

ट्रीटमेंट चांगली लागू पडली. टयूमर आक्रसला. मृत्यचे काळे ढग विरळ होऊ लागले. हे सर्व एक दुःस्वप्न होतं असं समजून विसरायची तयारी सुरु झाली. माणसाची स्मरणशक्ती किती कमजोर, तकलादू असते नाही? की चतुर असते आपल्याला फायद्याचं, सोयीचं तेवढंच लक्षात ठेवणारी? आयुष्य परत नव्या उमेदीने सुरु करायचे भविष्यकाळातले बेत सुरु झाले.

पत्त्याचा बंगला कोसळावा तसे हे बेत खाड्कन कोसळले. ट्रीटमेंट संपल्यावर तीनच महिन्यात कॅन्सरने परत डोके वर काढले. मृत्यू कुठे दूर गेला नव्हता. जवळच दबा धरून बसला होता. किमोसाठी बेस्ट औषध देऊन झालेली. रेडिएशनचा लाइफ-टाइम डोस दिलेला. शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. खूप धोकादायक पेशंटच्या जीवाला. ‘चल, निघायचं ना’ म्हणत यम दाराशी उभा ठाकलेला! माणूस पूर्णपणे तळाला आपटला की परत उसळी घेऊन वर येतो म्हणे. यावेळी मी गडबडले नाही.

हे मृत्यो! मी तुला फार जवळून पाहतेय इतकी वर्षे. तुझ्या समोर कुणाचेच चालत नाही. माझ्या न जन्मलेल्या, अश्राप बाळांनाही तू सोडलं नाहीस तर मला काय सोडणार तू? तूला टाळू तर शकत नाही मी. पण मी येईन ती माझ्या अटींवर येईन. माझ्या स्टाइलने येईन. गालितगात्र, असहाय्य अवस्थेत शरीराचं ओझं फेकून द्यायला मी येणार नाही. जन्मजन्मांतरीचे नातं आहे. आपलं दर जन्मात दया, क्षमा, शांती, करुणा, धैर्य इ. गुणांतील काहीतरी शिकायचं उद्दिष्ट आहे प्रत्येक जीवाचं. तेजाचा एकेक कण गोळा करुन त्या शाश्वत तेजात. सतम्‌धे एकरुप व्हायचयं मला. यत् प्रयन्ति अभिसंविश्यन्ति! (सर्वजण ब्रहमाकडे) जातात आणि त्यांच्यामधे प्रवेश करतात.
हे शिकण्यसाठी साधन आहे माझा देह आणि त्याला भोगावे लागणारे भोग. ते सर्व भोग मी आनंदाने भोगीन. कुंतीने कृष्णाजवळ वर मागितलेला, ‘देवा मला कायम दुःख दे म्हणजे तुझे स्मरण मला निव्य राहिल.’ त्या दुःख भोगण्याचाच मी सोहळा करेन.

हे मृत्यो, केवढा मोठा वर दिलास तू मला. कशी नवीन दृष्टी दिलीस मला की आतापर्यंत मी त्या दृष्टीचा वापरच करत नव्हते? जन्म- मृत्यू, यिंग-यांग, सृजन-संहार एकाच चैतन्याचे दोन अविष्कार. सर्व प्राचीन संस्कृतींना ते जाणवलं होतं. तू समोर दिसेपर्यंत कसे आम्ही विसरतो हे सारे? ‘कोSहम्’? असा प्रश्न नाही. ‘मी मी सर्वकळे! परंतु ना कळे| मी कोण| कोठील मी|’ असा संभ्रमही नाही. ‘सोSहम्’. ‘अहं ब्रह्यास्मि’ . मी प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. ‘प्रज्ञानम् ब्रह्म’ . ज्ञान हेच ब्रह्म.

सर्व प्राणीमात्रांशी, सर्व भूतांशी नाळ जोडून दिलीस बघ माझी. ही झाडे-झुडूपे, सुक्ष्म जीव पृथ्वी, तारकामंडळ, अनेक आकशगंगा पोटात घेऊन प्रसरण पावणारे विश्व हे सर्व म्हणजे मी आहे. माझ्यातच हे ब्रह्म आहे. काही द्वैत नाहीच. या सगळयाबाद्दल प्रेम कसं दाटून आलय बघ मनात. या प्रेमाच्या, ज्ञानाच्या प्रकाशात मन/सगळं अस्तित्त्व कसं उजळून निघालय. किती जणांना समजत नाही रे हे. त्यांना मदत करण्यासाठी शक्ती दे. भक्ति दे. या जन्मीचं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं की मग देहाची जीर्ण वस्त्रे उतरवून येईन मी तुझ्याबरोबर आनंदाने, पुढच्या प्रवासासाठी. फक्त हे सर्व नीट निभावून नेण्याचे त्राण या शिणलेल्या कुडीला दे. भक्ती दे. निरंहकारी मन दे. मला झेपेल इतकं आत्मज्ञान दे.

शिवोSहं शिवोS हं शिवोS हं |

अखिल विश्र्व का जा परमात्मा है
सभी प्राणिंओं का वही आत्मा है
वही आत्मा सच्चिदानंद मै हॅूं…. शिवोSहं ।।१।।
अमर आत्मा है मरणशील काया
सभी प्राणियोंके जो भीतर समाया
वही आत्मा सच्चिदानंद मै हूँ …….. शिवोSहं।।२|ं
न शस्त्र काटे न अग्नि जलावे
बुझावे न पानी न मृत्यू हटावे
वही आत्मा सच्चिदानंद मै हूँ …..शिवोSहं ।।३।।
है तारोसितारों में आभास जिसका
है सुरज औंर चंदामें आलोक जिसका
वही आत्मा सच्चिदानंद मैं हॅू….शिवोSहं।।४।।
अजर और अमर जिसको वेदोंने गाया
वही ज्ञान अर्जुन को हरिने सुनाया
वही आत्मा सच्चिादानंद मैं हूँ ….शिवोSहं।।५।।

आत्मषट्‌क, श्रीमद् आद्यशंकराचार्य.

===================================================================

©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.