फिरुनी नवी जन्मेन मी….
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कॅन्सर रुग्णासाठी पंचकर्माचे फायदे या लेखात सांगितले आहेत.
किमो आणि रेडिएशनच्या वेदनांनी आणि त्यांच्या अगम्य, अनाकलनीय साइड इफेक्टसनी शरीरात धुमाकूळ घातला होता. दिवसेंदिवस त्रास वाढतच चालला होता. शारीरिक वेदना आणि त्याजोडीला येणारे नैराश्य यांनी शरीरातील जीवनरसच आटून कोरडा शुष्क पडला होता. या सर्व त्रासाची पूर्वकल्पना रेडिएशनच्या डॉक्टरांनी दिलीच होती. वेदनाशमक गोळया घेणे, माझ्या शरीराला सोसत नव्हते. आणि तो काही कायमस्वरुपी पर्याय नव्हता. काय करायचे ? मोठा यक्षप्रश्न- उभा राहिला.
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या (वाघोली, पुणे) विद्यमाने चालणार्या ‘आयुर्वेद आणि कॅन्सर’ या प्रकल्पाच्या फायदा मी गेले दोन वर्षे घेत होते. आयुर्वेदिक औषधांनी किमो-रेडिएशनचे साइड-इफेक्टस बर्यापैकी सुसह्य केले होते. वेदनांवर उपाय म्हणून डॉ. सरदेशमुखांनी नाडी पाहून सांगितले. ‘पंचकर्मासाठी या मॅडम. खूप फायदा होईल. काही गोष्टी फक्त औषधांनीच नाही बर्या होत. बघा विचार करा तुम्ही.’ पंचकर्मासाठी घर सोडून वाघोलीला तीन आठवडे रहावे लागणार होते. माझ्या लहान मुलाला सांभाळायचा प्रश्न होता. संसार कुणावर टाकून यायचे? घरी कुणी येऊन राहील असेही नव्हते. आणखीही एक कारण होते. याआधी एकदा घरी पंचकर्म केले होते. त्यांच्या आठवणी फारशा सुखद नव्हत्या. ‘डॉक्टर, इथल्या इथेच करता येइल का पंचकर्म? मी रोज येईन जाईन. पथ्य आटोकाट सांभाळीन. ‘मी मधला मार्ग काढायचा प्रयत्न केला.’ ‘अहो मॅडम, इथे राहिलात तर संसाराच्या तापातून तुमचे मन कधीच मोकळे होणार नाही. पथ्यही २०-२२ दिवस पूर्णपणे सांभाळले जाणार नाही. मग पंचकर्माचा तसा फायदा होणार नाही.’ डॉ. सरदेशमुख त्यांच्या नेहमीच्या शांत, समजुतीच्या स्वरात म्हणाले.
मी पंचकर्माचा विचारच कोपर्यात ढकलला. संसारात पाय पूर्णपणे गुंतलेला. आवा चालली पंढरपूरा, वेशीपासून आली घरा’, यातली गत. पण वेदनांनी जीव नकोसा केला. दुसरे काही उपचार नव्हतेच. मग मी नाईलाजाने, मुकाटयाने पंचकर्म करायला हो म्हटलं. ‘पंचकर्मानी माझ्या वेदना कशा कमी होणार?’ असे भले मोठे प्रश्नचिन्ह मनात घेऊन वाघोलीला आले. पंचकर्म कॉटेजभोवतालची विस्तीर्ण मोकळी जमीन पाहून मी जरा हवकलेच. मुंबईसारख्या शहरात राहिल्याने डोळयांना, मनाला इतकी मोकळी जागा पाहण्याची सवयच नव्हती. इतक्या शांततेत पुढचे एकवीस दिवस कसे काढायचे? कायम गर्दी, कोलाहलाची सवय. शांततेची भिती वाटते शहरी माणसांना! संध्याकाळी सहज फिरत फिरत म्हणून सरदेशमुख महाराजांच्या समाधीकडे गेले. समाधीजवळ डोळे मिटले तर मनाला काहीतरी आश्वासक असे स्पर्शून गेले.
