साद…उत्कट अग्निफुलाची

डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

माझी मैत्रीण स्मिता आणि मी कॉलेजमध्ये असताना झाडांपायी खुळ्या झालो होतो. ‘आजकाल पॉंव जमींपर नहीं पडते मेरे’ अशी स्थिती असल्याने नजर नेहमी आभाळाकडेच असायची. त्या नजरेच्या टप्प्यात निरनिराळ्या ऋतूंमध्ये विलोभनीय विभ्रम दाखविणारे झाडांचे शेंडे अलगद यायचे. भरीस भर म्हणून आम्ही दोघीजणी गिर्यारोहणाला जाऊ लागलो. त्यावेळी डोंगर चढताना – उतरताना, तसंच डोंगरमाथ्यावरून दिसणार्‍या निसर्गाच्या विराट रूपाने आमच्यावर गारुड केले होते. पुढे आम्ही मुंबईतल्या कॉंक्रीटच्या जंगलातही हिरवाईची बेटे शोधू लागलो.

आम्ही दोघी रुईया कॉलेजवाल्या. आजूबाजूला हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, फाइव्ह गार्डन्ससारखा सुंदर परिसर आणि जोडीला औत्सुक्याने भरलेलं आमची तरुण मनं. वेगवेगळी झाडं बघत, फुलं शोधत दोघी खूप भटकायचो. या वेडाचा संसर्ग आमच्या दुसर्‍या मैत्रिणींनाही झाला. त्याही आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या. तलम पोपटी रंगाची शिरीषाची नाजूक फुले अंगावर बरसत असताना कविता वाचणे म्हणजे स्वर्गसुखाची सीमा होती…….

तेरडा फुलल्याचा बहाणा

खिडकीत यायला पुरेसा असतो,

खिडकीत आल्यावर मग

फुललेला तेरडा महत्त्वाचा नसतो….

ट्रेन मधून येता-जाताना दादर ते गोरेगाव या प्रवासात दोन्ही बाजूंना दिसणारी सोनमोहर आणि रेन ट्रीची झाडे. वीस वर्षांपूर्वी जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान फारशी वस्ती नव्हती. पावसाळ्यात रेल्वे टॅ्रकला लागून छोटी-छोटी तळी तिथं दिसायची. अगदी सुंदर, लाल-पांढर्‍या कमळांसहित! जवाहर नगर सुरू व्हायच्या आधी नाल्याच्या अलीकडे एका छोट्याशा उंचवट्यावर एक नीटस शाकारलेली झोपडी. आणि झोपडीवर सावली धरून असलेलं एक झाड. तो नाला ओलांडला की स्वप्नातून वास्तवात आल्यासारखं वाटायचं!

वीस वर्षांपूर्वीचं गोरेगाव पश्चिमही नगर नियोजनानुसार वसवलेलं उपनगर होतं. आखीवरेखीव वस्त्या. मोठे रस्ते. दोन्ही बाजूंना फुटपाथ. फुटपाथवर लावलेली रेन ट्रीची झाडं. मार्च-एप्रिलमध्ये नाजूक गुुलाबी फुलांचा कशिदा काढलेली पोपटी रंगाची ओढणी रेन ट्री घेत असत. पावसाळा सुरू झाला की ते गर्द पाचूच्या रंगाचं वस्त्र परिधान करत… भारदस्त प्रौढेला साजेलस असं! रसरसलेली ही झाडं! वाटायचं-खेंव दिला तर ‘शब्देविण संवादू’ होईल. आपल्या खाली झेपावलेल्या फांद्यांनी आंजारागोंजारायचं  असायचं त्यांना. बसस्टॉपवर उभं असताना, रस्त्याने चालत असताना अचानक जोराचा वारा यायचा. झाडं खट्याळपणे पानांमधून धरून ठेवलेलं पाणी अंगावर सांडायची. ‘कशी गंमत केली’! म्हणून आनंदाने सळसळत राहायची. हसत राहायची. मनाच्या गाभ्यापर्यंत आत आत उतरत जाणारे ते थेंब माझ्या ओठांवर गाढ मैत्रीचं, प्रेमाचं हसू आणायचे.

