कॅन्सरच्या निदानासाठी लागण्याऱ्या चाचण्या
डॉ. ऋजुता कुशलकर
कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे आपण मागील लेखांमध्ये पाहिली. परंतु शरीरात कुठे गाठ आढळली किंवा काही लक्षणे दिसली म्हणजे त्या व्यक्तीला कॅन्सर झालाच असे नसते. कॅन्सरचे खात्रीशीर निदान करण्यासाठी डॉक्टर अनेक चाचण्या करतात. त्या चाचण्यांच्या रिपोर्टस् चा साकल्याने विचार करून कॅन्सरचे खात्रीशीर निदान केले जाते.
कॅन्सरचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रमुख चाचण्या खालील प्रमाणे:-
१) रक्ताच्या चाचण्या
२) क्ष किरण तपासणी
३) सोनोग्राफी
४) मॅमोग्राफी
५) पँप स्मियर
६) एन्डोस्कोपी
७) स्कॅन- CT स्कॅन,MRI, PET स्कॅन
८) ट्युमर मार्कर चाचणी
९) बायोप्सी
१) रक्ताच्या चाचण्या– साधा ताप जरी 4-5 दिवस राहिला तरी डॉक्टर रक्त तपासायला सांगतात. रक्ताच्या अगदी साध्या चाचण्यामधूनही अनेक आजारांचे निदान होऊ शकते.
- रक्ताच्या CBC या चाचणी वरून त्या व्यक्तीचे आरोग्य, जंतुसंसर्गाची तीव्रता, अगदी काही प्रकारच्या कॅन्सरचेही निदान होऊ शकते.
- लिव्हर फंक्शन टेस्ट मधील SGOT,SGPT ,alkaline phosphatase इ घटकांच्या प्रमाणावरून यकृताचे कार्य ठीक चालले आहे ना ,शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता, दारूमुळे यकृताचा झालेला ऱ्हास, कॅन्सरचा प्रभाव इ. अनेक गोष्टींचे निदान होते.
- यकृत आणि मूत्रपिंड हे शरीरातील महत्वाचे अवयव. रक्ताच्या किडनी फंक्शन टेस्ट वरून मूत्रपिंडाचे कार्य नीट चालले आहे ना ,आहारातील प्रथिनांची अतिरिक्तता किंवा कमतरता , मूत्रपिंडाचे इतर विकार इ. ची माहिती मिळते.
खूपदा किमोच्या औषधांचा यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात म्हणून कॅन्सरवरचे उपचार चालू असताना या चाचण्या प्रत्येक किमोच्या आधी केल्या जातात. या चाचण्यांचे निष्कर्ष जर ठराविक मर्यादेत नसतील तर किमो पुढे ढकलल्या जातात.
२) क्ष किरण तपासणी अथवा एक्स रे, सोनोग्राफी – ह्या चाचण्या आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. सोनोग्राफी मध्ये उच्च तरंगी ध्वनी लहरी शरीराच्या आरपार जाऊन शरीरातील अवयवांची चित्रे घेतात.

३) मॅमोग्राफी– या चाचणीत क्ष किरणांनी स्तनाची आतील रचना दाखवली जाते.
चाळीशीपार केलेल्या स्त्रियांनी आणि ज्यांच्या कुटुंबात स्तनाच्या कॅन्सरचे रुग्ण आहेत अशा स्त्रियांनी दर वर्षी/ दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी. मॅमोग्राफमुळे प्राथमिक अवस्थेतील स्तनाचा कॅन्सरही कळून येतो
४) पॅप स्मिअर – ही चाचणी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी केली जाते. अतिशय सोप्या, वेदनारहित अशा या चाचणीत गर्भाशयाच्या मुखावरील पेशी घेऊन सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासल्या जातात. या चाचणी द्वारे प्राथमिक अवस्थेतील कॅन्सरचे निदानही होते.
५) एन्डोस्कोपी तोंडाद्वारे / गुद्द्वारा द्वारे – एन्डोस्कोपी द्वारा शरीराच्या आतील अवयवांचे प्रत्यक्ष निरीक्षण करू शकतो. एका बारीक ट्यूबला एका बाजूला कॅमेरा आणि प्रकाशाचा स्रोत असतो. अगदी छोटा छेद घेऊन किंवा तोंडाद्वारे गुद् द्वारा द्वारे ही ट्यूब शरीरात टाकली जाते.
स्वरयंत्र , श्वसन मार्ग, जठर, लहान व मोठे आतडे इ. अवयवांची आतून तपासणी करण्यासाठी एन्डोस्कोपी उपयोगी आहे. पित्ताशयातील खडे काढणे अॅपेंडिक्स काढणे अशा अनेक शस्त्रक्रियाही या टेक्निकने केल्या जातात.
६) स्कॅन – शरीरातील अवयवांचे सूक्ष्मपणे अवलोकन करण्यासाठी सिटी स्कॅन ,एम्आरआय आणि पेट स्कॅन या अतिप्रगत स्कॅनचा वापर केला जातो.