दुसर्या दिवशी सकाळपासून पंचकर्म सुरु झाले. पंचकर्म म्हणजे आधुनिक भाषेत डीटॉक्सीफिकेशन. शरीरातील दोष बाहेर टाकले जातात. पंचकर्म हे प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार, आजारनुरुप, त्याला सोसेल एवढेच असते. त्यासाठी वापरण्यात येणारी तैले, काढे, औषधे, आहार रुग्णानुरुप बदलतो. अगदी दोन सारख्या आजाराचे रुग्ण असले तरी त्यांच्या प्रकृतीनुसार, होणार्या त्रासानुसार औषधे, उपचार बदलतात.
वमन, विरेचन, नस्य, बस्ति, रक्तमोक्षण ही पाच कर्मे. यासाठी पूर्वकर्म स्नेहन आणि स्वेदन. शरीराला तेल लावून मसाज किंवा स्नेहन करतात. नंतर वाफेच्या पेटीत बंद करुन स्वेदन होते. स्त्री रुग्णांसाठी प्रशिक्षित स्त्री वैद्या आणि पुरुष रुग्णांसाठी पुरुष वैैद्य. दोन दोन हसतमुख, रुग्णाबद्दल मनापासून आस्था असलेल्या, तुमच्या सर्व शंकाचे न कंटाळता निरसन करणार्या वैैद्यांशी त्वरीत मैत्री होते. विश्वसुंदरीलाही आपल्या शरीरात काहीतरी न्यून आहे असे वाटते. मग कॅन्सर रुग्णांचे शरीर म्हणजे शस्त्रक्रियांच्या नानाविविध खुणा- व्रण बाळगणारे, किमोमुळे काळवंडलेले बेढब शरीर. स्वतःलाच आपल्या शरीराबद्दल ओशाळलेपण असते. त्यातून ब्रेस्ट कॅन्सरमुळे जर ब्रेस्ट काढलेले असेल तर शरीराबद्दल न्यूनगंडच असतो. अशा शरीरालाही वैद्या आईच्या मायेने, साईंच्या हातांनी स्पर्श करतात. आपला सगळा संकोच, ओशाळलेपणा दूर होतो. दोनजणी मालीश करत असतात एकाच लयीत. डोळे बंद केल्यावर वाटतं एकाच व्यक्तिचे हे दोन हात आहेत.
मालिशने इतकं का बरे वाटते? बाळाला ममतेचा पहिला स्पर्श मातेचा. माता त्या स्पर्शातून बाळाला सांगत असते. ‘माझ्या बाळा, खूप मोठा हो. आयुष्यमान भव. यशवंत हो.’ मातृप्रेमाचीच भावना इथे स्पर्शातून व्यक्त होते. उपचार देणार्यांच्या मनातील निःस्वार्थी सदिच्छा रुग्णाच्या ह्दयापर्यंत झिरपतात. रुग्णाला आश्वस्त करतात. ‘माझी मनापासून, पैशाचा लोभ न धरता काळजी करणारे आहेत इथे.’ पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आपल्याला या जन्मात एकत्र आणतात. गरम तेलाची सुखद उष्णता प्रत्येक पेशीपर्यंत झिरपते. प्रत्येक पेशीत साचलेला मल, दोष चल होतात. प्रत्येक पेशीला नवसंजीवन मिळते. दुखरे भाग शांत होतात. स्वेदनामुळे शरीरातील रंध्रेन रंध्रे मोकळी होतात. चेहर्यासह सर्व शरीर एका नवीन तेजाने झळाळू लागते.
यानंतर रुग्णाच्या तक्रारीनुसार एक किंवा अनेक पंचकर्मे. शिरोधारा, शिरोबस्ती, नेत्रबस्ती, कटीबस्ती, ह्दयबस्ति, नाभिबस्ती, योनीधावन, योनिपिचू गरजेनुसार यातल्या पूरक क्रिया.
