“ मी काय खाऊ ? ”

डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

कॅन्सर पेशंटला काय खायला द्यायचे, असा यक्षप्रश्न घरच्यांना पडतो. किमोथेरपीमुळे रुग्णाच्या तोंडाची चव गेलेली असते. तोंडाला कोरडेपणा आलेला असतो. मळमळणे, अन्नावरची वासना जाणे, इ. मुळे तो संत्रस्त झालेला असतो. अशा वेळी औषधोपचारांच्या काळात रुग्णाच्या पथ्यपाण्याचा विचार करून तयार करता येऊ शकणारे काही पदार्थ….

 आपण साध्या सर्दी-तापाने आजारी पडतो तरी ‘आजारात काय खावं?’ या प्रश्नाने हैराण होतो. कॅन्सरच्या पेशंटला तर काय खायला द्यायचे, असा यक्षप्रश्न घरच्यांना पडतो. किमोथेरपीमुळे रुग्णाच्या तोंडाची चव जाते. तोंडाला कोरडेपणा येतो. मळमळणे, अन्नावरची वासना जाणे, इ. मुळे तो संत्रस्त झालेला असतो. कॅन्सरच्या दिव्यातून जात असताना माझ्या स्वभावानुसार यातही थोडे संशोधन केले. आई व वहिनीनेही डोके लढवून अनेक नव्या पाककृतींना जन्म दिला. रुग्णानेही या काळात आहाराशी जुळवून घ्यायला हवे. बरे झाल्यानंतरही जितका काळ पाळता येईल तितका काळ सात्त्विक आहाराची कास धरावी. या अन्नामुळे आपल्याला शक्ती आणि रोगाशी झुंजायला ताकद मिळणार आहे, याचे भान सतत ठेवावे.

कॅन्सर हा असा आजार आहे की ज्यात डॉक्टर हाय प्रोटिन्स डाएट घ्या, भरपूर लोणी, अंडी, पनीर, चिकन, मटण खा, असे सांगतात. पण पेशंट बिचारा ते खाऊ आणि पचवू शकत नाही. पण तरीही जमेल तितका समतोल आहार घ्यावा.