- सिटी स्कॅन ( computed tomography स्कॅन) – यात एकाच वेळी अनेक क्ष किरणे शरीरातून आरपार पाठवतात. संगणक या क्ष किरणांनी वेगवेगळ्या कोनातून घेतलेल्या प्रतिमांचे एकत्रीकरण करतो. शरीरातील पातळ छेदांच्या (काल्पनिक) त्रिमितीतील प्रतिमा कॉम्पुटर मध्ये तयार केल्या जातात. त्यामुळे शरीरातील अवयवात झालेले छोटे छोटे बदलही दिसतात.
- एमआरआय (MRI) – मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग :
या प्रकारात क्ष किरणे न वापरता अतिशय तीव्र चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ व्हेवज् वापरले जातात.
क्ष किरणांचा जास्त वापर हानिकारक असतो. त्या दृष्टीने एम्आऱआय स्कॅन सुरक्षित असतात. या मशीनचा आवाज आणि त्यात रुग्णाला खूप वेळ रहावे लागते. या दोन मोठ्या त्रुटी यात आहेत.
क) पेट स्कॅन – Positron Emission Tomography
सर्व प्रकारच्या स्कॅन मध्ये पेट स्कॅन अतिशय संवेदनशील आणि अचूक स्कॅन आहे. शरीरात कुठेही लपून बसलेल्या कॅन्सरच्या पेशी यात दिसतात. सिटी स्कॅन आणि पेट स्कॅनचा एकत्रित उपयोग करून शरीराच्या त्रिमितीतील (3D)प्रतिमा मिळवल्या जातात.
पेट स्कॅन करताना किरणोत्सर्गी ग्लुकोज वापरले जाते. आपल्या शरीरातील सर्व पेशी ग्लुकोज हा ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरतात. कॅन्सर पेशींची वाढ झपाट्याने होत असल्याने त्या त्याच प्रकारच्या पेशीपेक्षा जास्त प्रमाणात ग्लुकोज वापरतात. उदा: यकृताचा कॅन्सर असेल तर यकृतामधील कॅन्सरच्या पेशी सर्व सामान्य यकृताच्या पेशीपेक्षा ग्लुकोजचा वापर जास्त करतात. हा वापर किती जास्त आहे त्यावरून कॅन्सरची तीव्रता कळते
७) बायोप्सी
शरीरातील व्याधीग्रस्त भागाचा एखादा छोटा तुकडा काढून त्याचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करणे म्हणजे बायोप्सी. अचूक निदान करण्यात बा योप्सी मुळे शक्य होते
८) ट्युमर मार्कर टेस्ट
कॅन्सरमुळे शरीरात अनेक बदल घडतात.शरीरातील काही स्त्राव, एन्झाइम्स ,प्रोटिन्स इ. चे प्रमाण बदलते. या बदललेल्या प्रमाणावरून कॅन्सरची तीव्रता कळण्यात मदत होते. खूपदा हे घटक ठराविक कॅन्सरशी निगडित असतात. उदा: CA 125 चे प्रमाण गर्भाशयाच्या /बीजांडाच्या कॅन्सरमध्ये वाढलेले आढळते.
- CA 125 – कॅन्सर अँटीजेन 125
सामान्य प्रमाण-0-35u/ml
बिजग्रंथीचा ,गर्भाशयाचा - अल्फा फिटोप्रोटिन
यकृत जर्म सेल चा कॅन्सर - बीटा-2– मायक्रो ग्लोब्युलीन (B 2 M)
रक्त , मूत्र,किंवा मणक्यातील द्राव काढून याचे प्रमाण तपासले जाते.
मल्टिपल मायेलोमा काही प्रकारचे रक्ताचे कॅन्सर यात प्रमाण वाढते. - बीटा ह्यूमन कोरिओनिक गोनॅडोट्रोपिन (beta-HCG)
मूत्र किंवा रक्तातील प्रमाण वाढते.कोरिओ कार्सिनोमा जर्म सेल ट्युमर मध्ये प्रमाण वाढते. - CA 15.3
रक्तात वाढलेली पातळी स्तनाच्या कॅन्सरची निर्देशेक आहे. - CA 19.9
स्वादुपिंडाचा पित्ताशयाचा पोटाचा कॅन्सर मध्ये रक्तातील पातळी वाढते.
कॅन्सरचे पक्के निदान करण्यासाठी डॉक्टर एक अथवा अनेक चाचण्या करण्यास सांगतात. रुग्णाची लक्षणे, होणार त्रास यावर कुठल्या कुठल्या चाचण्या करायच्या हे ठरते. कधी कधी कॅन्सरचे निदान शंकास्पद असते तेव्हा खूपच चाचण्या कराव्या लागतात.पण कॅन्सरच्या प्रकाराचे अचूक निदान होणे गरजेचे असते. त्यावर पुढचे उपचार, किमोथेरपीसाठी कुठली औषधे वापरायची ,रेडिएशनची किती मात्रा द्यायची,शस्त्रक्रिया कशी करायची हे अवलंबून असते. या चाचण्यांना कधी कधी खूप वेळ लागतो.या दरम्यान रुग्ण आणि कुटुंबीय ‘उपचारांना विलंब होत आहे’ या शंकेने कासावीस होतात. परंतु हे गरजेचे असते.
एकदा कॅन्सरचे निदान पक्के झाले की त्यावरच्या उपचारांची दिशा ठरते. हे उपचार कुठले, त्यांचे साईड इफेक्टस आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची हे आपण पुढच्या लेखामधे पाहू.
©डॉ. ऋजुता कुशलकर
कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