आयुर्वेद म्हणजे निरोगी, निरामय आयुष्याचा वेद. केवळ रोगाची लक्षणे नव्हे तर रोगाचे मूळ कारण शोधून त्याचे निराकरण करणारे शास्त्र. रुग्णाला रोगी शरीर म्हणून नव्हे तर माणूस म्हणून केंद्रस्थानी ठेवून उपचार करणारे शास्त्र. आयुर्वेदानुसार सप्तधातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) आणि त्रिदोषांनी (वात, पित्त, कफ) माणसाचे शरीर बनलेले असते. वात, पित्त, कफ जेव्हा योग्य प्रमाणात असतात तेव्हा शरीर निरोगी असते. त्यातील एक किंवा अनेक दोष प्रमाणाबाहेर वाढले की रोग उत्पन्न होेतो. हे दोष औषधांनी दाबले तर तात्पुरता आराम वाटतो पण पुढे कुठल्यान् कुठल्या रुपात, व्याधीरुपात व्यक्त होतात. आहारविहारातील त्रुटींमुळे, ऋतूनुसार आणि इतर काही कारणांमुळे दोष वाढतात. निरोगी माणसांमधेही वेगवेगळया ऋतूंत वेगवेगळे दोष वाढतात. या दोषांचे शमन करुन आरोग्याची पुर्नप्राप्ती करुन देणे हे पंचकर्माचे कार्य. वसंत ऋतूत (फेब्र, मार्च) कफवृद्धी होते. त्याचे शमन वमनाने होते. शरद ऋतूतील (ऑक्टोबर) पित्तप्रकोपासाठी विरेचन उपयुक्त ठरते. तर ग्रीष्म-वर्षा ऋतूंच्या संधीकालात वातवृद्धी होते. त्यासाठी बस्ति सर्वोतम. आता या पंचकर्मांबद्दल आपण जास्त माहिती घेऊया.
वमन- कफदोषाचे प्राधान्य. उरस्थानातील दोषांसाठी वमन उपयुक्त. सुरुवातीला ३-४ दिवस रुग्णाला औषधी काढे दिले जातात. मग दुसरी औषधे (उदा. यष्टीमधू काढा, उसाचा रस, दूध, सैंधव जल, साधे पाणी इ.) देऊन उलटीवाटे कफ बाहेर काढला जातो. पित्त पडायला लागले की थांबवले जाते. मुखात/घशात आलेला चिकटपणा घालवण्यासाठी त्रिफळा काढ्याच्या गुळण्या आणि त्रिफळत्रिकटूचा धूर दिला जातो. नंतर एक-दोन दिवस हलका द्रव, आहार, मऊ खिचडी दिली जाते.
विरेचन- पित्तप्रकोपाचे शमन करण्यासाठी विरेचन उत्तम. तीन-चार दिवस सकाळी उपाशीपोटी औषधी तूप खायला देतात. प्रत्येेक दिवशी तूपाची मात्रा वाढवत नेतात. मलामधून तूप बाहेर पडले की स्नेहसिद्धी झाली. मग एक दिवस विश्रांती. दुसर्या दिवशी सकाळी एक ग्लासभर भाताची पेज दिल्यावर स्नेहन, स्वेदन केले जाते. नंतर विरेचनासाठी औषध दिले जाते. प्रामुख्याने इच्छाभेदी रस वटी व मनुका, बहावा, एरंडेल तेल इ. चा काढा. मलावाटे दोष बाहेर पडतात. पोटातील अग्नि परत प्रदीप्त होईपर्यंत हलका द्रव आहार, मऊ खिचडी दिली जाते.
बस्ति- वातामुळे उद्भवणार्या वेदनांवर आणि रोगांवर बस्ति जादूची कांडी फिरविल्यासारख्या परिणाम करते. आधी स्नेहन-स्वेदन करुन गुदावाटे औषध दिले जाते. विविध तेले, काढे, मध, सैंधव, औषधांनी युक्त दूध यांचा वापर केला जातो. अनुवासन बस्ति म्हणजे तेलबस्ती. निरुह म्हणजे काढा बस्ति. बृहण्बस्ति म्हणजे औषधांनी सिद्ध दूध. मलावाटे दोष बाहेर पडतात. या दरम्यान हलका आहार दिला जातो.
नस्य- शिरोरोगात नस्य प्रभावी ठरते. डोकेदूखी, नेत्ररोगावर उपयुक्त. डोळयांना त्रास होऊ नये या बेताने स्नेहन-स्वेदन केले जाते. नाकात औषध टाकले जाते.औषध तेथे शोषले जाते आणि रोगहरण होते.
रक्तमोक्षण- रक्तदुष्टीमुळे होणार्या रोगांवर उपाय म्हणून रक्तमोक्षण केले जाते. त्वचारोगांत, कुष्ठरोग, नागिण, गळवं, मूळव्याध, सोरायसीस इ. रोगांत रक्तमोक्षण प्रभावी ठरते.