  • आजारी माणसाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कॅन्सरच्या पेशंटची तर किमोथेरपीमुळे जवळजवळ रसातळालाच गेलेली असते. अशावेळी बाहेरून काही जंतुसंसर्ग होणार नाही, याची फार काळजी घ्यावी लागते. म्हणजे मग जंतुसंसर्गामुळे दुसरी औषधे घेणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, इ. कटकटी वाचतात. म्हणून कमीत कमी संसर्ग होईल, याची स्वतः रुग्णाने आणि घरातील मंडळींनी काळजी घ्यावी.
  • रुग्णाने नेहमी ताजे, घरी बनवलेले अन्नच खावे. शिळेपाके, फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेले किंवा कुठल्याही टपरीवरचे पदार्थ खाऊ नयेत. उपचारांसाठी खूप लांबून येणार्या पेशंटचा मात्र आहाराच्या बाबतीत नाइलाज असतो. त्यांनी जमल्यास आपल्याबरोबर घरी बनवलेली चपाती-भाजी, शिरा, लाडू असे पदार्थ सोबत ठेवावेत. अगदी बाहेर खायची वेळ आलीच तर डोसा, इडली-सांबार असे ताजे बनविले जाणारे पदार्थच खावेत. भजी, वडे असले तेलकट पदार्थ त्यासाठी वापरात येणार्या तेलाची खात्री नसल्यामुळे खाऊ नयेत.
  • भूक लागली असता फळे खाणे हा एक चांगला पर्याय आहे. फळे घेताना फार पिकलेली, काळी पडलेली, बाहेरून बुरशी आलेली, तडा गेलेली फळे घेऊ नयेत. फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. जाडसर साल काढून खावीत. केळे खाताना वरचा आणि खालचा थोडा थोडा भाग काढून टाकावा.
  • भाज्या, तांदूळ, डाळी इ. गोष्टी फिल्टरच्या पाण्याने एकदा तरी धुऊन घ्याव्यात. स्वच्छ भांड्यात जेवण बनवावे. जेवण बनवताना फिल्टरचे पाणी वापरावे. बऱ्याचदा जेवण शिजवताना आपण वरून पाणी टाकतो, ते पाणी पुरेसे उकळले जात नाही. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दूषित होते तेव्हा ही खबरदारी जरूर घ्यावी.
  • ताज्या, रसदार भाज्या वापराव्यात. भाज्यांचा पिवळा पडलेला, पाण्यामुळे कुजलेला, कीड लागलेला भाग अजिबात घेऊ नये. भाज्या कापायच्या आधी दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. भाज्या कापायची उपकरणे म्हणजे विळी, सुरी, ट्रे, ताट इ. स्वच्छ धुऊन वापरावीत.
  • कोथिंबिरीच्या गड्डया मार्केटमध्ये कुठेही पडलेल्या असतात. ती वरून फ्रेश दिसली तरी आपल्या डोळ्यांना न दिसणारे अनेक जंतू घाणीतून तिला चिकटलेले असतात. म्हणून कोंथिबीर स्वच्छ पाण्यात तीन-चार वेळा धुऊन मगच कापावी. कोथिंबीर वरून पदार्थांवर टाकल्यास ती पाच मिनिटे चांगली शिजवावी.
  • चिकन, मटण नेहमीच्या खात्रीच्या दुकानातूनच आणावे. ते ताजे आहे, याची खात्री असल्यासच पेशंटला द्यावे.
  • मासेही ताजे, स्वच्छ आहेत ना, हे पाहून घ्यावेत. कवचातील मासे-उदा. कोलंबी, शिंपले, खेकडे, कालवे शक्यतो खाऊ नयेत. त्यांनी पोट बिघडते, असा माझा अनुभव आहे.
  • तांदूळ वर्षभर टिकावे म्हणून आपण त्यांना बोरीक पावडर, एरंडेल तेल लावतो. बोरीक पावडर लावलेले तांदूळ तीन-चार वेळा चांगले धुवावेत. एरंडेल तेल लावलेल्या तांदळाचा वास पेशंटला सहन होतो का, हे पाहून मगच ते रुग्णांना द्यावे. (किमोथेरपीमुळे वासाची संवेदना फार तीव्र होते.)
  • रुग्णाच्या संपूर्ण दिवसातील आहाराचे व्यवस्थित नियोजन करावे. एकच पदार्थ नेहमी-नेहमी खाऊन कंटाळा येतो. पूर्ण दिवसभरात पोटात पालेभाजी, फळभाजी, सूप, डाळी, मासे-मटण (थोड्या थोड्या प्रमाणात) जाईल, याची काळजी घ्यावी. पेशंटनेही एका वेळी खूप खाण्यापेक्षा दिवसातून पाच-सहा वेळा थोडे थोडे खावे.
  • किमोथेरपीमुळे आपल्या शरीरातील fast growing cancer cells (जलद वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशी) जशा मरतात तशाच इतर चांगल्या पेशीही मरतात. उदा. केस, तोंड ते गुदद्वार यांचे अस्तर, जीभ इ. त्यामुळे लाल व हिरवी मिरची, गरम मसाले रुग्ण अजिबातच खाऊ शकत नाही. परंतु या पदार्थांचे भारतीय जेवणात अद्वितीय स्थान आहे. मसाल्याशिवाय कसे जेवायचे, असा प्रश्न बर्याच पेशंटसना पडतो. काही रुग्ण दडपून ‘आम्ही नेहमीचेच जेवण जेवतो!’ अशी शेखी मिरवतात. पण जरा जास्त खोदून विचारल्यावर कळते की, त्यांना ‘अगदी थोडेसेच जेवण जाते/ किंवा खाल्लेले उलटून पडते/खायची इच्छा होत नाही’, असे ते सांगतात. तिखटामुळे आपल्याला जेवण जात नाही, हे त्यांना कळत नाही.
  • तिखट नाही तर मग काय बनवावे? असा प्रश्न घरच्या अन्नपूर्णेला पडतो. भाज्या आणि अन्य पदार्थांना स्वतःची अशी एक चव असते. आपण मसाले घालून ती चव मारून टाकतो. खरं तर लाल-हिरव्या मिरची शिवाय ही दुसऱ्या मसाल्याच्या पदार्थांनी स्वयंपाक रुचकर होऊ शकतो. तसे आपल्याला पथ्याचेही दोन-चार पदार्थ माहीत असतात. पण कॅन्सर म्हणजे उपचार आणि प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी लागणारा कालावधी धरून दहा-बारा महिन्यांची निश्चिती असते. इतका प्रदीर्घ काळ रुग्णाला काय खायला द्यावे, हा प्रश्न सतावतोच. तेव्हा रोजच्याच जेवणातले पदार्थ थोडे पेशंटला खाण्याजोगे बनविण्याचा हा प्रयत्न-