डिसेंबर आला की झाडं निस्तेज होत. ‘एकेक पान गळावया’ सुरू होई आणि मग फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सगळी झाडं ओकोबोकी होतं. कॉलेजमध्येही लेक्चर्स, प्रॅक्टिकल्सची धांदल सुरू होई. परीक्षांचे वेध लागत. जर्नल्स पुरी करण्यासाठी लेडिज रुममध्ये पोरी घोळका करून बसत. हळूहळू कॉलेजमध्ये शुकशुकाट होई. मार्चच्या मध्यावर परीक्षा. त्याआधी १५-२० दिवस अभ्यासासाठी सुट्टी मिळायची. घरी बसून कुठे आम्हा दोघींचा अभ्यास होणार? सकाळी साडेसात वाजताच आम्ही दोघी कॉलेजमध्ये हजर! दादर (सेंट्रल) ते माटुंगा (सेंट्रल) स्टेशनला जाणारा रस्ता रुईयाच्या प्रसिद्ध कट्टयाला चिकटून जातो. रस्ता दोन्ही बाजूंनी डेरेदार रेन ट्रींनी सुशोभित झालेला. निष्पर्ण रेन ट्रींना हळूहळू येणारी लुसलुशीत, पोपटी पालवी बघणं हा आम्हा दोघींचा आवडता छंद. प्रत्येक झाड वेगवेगळ्या स्टेजमध्ये . ‘हे माझं झाड’, ‘हे तुझं झाड’ अशी वाटणीही चालायची. ती झाडं आमच्या उमलणार्‍या आनंदी भावावस्थेची प्रतिबिंब होती. पानांनी झाड डवरते-नाही डवरते तोच लहान बाळाच्या जावळाहूनही नाजूक अशी गुलाबी फुले उमलायची. मऊशार पोपटी-हिरव्या शेल्यावरची ती प्रकाशमान गुलाबी फुले पाहताना आमच्या अंतरंगातील संवेदनांचा खजिना श्रीमंत व्हायचा. बरोबर पावणेआठ वाजता उन्हाच्या कोवळया कवडशाच्या रंगाचा लखलखीत, पिवळाजर्द गोल्डन ओरिओल एका हिरव्या बेटातून उडत उडत दुसर्‍या हिरव्या बेटात अदृश्य व्हायचा. डोळ्यांत प्राण आणून, श्वास रोखून आम्ही ते दिव्य दृश्य पाहायचो. तोंडातून एक सुस्कारा बाहेर पडायचा. ते स्वर्गीय दृश्य पाहिल्याचा आनंद, ते दृश्य नजरेआड झाल्याचं दुःख आणि उद्या परत दिसणार का, याची हुरहुर अशा संमिश्र भावना त्या सुस्कार्‍यापाठी असत.

एम.एस्सी. करायला स्मिता आणि मी कालिना कॅम्पसमध्ये गेलो. मुंबई विद्यापीठ नुकतेच कालिन्यात वसत होते. खुपसा परिसर पाणथळ, गवताळ जमिनीने व्यापलेला. जुलैमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो तर हिरव्यागार स्वर्गातच आल्याचा भास झाला. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे’ असा अनुपम सोहळा. छान पाऊस झालेला. जागोजागी साचलेल्या नितळ पाण्यात गवतावरची सोनपिवळी फुले निळ्या आकाशाच्या साक्षीने आपलं रुपडं निरखीत बसलेली. कुठे कुठे मातकट काळ्या रंगाचे खडक आपल्या आजूबाजूने अवखळपणे वाहणार्‍या पाण्याकडे स्नेहाद्र दृष्टीने पाहत बसलेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरव्या-पिवळ्या चवर्‍या ढाळणारे सोनमोहोर. वयाच्या विशीत पाऊल टाकणारी प्रत्येक मुलगी तिथे फुलराणी झालेली! पायात वसंताचे पैंजण होते अन् मनात आकाशाला गवसणी घालायची उमेद होती.

एम.एस्सी.च्या परीक्षा ऐन रणरणत्या उन्हात मे-जूनमध्ये होत असत. ऐन ग्रीष्माच्या काहिलीत लालजर्द गुलमोहोर आपल्याच  मस्तीत फुलत असे. निष्पर्ण झाडावरची ती अग्निफुले आपल्या दाहाने आकाशाचा निळा रंगही फिकट करणार्‍या तेजोमय लोहगोलाला आव्हान देत असत. जिद्दीने प्रतिकूलतेशी सामना करत बहरणार्‍या गुलमोहराशीही जिवाचे मैत्र जुळले.

या वर्षी, नाहीतर

कदाचित येत्या वर्षी

बांधीन म्हणतो बंगला

गुलमोहोरावरच्या

लाल गर्द फुलांच्या कॉलनीत.

कधीच ठेवला आहे घेऊन

एक प्लॉट बंगल्यासाठी

पाखराच्या अलगद पायात पुरेल एवढा;

तिथे-त्या दक्षिणेकडच्या फांदीच्या

किंचित उत्तरेला,

सातव्या फुलघोसाच्या

चार नजरांपलीकडे

वार्‍याच्या मंजिरी झुळकीजवळ….