या मुख्य पंचकर्मांपैकी रुग्णांच्या प्रकृतीनुसार, तक्रारीनुसार एक किंवा जास्त कर्मांचा उपयोग केला जातो. रुग्णाला सोसेल एवढेच कर्म केले जाते. ऋतूसंधिकालात होणार्या दोषप्रकोपांचे निराकरण करुन पंचकर्माने सामान्य माणसांनीही रोग आटोक्यात ठेवावे असे ऋषीमुनींनी सांगितले आहे.
या पंचकर्मांच्या आगेमागे शिरोबस्ती, कटीबस्ती, ह्दसबस्ती, नाभीबस्ती या पूरक क्रियांपैकी गरजेनुसार एक किंवा अनेक पूरक क्रिया केल्या जातात. या पूरक क्रियांमध्ये दुखर्या भागावर उडीद डाळीच्या पीठाचे पाळे करुन त्यात कोमट औषधी काढे किंवा तेल घालतात.
यासर्व पूरक क्रियांपैकी खूप प्रसिद्ध असलेली, जाहीरातीद्वारे आपल्या सर्वांना माहित झालेली आणि माझी अत्यंत आवडती क्रिया म्हणजे शिरोधारा. ताणतणावांचे शमन करण्यासाठी, अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी शिरोधारेचा उपयोग होतो. आयुर्वेदात मनाचे स्थान मोठे. मनाच्या अस्वस्थतेचा शरीरावर दूरगामी, प्रतिकूल परीणाम होते हे आयुर्वेदाने-हजारो वर्षांपूर्वीच ओळखले होते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील जगभर चालणारे प्रयोगही शरीर आणि मनाचे परस्परावलंबित्त्व आता अधोरेखित करत आहेत. मन संकटांनी गांजले, कटू प्रसंगांनी निराश झाले, दमन शक्तीपुढे हतबल झाले की त्याचा परिणाम शरीरावर होतो. पोटातील पाचकरस पुरेसे स्रवत नाहीत. भूक मंदावते. पचन व्यवस्थित होत नाही. पित्त/ऍसिडीटी वाढते. बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होतो. शरीरातील इतर संप्रेरकांचा समतोल ढळतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ती व्यक्ति वारंवार आजारी पडू लागते. निद्रादेवी रुसल्यामुळे कार्यक्षमतेवर प्रतिकूल परीणाम होतो.
माणसाच्या मेंदूचा फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग आपल्या कपाळाच्या मागे असतो. राग, लोभ, क्रोध, आनंद इ. गुंतागुतीच्या आदिम आणि प्रगल्भ भावभावनांवर नियंत्रण ठेवणारा हा भाग. सोसवेलश्या कोमट तेलाची (जटामांसी तेल) धार अभिषेक पात्रातून कपाळावर आणि टाळूवर सोडली जाते. हळूहळू अस्वस्थ मन शांत होते. अस्थिर मन स्थिर होते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा अनुभव येतो. जगातल्या सर्व विवंचना मिटतात. शामनिळ्या, चमचमणारे तारे जडावलेल्या आकाशाची बिछाईत आंथरुन आणि ढगांची मऊ दुलई आपल्यावर पांघरुन निद्रादेवी आईच्या वत्सल मायेने आपल्याला कुशीत घेते. गाढ झोपलेल्या निष्पाप बाळाच्या चेहर्यावरचे निरागस भाव आपल्याही मनी दाटतात. सकाळी प्रफुल्लीत मनाने आणि ताज्यातवान्या शरीराने उठल्यावर दवात भिजलेली हिरवी झाडेपाने, पिवळे माळरान आणि सूर्याची उबदार किरणे पक्ष्यांच्या मंजूळ किलबिलात आपले स्वागत करतात. वाटते, ‘स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा.’ अशा निर्मळ मनःस्थितीत समाधीसमोर ध्यानाला बसावे. इतके दिवस नंगानाच घालणारी मनातील भूते दूर पळालेली असतात. मनाच्या रंगमंचावरही एक नवी शांत, सोनेरी पहाट होत असते. निर्विकार चित्ताने, एकाग्र चितांने प्रार्थना करावी. ‘अशीच मनाची शांती, तनाचे आरोग्य जन्मभर लाभावे. हातून काहीतरी चांगले काम व्हावे.’ किंबहुना पंचकर्माच्या या संपूर्ण कालावधीत रुग्णाने उपचारांप्रती श्रद्धा ठेवावी. विकल्प मनी आणू नये. मनात कायम इच्छा धरावी की औषधोपचाराने माझ्या शरीरातील सर्व दोष निघून जाऊ देत. आरोग्याचा लाभ मला होऊ दे. वैद्यानेही मनात कशाचा लोभ न धरता सेवेच्या भावनेतून रुग्णावर उपचार करावेत. या उपचारांदरम्यान रुग्णाने जर ध्यानधारणेचा अभ्यास केला तर गुणवृद्धी होते.