काही वेगळे मसाले :

  1. धणे-जिरे पावडरः धणे-जिरे (एक वाटी:पाव वाटी) या प्रमाणात घेऊन मंदाग्नीवर थोडेसे सुकेच भाजून घ्यावे. मग त्याची बारीक पूड करून ती हवाबंद बाटलीत भरून ठेवावी.
  2. धणे-जिरे-बडीशेप पावडर (एक वाटी, पाव वाटी, पाव वाटी) तयार करून ठेवावी.
  3. जिरे-खसखस पावडरीत खसखस चांगली भाजून घ्यावी.
  4. तिळकूट करताना पॉलिश न केलेले तीळ मंदाग्नीवर चांगले भाजून घ्यावेत आणि त्याचे कूट करून ठेवावे.
  5. डाळकूट तयार करताना चण्याचे डाळे हलके हलके भाजून कूट बनवावे.
  6. शेंगदाणे कूट जरा जपूनच वापरावे.
  7. तसेच गरम मसाल्यात वापरले जाणारे वेलची, जायपत्री, मायपत्री, दगडफुल हे पदार्थ तिखट नसतात. पण ते सुंदर सुवास देतात. तेही आपण पदार्थात वापरू शकतो.
    धणे (२ वाटी) + जिरे (१ वाटी) + खसखस (पाव वाटी) + वेलची (७-८) + जायपत्री + मायपत्री + दगडफूल + तमालपत्र (३-४) – मंदाग्नीवर थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्यावे. बारीत पूड करून हवाबंद डब्यात ठेवावे.
  8. उडीद डाळ-चणा डाळीचा फोडणीत वापर करावा. आपण महाराष्ट्रीय जेवणात कडीपत्त्याचा नाममात्र वापर करतो. पण कडीपत्ता जरा बरीक चिरून फोडणीत भरपूर प्रमाणात टाकला तर जेवणाला वेगळीच चव येते.
  9. ओवा चिमूटभरच वापरावा.
  10. सांबार पावडर – चणाडाळ-पाव वाटी, उडीद डाळ -अर्धी वाटी, मूगडाळ- पाव वाटी,
    धणे- एक वाटी, जिरे- अर्धी वाटी, मेथी- १ चमचा, राई- १ चमचा, हिंग-१ छोटा चमचा, कडीपत्ता-अर्धी वाटी
    मंदाग्नीवर थोड्या तेलात वेगवेगळे भाजून घ्यावे. थंड झाल्यावर बारीक पूड करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

काय खावे?  काय टाळावे? 

  • शक्यतो वरण, आमटी बनविण्यासाठी पचायला हलक्या असणाऱ्या मुगडाळ, मसूरडाळ वापराव्या. पित्तकारक तुरडाळ आठ-पंधरा दिवसांनी वापरावी.
  • कडधान्यांमध्ये मूग-मसूर शक्यतो वापरावेत. काबुली चणे, साधे चणे, मटकी, राजमा, वाल, वाटाणे, काळे वाटाणे यांच्या उसळी शक्यतो खाऊ नयेत. त्याने गॅसेस फार होतात. ही कडधान्ये उकडून ते पाणी सूप म्हणून प्यावे.
  • चणाडाळ पीठ अथवा बेसन वापरू नये. गॅसेस होतात. त्याऐवजी मूगडाळीचे पीठ वडे, वड्या, भजी करण्यासाठी, भाजीत टाकण्यासाठी वापरावे. चवीत अजिबात फरक पडत नाही.
  • इडली-डोसे करण्यासाठी उडीद डाळीचा वापर कमी करावा. त्याऐवजी हिरव्या सालाची मुगडाळ/पिवळी मुगडाळ किंवा मसूरडाळ वापरावी. उकडा तांदळाच्या ऐवजी जाडे तांदुळ वापरावेत. या गोष्टींमुळे इडली पचायला हलकी होते. एसिडिटी, गॅसेस होत नाहीत. इडलीचे पीठ फ्रिजमध्ये ठेवून खूप आंबवून खाऊ नये.
    इडलीः जाडे तांदुळ (२ वाट्या) + उडीद डाळ (१ मूठ) + मुगडाळ/मसूरडाळ (१ वाटी)