सुखाचे दिवस भुर्रकन उडून गेले. आम्ही दोघी नोकरीला लागलो. दोन-तीन वर्षांत दोघींची लग्नेही झाली. दिवसातील दहा-बारा तास एकत्र घालवणार्‍या आम्हा दोघींना किमान आठवड्या-पंधरवड्यातून एकदा एकमेकींशी फोनवर पाच मिनिटे बोलायलाही फुरसत मिळेना. दोघीही संसारात पूर्णपणे गुरफटलो. एक-दोन धक्क्यानंतर स्मिताचा संसार सुरळीत सुरू झाला. माझ्या मागे मात्र दैव हात धुऊन लागले. आशा-निराशेच्या रोलरकोस्टरवर माझी सवारी सुरू झाली. पापण्याआड जमलेल्या अश्रूंच्या धुक्यामुळे बहरलेली झाडं दिसेनाशी झाली. कवितांच्या ओळी आठवल्यावर आलेले कढ आतल्या आत जिरवू लागले. गुलमोहोराच्या फुलांनी लगडलेल्या फांदीवर कधीकाळी कल्पनेच्या विश्वात बांधलेले पाकळ्यांचे घरटे मनाला क्लेश देऊ लागले.

मध्येच आमच्या बाळाच्या रूपाने वसंताची एक झुळूक आली, पण तना-मनाला ते सुख काही झेपले नाही. दुःखाच्या मार्‍याने, आजारपणाने खिळखिळे झालेले शरीर कोसळले. मी भयंकर आजारी पडले. हृदयाला कवेत घेऊनच कॅन्सर वाढला होता. केमोच्या नरकयातनातून जाताना खिडकीतून समोर फुललेला गुलमोहोर दिसायचा. ‘ही आपली शेवटचीच भेट… ’मी शब्दावीण गुलमोहोराला सांगितले. तो काही बोलला नाही. स्तब्ध उभा राहिला.

उपचार संपून तीनच महिने गेले अन् सगळं विष पचवून कँन्सरने परत डोके वर काढले. औषधांना न जुमानता ट्यूमर परत वाढू लागला. डॉक्टरांनी निराशेने मान हलवली. त्यांच्याकडचे उपाय खुंटले होते. सृष्टीत मात्र वसंत परत आला होता. सोनेरी पिंपळ उन्हात लखलखू लागला. कोकीळ गाऊ लागला. इतकी मोहक सृष्टी सोडून जायची माझी वेळ आली होती. गुलमोहोरावर मात्र पानांचा त्याग केलेल्या ओक्याबोक्या फांद्या उरल्या होत्या. गुलमोहोराला माझ्या मनीचे दुःख उमजले होते. ‘मी माणूस आहे रे.झाड नाही ना…. परत परत पाने गळायला आणि पुन्हा नवीन पालवी फुटायला शिणले रे मी हे दुःखाचे ऊन झेलून झेलून …’ माझा आकांत त्याच्यापर्यंत पोहोचत होता. तो मूकपणे पानं गाळून उभा होता. थोड्याच अंतरावर असलेल्या डोंगरावरच्या घनदाट जंगलाचे युगानुयुगे संक्रमित झालेले जीवनविषयक शहाणपण निःशब्दपणे माझ्या मनात उतरवीत होता. वनातील चैतन्याच्या झुळकीने माझ्या गात्रा-गात्रांत स्पर्शाविना संजीवनी भरत होता.

यादरम्यान मला पर्यायी उपचार पद्धतींची माहिती मिळाली. दुसरे सर्व उपाय खुंटल्याने जिवाच्या आकांताने मी ते उपचार सुरू केले. मे अखेरीला केलेल्या स्कॅनमध्ये कॅन्सरच्या वाढीचा वेग थोडा कमी झालेला दिसला. डॉक्टरांनाही थोडी आशा वाटू लागली. माझ्याही चेहर्‍यावर अनेक महिन्यानंतर थोडे हसू उमलले. सहज खिडकीबाहेर पाहिले तर ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हातही पोपटी मऊशार पानांनी गुलमोहोर बहरत होता. आणि मधे मधे या फांदीवर घर बांधशील की त्या फांदीवर, असे आग्रहाचे आमंत्रण देणारी लालभडक फुले फुलत होती.

माझा पाच वर्षांचा मुलगा आजोबांना ओढत ओढत खिडकीत घेऊन आला आणि म्हणाला, ‘ आबा, पाहा गुलमोहोर किती फुललाय! त्याची लाल फुले किती छान दिसताहेत ना?’

मनुष्यप्राण्याची जीवनाविषयी असोशी आणि त्यातून आलेले जाणतेपण पिढ्यान् पिढ्या पाझरत जाते.

Life continues in new forms

यावर्षी, नाही तर

कदाचित येत्या वर्षी

बांधीन म्हणतो मी बंगला

….

अगदी निश्चित!

©डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – चतुरंग, लोकसत्ता २१ मे २०११

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.

wn text