सगळे पंचकर्म आटोपल्यावर तासाभराने गरम पाण्याने सुंगधी उटणे लावून स्नान. न्हायचे तेही शिकेकाई आणि अन्य वनौषधींच्या काढ्याने. देहाचे इतके कोडकौतूक झाल्यावर जीव सुखावतो. या जगाचे अनिभिषिक्त सम्राट असल्याचा भाव मनी दाटतो. तोपर्यंत खूप कडाडून भूक लागलेली असते. इतके दिवस आपण फक्त वेळ झाली म्हणून जेवत असतो. इथे भूक लागते म्हणून जेवतो. गरमागरम पोळया, भाजी, वरण – भात, कोशींबिर, सूप. आयुर्वेदिय पद्धतीने बनवलेले सात्त्विक जेवण. जिव्हेची रसना तृप्त करणारे पण पोटाला न बाधणारे.
यानंतर सर्वात कठीण भाग! त्रिदोष वाढतात म्हणून आयुर्वेदाला दुपारची झोप निषिद्ध. बसल्या बसल्या एक डुलकी घ्या चालेल! वाचन, मनन-चिंतन, अगदी चित्र काढा, कशीदाकाम करा. तेवढ्यात डॉ. सरदेशमुख आणि इतर डॉक्टर भेटायला येतात. काय उपचार झाले, काय गुुण आला, काही त्रास झाला का याची उजाळणी होते. सर मृदूपणे हसत हसत नर्मविनोदाचा शिडकावा करुन जातात. धीराचे दोन शब्द सांगतात. प्रसन्नता उटण्याच्या सुगंधासारखी आपल्याभोवती दरवळत राहाते.
दुपारी ४.३० वाजता चहा/दूध आणि हलका नाश्ता. एखादे फळ, राजगिरा लाडू-चिक्की, फोडणीच्या ज्वारीच्या- साळीच्या लाहया. सगळे रुग्ण विश्रांती घेऊन ताजेतवाने झालेले असतात. सर्वजण फिरायला निघतात. मठापर्यंत, समाधीकडे एक चक्कर मारायला. देशी- परदेशी जनांचे एक विश्वसंमेलनच जणू भरलेले. देश, प्रांत, भाषा, धर्म असे सर्व अडसर गळून पडतात. एक-दोन दिवसांच्या ओळखीत जीवाभावाची मैत्री होते. सुख-दु:ख चालता चालता वाटून घेतले जातात. ‘You can do it.’ असा धीर दिला जातो. हास्याची कारंजी उडतात. पुस्तकांची देवाण-घेवाण होते. आपला दृष्टिकोन कितीतरी विशाल होतो. एका नवीन नजरेने आपण अवतीभवतीच्या गोष्टींकडे पाहू लागतो. जगाच्या पाठीवर मानव कुठेही असला तरी त्याची सुख दुःखे सारखीच असतात हे नवीन ज्ञान मनाला दिलासा देऊ जाते! ही एक प्रकारची ग्रुप थेरपीच! ७.३० वाजता रात्रीचे जेवण एकटयाने किंवा गु्रप-ग्रुपने केले जाते. ९.००, ९.३० पर्यंत सर्व निद्रादेवीच्या अधीन होतात. बाहेर रात्रीच्या नीख शांततेत रातकिड्याची किरकिर आपल्याला साथ देत असते.