दिवसभराचा आहार :

  • सकाळी उठल्यावर दूध किंवा चहा-कॉफी (फार स्ट्रॉंग नाही).
  • रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात दोन-तीन बदाम, ५-६ काळ्या मनुका व १अंजीर भिजवून ठेवावेत. सकाळी कोमट दुधात त्याचा मिल्कशेक तयार करावा. मिल्कशेक आवडत नसल्यास नुसतेच चावून खावे.
  • नऊ वाजता (नाश्ता)- लापशी खीर, चपाती, पालक-मेथी पराठा, शिरा, पोहे, उमपा, इडली, डोसा+एक अंडे/चीझ.
  • अकरा वाजता – फळे/भाज्यांचे सूप.
  • दुपारी बारा-साडेबारा वाजता (जेवण)- चपाती, भाजी (एक दिवसाआड सकाळी पालेभाजी करावी, त्याने पोट साफ राहते), वरण (एक-दोन वाटी), भात, उकडलेले बीट-गाजर, आवडत असल्यास मासे/मटण/चिकन/पनीर (घरी बनवलेले)
  • चार वाजता – दूध, लाइट चहा-कॉफी.
  • संध्याकाळी पाच-सहा वाजता – ओट/दुधी/गाजर/लापशी/तांदूळ खीर, ढोकळा (मुगडाळ किंवा तांदळाचा), वेलची केळी-दूध-गाजर हलवा, डोसा, कोथिंबीर/ दुधी/ कोबी वड्या /कटलेट, किंवा सुका खाऊ.
  • आठ-साडेआठ वाजता – चपाती, तांदूळ/नाचणी/ज्वारी मिक्स भाकरी, वरण, भाजी, उकडलेले बीट-गाजर.
  • रात्री दहा वाजता – 1कप गरम पाणी +1 चमचा साजूक तूप.

