आमच्या बद्दल …
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujuta@gmail.com
Life is what happens to you when you are busy planning other things.
माझ्या आणि माझ्या यजमानांच्या – डॉ. कमलेश यांच्या जीवनाची ही टॅग लाइन म्हणता येइल. देवाने एका हाताने काही गोष्टी भरभरून दिल्या पण दुसऱ्या हाताने काही गोष्टी काढूनही घेतल्या. हसावे की रडावे हेच कळेना. २००० साली आम्ही कमलेशच्या नोकरी निमित्त मुंबईहून बंगळुरूला गेलो. २००२ मधे खूप प्रतिक्षा केल्यावर एक गोंडस बाळ आयुष्यात आलं. मन अगदी निवांत झालं. सुखाचा पेला असा शिगोशिग भरलेला असताना सगळाच डाव उधळला.
२००६ मधे मला एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरचे निदान झाले. थायमोमा, तिसरी स्टेज. ह्रदयातून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांना कवटाळून, ह्रदयाला चिकटून ६cm x ७cm चा ट्यूमर डाव्या फुफ्फुसात पसरला होता. मुलगा अवघा साडेतीन वर्षांचा. पायाखाली जमीन नाही आणि वर आकाश नाही अशी स्थिती. मी जीवशास्त्राची विद्यार्थीनी त्यामुळे कॉलेजमधे असताना थोडाफार कॅन्सरचा अभ्यास केला होता. पण पुस्तकातला अभ्यास वेगळा आणि स्वत:ला कॅन्सर होणे वेगळे. म्हणजे जंगलातील आगीचे वर्णन वाचणे आणि स्वत: त्या वणव्यात होरपळणे इतका फरक आहे. माझ्या हातात फक्त काही महिने होते. ट्यूमर ह्रदय, फुफ्फुसाला चिकटून असल्यामुळे शस्त्रक्रियेने तो काढता आला नाही. डॉक्टरांना फार आशा नव्हती पण ‘एक प्रयत्न करून बघू’ म्हणून त्यांनी दोन शक्तीशाली औषधे एकत्र करून किमो दिले. रेडिएशनची ३३ डोस दिले. ट्यूमर अर्धा कमी झाला. आम्ही तेवढ्यानेही खुश झालो. पण देवाच्या मनात काही दुसरेच होते. उपचार संपल्यावर तीनच महिन्यात ट्यूमर परत वाढू लागला. आता काहीच उपाय उरले नव्हते. डॉक्टरांनी निराशेने मान हलवली. सर्वांना सोडून जायची माझी वेळ आली होती. माझी निरवानिरव सुरू झाली. पण कमलेशने हार मानली नाही.
कमलेशने परदेशात रिपोर्टस पाठवले पण तिथेही काही उपाय नव्हते. यज्ञाला बसल्यासारखा कमलेश इंटरनेटवर बसला. आम्ही दोघेही पी.एच्.डी. संशोधनाची वृत्ती इथे उपयोगी पडली. माहितीचे मंथन सुरू झाले. आहार, व्यायाम, योग, सकारात्मक विचार असे नाना परीचे कमलेश सांगू लागला. यमराज माझ्याशेजारी येऊन बसला होता. काही सुचत नव्हते. आमच्या बाळाचे कसे होणार हाच विचार सारखा जीवाला घोर लावत होता. अशा सुन्न मन:स्थितीत कमलेशने वाचलेले प्रयोग स्वत:वर करू लागले.
उपचारां दरम्यान होणाऱ्या साइड इफेक्टसना कसे तोंड द्यावे याबद्दल काहीही माहीती मिळत नव्हती. खूप शंका होत्या. दुसऱ्या रुग्णांशी बोलावे, त्यांनी या परिस्थितीला कसे तोंड दिले हे विचारावे . शरीर -मनात जो कल्लोळ उठला होता त्याबद्दल शास्त्रीय माहिती मला हवी होती. कॅन्सर मधून बरे झालेले रूग्ण याबद्दल काहीच बोलायला तयार नसतात. या काळात मन अगदी सैरभैर होते . त्याला कसे आवरावे यासाठी कोणीही चार समजुतीचे शब्द सांगत नाही.
२००७मधे कॅन्सरने परत उसळी मारली आणि उपचारही सर्व संपले तेव्हा टाटाच्या एका मोठ्या डॉक्टरांनी मला सांगितले,” तुझी इच्छाशक्ती जितकी असेल तितकी तू जगशील.” ‘मला जगायचे आहे, मला जगायचे आहे’ असे म्हणत रडत राहण्याने आपल्याला आयुष्य मिळणार नाही.
रोगमुक्त होण्यासाठी औषध उपचारांव्यतिरिक्त रुग्णाने जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न म्हणजे इच्छाशक्ती !!
उपचारांना दाद न देणाऱ्या कॅन्सरने मला शिकविले की फक्त किमो-रेडिएशन म्हणजे कॅन्सरवरचे उपचार नव्हेत. संतुलित आहार, योग, आयुर्वेद, व्यायाम, सकारात्मक विचार म्हणजे इच्छाशक्तीचे भरभक्कम आधारस्तंभ. या सर्व गोष्टींनी – wholistic healing ने रुग्ण आपले जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो. इंटरनेटवर जेव्हा प्रतिकूल परीस्थितीत जिद्दीने कॅन्सरशी लढलेल्या इतर रुग्णांचे अनुभव वाचले तेव्हा जाणवले की त्यानी आपल्या आहारात, दिनचर्येत, विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले होते. या सगळ्या मागे त्यांचे अथक परिश्रम होते. काही चमत्कार नव्हता. जगभर चाललेले संशोधनही या गोष्टींना पुष्टी देते. रुग्णाचा सकारात्मक सहभाग उपचारांची यशस्वीता कैक पटीने वाढवतो. एकना एक दिवस, कुठल्या तरी कारणाने मृत्यू तर येणार पण तोपर्यंत प्रयत्न करायला , लढायला काय हरकत आहे?
कसे जगायचे ते तुम्हीच ठरवा
कहण्णत कहण्णत की गाणे म्हणत ||
२००७ पासून आम्ही दोघे दुसरे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोलायला लागलो. लोकांनाही त्याने मोठा दिलासा मिळू लागला. आपल्या मायबोली मराठीत कुणी शास्त्रीय माहिती नीट समजावून देते म्हटल्यावर माऊथ पब्लिसीटीने लांबून लांबून लोकं संपर्क साधू लागले. वर्तमानपत्रे, मासिक,पुस्तकात लेख लिहीले. अनेक सभांमधे भाषणे केली. याचाच एक भाग म्हणून ‘कॅन्सर मंथन’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. कॅन्सर मंथनच्या माध्यमातून देश विदेशातील रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी कडा असते असे म्हणतात. कॅन्सरही पूर्ण वाईट नाही. एरवी ७०- ८० वर्षे सुखाचे आयुष्य जगूनही जे शहाणपण, अनुकंपा , प्रेम शिकलो नसतो ते कॅन्सरच्या कृपेमुळे चाळीशीच्या आत शिकलो.आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता घेता मृत्यूचे भय कधी उणावले ते कळलेच नाही. निरपेक्ष प्रेम करणारे अनेक लोक भेटले. जीवनाकडे आणि विश्वाकडे बघायची दिव्य दृष्टी कॅन्सर देतो.
आमच्या नवसंजीवनी कॅन्सर सपोर्ट ग्रुपमधील संजना तर म्हणते, “ बरे झाले कॅन्सर झाला ते नाहीतर इतके चांगले लोक कसे भेटले असते?”
———————————————————————————————————————