१४/२१/२८ दिवसांचे पंचकर्म, प्रत्येक पेशीत साठलेला मल, दोष वमन/विरेचन/बस्तिद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जातात. जसजसे दिवस जातात तसतसे शरीर हलके होऊ लागते. दुखरे भाग शांत होतात. मन प्रसन्न होत जाते. इथे जितक्या वेळा, जितक्या मनमोकळेपणाने निर्मळ विनोदाला आपण हासतो, त्याच्या निम्म्यानेही आपण बाहेरच्या जगात हसत नाही. शहरात सदैव गर्दी, धावपळ. श्वास घ्यायचीही फुरसत नाही. सकाळ घड्याळयाच्या गजराने उजाडते आणि रात्र टीव्हिच्या मालिकांनी मावळते. मधला दिवस कसा जातो ते काहीच कळत नाही. आपण फक्त जिवंत असतो. जीवन जगत नसतो. वाघोलीला घडयाळयाच्या काटयावर जीवन नाही पण सर्व गोष्टी आपसूक वेळेवर होत असतात. सकाळ ओल्या गवताचा तजेलदार सुगंध घेऊन उगवते असतात. दिवसभर आपण समोरचे डोंगर, हिरवीगार झाडे, गोड सुवासाचे गुलाबी गुलाब, मोकळे-विस्तिर्ण रंग बदलणारे आकाश यांचाच एक भाग बनून राहातो. नीरव, गुढ शांतता काळोखाबरोबर हळूहळू उतरते. या शांततेत मठात घुमणार ॐकार मनात गुंजत राहतो. डोंगरातून चंद्रकोर हळूहळू वर येत आसमंत उजळवते. पौर्णिमा असली तर दिव्य, स्वर्गीय अनुभूतीच! हे सर्व कणाकणाने, क्षणाक्षणाने तनामनात झिरपते. तनमानावर अमृताचा वर्षांवच जणू! कधीच जाणवलेली नसते इतक्या त्या विश्रांतीची, निवांतपणाची शरीराला – मनाला गरज असते! चराचरात परमेश्वराने सौदर्यं भरलेले आहे. आपल्यालाच रसिकतेने त्याचा आस्वाद घ्यायला इतके दिवस भान नव्हते. हे भान आपल्याला पंचकर्माने येते. या सर्वाबद्दलची कृतज्ञता मनी दाटते. शरीर आणि त्यातील लाखोपेशीं म्हणजे फुलांनी बहरलेला विस्तीर्ण बगीचा, रोगांमुळे, वेदनांमुळे त्या फुलझाडांतील जीवनरस आटलेला. चैतन्याचे झरे शुष्क झालेले. ही तेलं, औषधे शरीरातील पेशीपेशींत जातात. दोषांचा निचरा करतात. नवसंजीवनी देतात. शरीर आतून बरं व्हायला लागते. निसर्गाशी नव्याने जुळलेल्या नाळेमुळे तनामनाला हिरवीगार पालवी फुटते. आशेची कोकीळा जीवनवृक्षावर बसून आनंदाचे गाणे गाऊ लागते! उसळी मारणारे चैतन्याचे झरे दीर्घकाळ आरोग्य प्रदान करत राहतात.
शिरोधारा घेऊन स्वस्थचित्त मनाने हलका योगाभ्यास, ध्यानधारणा करताना एकदम जाणवले की योगाभ्यास, आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा हा तिपेडी गोफ आहे. सामान्य माणसाला निरोगी ठेवण्यासाठी आणि रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी योग आणि आयुर्वेद. तनामनाने निर्मळ होऊन देहाच्या मंदिरात, मनाच्या गाभार्यात बसलेल्या आत्मारामाला शोधायचे. जीवाशिवाचे मिलन व्हायचे. अतिमतः त्या शाश्वत तेजात, ब्रह्मरुपात विलीन व्हायचे!
दिवस फुलपाखरासारखे उडून जातात. पंचकर्म संपते. मायेचे माहेर सोडून आपण कठोर, वास्तव जगात परत जायला निघतो. मुख्य रस्त्याला लागलो की अचानक गर्दीचा कोलाहल, वाहनांचा कर्कश्य आवाज कानांवर आदळतो. ‘बापरे, इतक्या आवाजात, गोंगाटात आपण राहात होतो? ’
© डॉ ऋजुता कुशलकर
कृपया लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