रुग्णासाठी पाककृतीः

  1. पालक वा मेथी पराठा – पालक व मेथी थोडी वाफवून घ्यावी.
  2. भोपळा पराठा – भोपळा किसून, वाफवून घ्यावा.
  3. कोहळा/दुधी पचडी.
  4. दुधी/गाजराची खीर
  5. ओट, रवा/तांदळाची भरड पेज/खीर.
  6. भाज्या – मेथी, पालक, चवळी, लाल माठ, हिरवा माठ, दुधी, भोपळा, शिराळा, पडवळ, फरसबी, कोबी, फ्लॉवर, घेवड्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, कच्ची भाजीची केळी, भेंडी, सुरण, कांद्याची पात, मशरूम.
  7. मेथी-मटार मलई, पालक पनीर, व्हेज कुर्मा, पनीर, मिक्स भाजी.
  8. अळूवडी, कोथिंबीर वडी, कोबीच्या वड्या, दुधीच्या वड्या.
  9. गोड पदार्थ – केशरी भात, शिरा, भोपळ्याचे वडे, रवळी, केक, श्रीखंड, तांदळाची खीर, वेलची केळ्याचा हलवा, लापशी, खीर, गुलाबजामून.
  10. मूग, मसूर उसळ,आमटी
  11. मूगडाळ, मसूरडाळ, क्वचित तूरडाळ, सांबार.
  12. पुदिना चटणी, डाळे चटणी, कैरी चटणी, कडीपत्ता चटणी.
  13.  पुलाव, बिर्याणी (पुदिना), मटण-चिकन रस्सा, सुके मटण, तळलेले चकन,
  14. चिकन सूप, मटण सूप, कलेजी सूप, पाया सूप ,स्वीट कॉर्न सूप, गाजर-टॉमटो-कोबी सूप, व्हेज सूप १६) कॉर्न-व्हेजिटेबल बर्गर, केळी-पालक कटलेट, बटाटेवडा, पावभाजी.
  15. इडली– मूगडाळ इडली, रवा इडली, डोसा– रवा डोसा, मूगडाळ (हिरवी-पिवळी)डोसा, अडाई डोसा
    ढोकळा — मूगडाळ ढोकळा, तांदूळ ढोकळा
  16. पनीर– पनीर पालक, मटार पनीर, मिक्स व्हेज पनीर, मशरूम पनीर, बेबी कॉर्न पनीर.
  17. अंडी– कांदा-टोमॅटो आम्लेट, भूर्जी, अंडा-करी.
  18. बेक्ड डिशेस् — केक, पिझ्झा, मिक्स व्हेज चीज.
  19. मासे– कालवण (नारळ-कोथिंबीर-टोमॅटो), उडीद-मेथी-नारळ-धणे. कालवण(नारळ-धणे भाजून). तळलेले मासे– बोंबील, पापलेट, रावस, घोळ, पाला, सुरमई, बांगडा, बोय, दाताळ.
  20. सुका खाऊ — पोहे चिवडा, मक्याचा चिवडा, कुरमुरे चिवडा, खाऱ्या पुऱ्या.
  21. लाडू– मूगडाळ, रवा, नाचणी, तांदूळ, मिक्स पिठाचे

काही पाककृती

अ) खीर वा पेज-

पेशंटला गोड चव आवडते की खारट-त्याप्रमाणे शिजवताना दूध, साखर किंवा पाणी, मीठ हे घालावे.

१) ओट – रवा –

ओटमध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे पोट साफ राहते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल, शुगरवर नियंत्रणही राहते. त्यात खांडवा किंवा लापशीचा रवा घातल्याने खीर पौष्टिक बनते. अर्धा किलो लापशीचा रवा आणून निवडून, कोरडा खमंग भाजून ठेवावा.
कृतीः दोन मोठे चमचे लापशीचा भाजलेला रवा पाणी घालून पूर्ण शिजवून घ्यावा. अर्धा चमचा साजूक तुप घालावे. नंतर त्यात तीन चमचे ओट घालावे. ओट तीन-चार मिनिटांतच शिजते. ओट शिजल्यावर आवडीप्रमाणे दूध, साखर घालावी किंवा थोडे पाणी घालून चवीला मीठ घालावे.

२) तांदळाच्या भरडाची पेज

अ‍ॅसिडिटीवर, खूप उन्हाळ्यात किंवा अंगात उष्णता वाढते तेव्हा शरीर थंड करायलाही तांदळाची पेज फार उपयुक्त असते. ही पेज बनवून दिवसभर थोडी थोडी प्यायल्यास खूप बरे वाटते.

कृतीः दोन पेले किंवा अर्धा किलो तांदूळ धुऊन खडखडीत वाळवावेत. नंतर ते मंदाग्नीवर थेाडे भाजावेत. मिक्सरमधून जाडसर वाटून हवाबंद बरणीत ठेवावेत. पंधरा दिवस भरड टिकते.
दोन चमचे भरड पाव लीटर पाण्यात घालून शिजवावे. अर्धा चमचा साजूक तुप घालावे. शिजल्यावर पाव लीटर पाण्याला एक कप दूध आणि आवडीप्रमाणे साखर घालून चांगले उकळवावे. गोड चव आवडत नसल्यास शिजवलेल्या पेजेत चवीपुरते मीठ घालावे आणि दोन काळीमिरी घालून चांगले उकळवावे.

३) दुधी/गाजर खीर/ हलवा –

कृतीः एक वाटी दुधी/ गाजराचा कीस कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावा. नंतर त्यात दूध-साखर घालून चांगले उकळावावे. बदाम-काजू कापून टाकावे. थोड्या दुधात दुधाची पावडर (चार चमचे) मिक्स करून मग खीर/हलव्यात घालावे. खाली उतरवताना वेलची पूड चिमूटभर टाकावी.

४) लापशी खीर –

कृतीः अर्धा वाटी लापशीचा रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. थोडे पाणी घालून कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या घ्याव्यात. नंतर बाहेर काढून दोन वाट्या दूध घालून चांगले उकळवावे. चवीनुसार साखर घालावी. चिमूटभर वेलची किंवा जायफळाची पूड घालावी.

५) तांदळाची खीर –

कृतीः अर्धा वाटी बासमती तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. पातेल्यात थोडे साजूक तूप टाकून दोन लवंगा टाकाव्यात व नंतर त्यात तांदूळ टाकून ते थोडे परतून घ्यावते. पाणी टाकून तांदूळ चांगले शिजवावेत. तांदूळ शिजल्यावर एक वाटी नारळाचे दूध टाकावे. चवीनुसार गूळ टाकावा. काजूचे काप, मनुका, जायफळाची पूड वरून टाकावी.

ब) पराठे (पालक/मेथी/भोपळा) :

साहित्य- एक मध्यम जुडी पालक/मेथी/ १०० ग्रॅम भोपळा.

कृतीः पालक/मेथीची पाने घ्यावीत. स्वच्छ धुऊन, कापून, कुकरला थोडी वाफवून घ्यावीत. शिटी घेऊ नये. भोपळा पराठा बनवायला भोपळा किसून कुकरमध्ये वाफवून घ्यावा. त्यात एक चमचा तेल, धणे-जिरे पावडर (चार चमचे), दोन चिमूट ओवा आणि चार चमचे दही घालावे. चवीपुरते मीठ घालावे. दोन-तीन वाट्या (मध्यम) गव्हाचे पीठ घालावे. पाव वाटी मुगडाळीचे पीठ घालावे. कणीक मळून चपातीपेक्षा किंचित जाडसर पराठे लाटून घ्यावेत. भाजताना खूप तेल/ तूप टाकून भाजू नयेत. तव्यावर चपातीप्रमाणे सुकेच, पण जरा जास्त भाजावेत. खाली उतरल्यावर पराठ्याला तूप लावावे.

क) भाकऱ्या :

मिक्स पीठाच्या भाकऱ्या  पचायला हलक्या असतात. तसेच त्या तोंडालाही रुची आणतात. नाचणी (एक किलो) +ज्वारी (अर्धा किलो)+बाजरी(अर्धा किलो)+गहू (पाव किलो)+तांदूळ (पाव किलो)+मुगडाळ (पाव किलो)+कुळीथ (१०० ग्रॅम)+मेथी (२५ ग्रॅम) ही सर्व धान्ये एकत्र मिश्रण करून बारीक दळून आणावीत.

भाकरी करताना वाटीभर उकळत्या पाण्यात किंचित मीठ, एक चमचा तेल घालून वाटीभर पीठ घालावे. गॅस बंद करून पातेले झाकून ठेवावे. दहा मिनिटांनी पीठ चांगले मळून पोळपाट लाटण्याच्या साहाय्याने जाडसर भाकर्या लाटाव्यात. नॉन-स्टीक तव्यावर त्या खरपूस भाजाव्यात. भाकऱ्याना खाली उतरून तूप लावावे. आणि गरमा गरम खायला द्याव्यात.

ड) थाली पिठाची भाजणीः

ज्वारी (अर्धा किलो)+नाचणी (पाव किलो)+तांदूळ (एक किलो)+मुगडाळ (अर्धा किलो)+उडीद डाळ (पाव किलो)+मसूरडाळ (पाव किलो)+धणे १०० ग्रॅम+जिरे ५० ग्रॅम. सर्व घटक मंदाग्नीवर वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. थंड झाल्यावर पिठाच्या गिरणीतून/घरघंटीवर दळून आणावे. हवाबंद डब्यात भरून ठेवावे. तीन-चार महिने ही भाजणी टिकते.

इ) भात –

भाताचे विविध प्रकार करताना मसाले, तिखटाचा वापर कमीत कमी करायचा असल्याने कांदा, पातीचा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरावी. त्यामुळे पदार्थ रुचकर होतात आणि मसाल्याची उणीव भासत नाही.

१) फोडणीचा भात –

नेहमी हा प्रकार शिळ्या भाताचा केला जात असला तरी पेशंटला देताना यासाठी ताजा भात वापरावा.
साहित्य – एक बारीक चिरलेला कांदा, अर्धे बारीक कापलेले टोमॅटो, कडीपत्ता, कोथिंबीर, दीड वाटी भात. फोडणीसाठी-राई, उडीद डाळ, चणाडाळ, जिरे, हिंग.
कृतीः कढईत एक चमचा तेल घेऊन त्यात राई, उडीद डाळ (एक चमचा), चणाडाळ (एक चमचा) टाकून तपकिरी रंगावर खरपूस परतावी. नंतर त्यात एक चमचा जिरे, हिंग, कडीपत्ता घालावा. एक बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. अर्धे बारीक चिरलेले टोमॅटो घालून एक वाफ आणावी. थोडी हळद घालून दीड वाटी शिजलेला भात टाकावा. भरपूर कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. वरून एक चमचा साजूक तूप घालून एक वाफ आणावी.

२) पुलाव –

साहित्यः तांदूळ (एक मध्यम वाटी), दोन कांदे, अर्धा वाटी मटार, अर्धी वाटी गाजर व फरसबीचे लांबट तुकडे, दोन पातीचे कांदे, कडीपत्ता, कोथिंबीर, काळीमिरी, दालचिनीचा छोटा तुकडा, दोन लसूण पाकळ्या, धणे-जिरे पावडर.
कृतीः भाजीच्या छोट्या कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात राई, जिरे, हिंग, कडीपत्ता टाकावा. पेशटंला चालत असल्यास काळीमिरी, दालचिनी, लसूण पाकळ्या टाकाव्यात. नंतर कांदा टाकून चांगले परतावे. त्यात पातीचा कांदा, मटार, गाजर, फरसबी, कोथिंबीर टाकून परतून घ्यावे. अर्धा चमचा हळद, तीन चमचे धणे-जिरे पावडर टाकावी. तांदूळ टाकून सगळ्याचे व्यवस्थित मिश्रण करावे. सव्वादोन वाट्या पाणी घालावे. चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप वरून टाकावे. कुकर बंद करून तीन शिट्ट्या घाव्यात. सर्व पुलाव नीट मिक्स करून गरम गरम वाढावा.

३) बिर्याणी –

साहित्यः मटण बिर्याणी करायची असल्यास पाव किलो शक्यतो बोनलेस मटण थोडे मीठ,हळद,तेल टाकून आधी शिजवून घ्यावे.
चिकन बिर्याणी करायची असल्यास पाव किलो बोनलेस चिकन हळद, मीठ, लिंबू, थोडे तेल लावून अर्धा तास ठेवावे.
बासमती तांदूळ (दोन वाट्या), दोन कांदे, तीन पातीचे कांदे, एक तमालपत्र, जायपत्री, मायपत्री, दगडफुल, एक वेलची, पुदिना तीन मोठे चमचे.
पर्यायी – काळीमिरी ३, दालचिनी एक इंच तुकडा, एक लवंग, एक चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा आलं पेस्ट.
कृती – भाजीच्या छोट्या कुकरमध्ये तीन चमचे तेल टाकावे. त्यात चालत असल्यास तमालपत्र, काळीमिरी, दालचिनी, लवंग, लसूण आले पेस्ट टाकावी. बारीक चिरलेला कांदा टाकून चांगले परतावे. त्यात चिकन/मटण टाकून एक वाफ घ्यावी. नंतर जायपत्री, मायपत्री, दगडफुल, वेलची टाकावी. धुतलेले तांदूळ मिक्स करावे. चवीपुरते मीठ, पुदिना, दोन मोठे चमचे साजूक तूप घालावे. पाच वाट्या पाणी घालून कुकर बंद करावा. तीन शिट्या घ्याव्यात.

ई) वरण –

पचायला हलकी असल्याने शक्यतो मूगडाळ, मसूरडाळ वापरावी.

१) मूग डाळीचे वरण –
साहित्यः एक छोटी वाटी मूगडाळ/तूरडाळ, अर्धे टोमॅटो, कडीपत्ता.
कृतीः मूगडाळ/तूरडाळ धुऊन फिल्टरच्या पाण्यात अर्धा एक तास भिजत ठेवावी. नंतर त्यात कडीपत्ता व टोमॅटो बारीक चिरून टाकावेत. कुकरमध्ये तीन-चार शिट्या देऊन चांगले शिजवून घ्यावे. फोडणी देताना तेल गरम करून राई-जिरे हिंगाची फोडणी द्यावी. त्यावर शिजलेली डाळ टाकावी. चवीनुसार मीठ टाकून एक उकळी आणावी.

२) मसूर डाळीचे वरण –
साहित्यः एक छोटी वाटी मसूरडाळ, एक छोटा कांदा-उभा कापलेला, अर्धे टोमॅटो, कडीपत्ता, मेथी, किंचितसं आलं, दोन-तीन पाकळ्या लसूण.
कृतीः मसूरडाळ धुऊन स्वच्छ पाण्यात अर्धा एक तास भिजवून ठेवावी. भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात राई, मेथी तडतडल्यावर बारीक चिरलेले आले-लसूण टाकावे. उभा कापलेला कांदा, कडीपत्ता, टोमॅटो, थोडी हळद टाकून परतावे. त्यावर भिजवलेली डाळ टाकावी. वरून दोन वाटया फिल्टरचं पाणी, मीठ टाकून तीन शिट्या घ्याव्यात.

३) सांबार- प्रकार १ –
साहित्यः मूगडाळ/तूरडाळ एक छोटी वाटी, एक टोमॅटो, एक कांदा उभा चिरलेला, कडीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, दुधी, भोपळ्याच्या फोडी एक वाटी, सांबार पावडर, चिंच.
कृतीः मूगडाळ, शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळ्याच्या फोडी वेगवेगळ्या शिजवून घ्याव्यात. एका पातेल्यात थोडे तेल घालून राई, मेथी, हिंग, कडीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यात उभा चिरलेला कांदा घालून शिजवावा. नंतर शिजवलेली मूगडाळ, दुधी भोपळ्याच्या फोडी, टोमॅटो, मीठ, दोन चमचे सांबार मसाला घालून उकळवावे. टोमॅटो शिजल्यावर शेवग्याच्या शेंगा व चिंचेचा कोळ घालून एक उकळी आणावी. आवडत असल्यास उडप्याच्या हॉटेलातल्याप्रमाणे थोडेसे गूळ घालावे.

४) सांबार-प्रकार
साहित्यः मूगडाळ/तूरडाळ एक छोटी वाटी, लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी एक वाटी, धणे दोन मोठे चमचे, मेथी पाव चमचा, ओले खोबरे दोन चमचे.
कृतीः एका कढईत थोडे तेल घालून त्यात मेथी, धणे खमंग भाजून घ्यावे. त्यावर ओले खोबरे, कडीपत्ता (ओले खोबरे आणि कडीपत्ता) टाकून थोडे परतून घ्यावे. मिक्सरमध्ये पाणी घालून बारीेक वाटून घ्यावे. एका पातेल्यात थोडे तेल घेऊन त्यात थोडी राई, मेथी, हिंग, कडीपत्याची फोडणी द्यावी. भोपळ्याच्या फोडी वरून घालून त्या शिजवून घ्याव्यात. भोपळा शिजल्यावर त्यात वरील वाटण, शिजवलेली डाळ, मीठ, हळद घालून एक उकळी आणावी. थोडा चिंचेचा कोळ घालून परत चांगले उकळवावे.

Bon Appetit!!

उदरभरण नोहे, जाणीजे यज्ञकर्म |

©डॉ. ऋजुता कुशलकर

drrujutak@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – चतुरंग, लोकसत्ता २२ नोव्हेंबर २००८

कृपया लेखिकेच्या नावासहित लेख शेअर करावा.

या आणि अशा इतर पाककृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी माझे युट्यूब चॅनेल पाहावे.  Rujuta’s Health Palette

कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.