कर्मयोगी

-डॉक्टर ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com

The future of medicine is in helping people to attain better quality of life by addressing many factors of life that contribute to a person’s health – Dr El Hachem.

कर्करोगाचा किमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया यापलीकडे जाऊन विचार करणारे डॉक्टर म्हणजे डॉ. अरविंद कुलकर्णी. डॉक्टर स्वतः रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट. पुण्याच्या बी .जे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी. नंतर इंग्लंड अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतले. तिथेच काही वर्ष नोकरीही केली. परदेशात चांगले बस्तान बसलेले असतानाही आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी करावा या उद्देशाने डॉ. अरविंद कुलकर्णी 1973 ला भारतात परतले. आधी जसलोक हॉस्पिटल आणि नंतर बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिएशन ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले.

एकात्मिक उपचार पद्धतीची (इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट) कल्पना कशी सुचली हे सांगताना डॉक्टर कुलकर्णी म्हणतात ‘कुठल्याही ॲलोपथी डॉक्टर प्रमाणे औषधे, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया या त्रिशुळाने आपण कुठलाही आजार बरा करू शकू असा गाढ विश्वास होता. पण जस-जशी वर्षे जाऊ लागली तसतसे जाणवू लागले की या उपचारांचे अनेक दुष्परिणाम आहेत. रुग्णाचे जीवनमान खालावते. बऱ्याचदा चांगले उपचार करूनही त्यांचा कर्करोग पुन्हा पुन्हा उद्भवतो. हे सर्व दुष्परिणाम कमी करून कर्करोगाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करू लागलो’.

1973 च्या सुमारास डॉक्टर कुलकर्णींकडे गर्भाशयाचा कर्करोग झालेली एक रुग्णा आली. कर्करोग शेवटच्या स्टेजला गेला होता. फारशी आशा नव्हती. डॉक्टरांचे सहकारी वैद्य भावे यांनी भीत भीत आयुर्वेदिक उपचार करायची परवानगी मागितली. रेडिएशनच्या जोडीने दिलेल्या आयुर्वेदिक औषधांनी तिच्या प्रकृतीत आश्चर्यकारक फरक पडला. काही काळाचीच सोबती असलेली ती रुग्णा पुढचे पंचवीस वर्ष चांगले आयुष्य जगली .
या घटनेने डॉक्टरांच्या विचारांना एक मोठी कलाटणी मिळाली. “असेल एक योगायोग” असे म्हणून डॉक्टरांनी ही घटना सोडून दिली नाही. “माझ्या पेशंटना कसे बरे वाटेल, उपचारांचे दुष्परिणाम कसे कमी होतील.” या ध्यासाने झपाटलेले डॉक्टर आयुर्वेदाचा मुळापासून अभ्यास करू लागले. त्याचप्रमाणे ॲक्युपंक्चर, होमिओपथी, स्पिरिच्युअल हीलींग इत्यादी पद्धतींचाही त्यांनी अभ्यास केला. असे नवनवीन प्रयोग करत असताना डॉक्टर कुलकर्णीना आपल्या सहकार्‍यांचा विरोध, उपहासही सहन करावा लागला. परंतु रुग्णाच्या हितासाठी त्यांनी आपले प्रयत्न अखंड चालूच ठेवले. त्यांच्या अथक प्रयत्नांना हळूहळू यश मिळू लागले.

याच दरम्यान डॉ कुलकर्णींची परमपूज्य सरदेशमुख महाराजांशी गाठ पडली. आयुर्वेद आणि नाडी परीक्षेत निपूण असणाऱ्या सरदेशमुख महाराजांचा आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर जुनी शास्त्रे तपासून पाहण्याचा आग्रह होता. महाराजांचे थोरले सुपुत्र, डॉक्टर सदानंद सरदेशमुख, यांच्याबरोबर डॉक्टर कुलकर्णींनी आयुर्वेदाचा कर्करोग रुग्णांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास सुरू केला. 1994 मध्ये महाराजांच्या प्रेरणेने या दोघांनी अधिकृतरित्या ॲलोपथी आणि आयुर्वेदाच्या समन्वयाने एकात्मिक कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट सुरू केला. वाघोली, पुणे येथील हॉस्पिटल मध्ये किमोथेरपी, रेडिएशन बरोबरच आयुर्वेदिक औषधे दिली जातात. जेणेकरून किमोथेरपी रेडिएशन चे दुष्परिणाम कमी होतात. योग्य तेव्हा उपचार संपल्यानंतर पंचकर्म चिकित्सा दिली जाते. त्यामुळे रुग्णाचे जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होते.

2019 ला या रिसर्च प्रोजेक्टला पंचवीस वर्षे पूर्ण होतील. साडे अकरा हजार पेक्षा जास्त रुग्णांनी या प्रोजेक्टचा फायदा घेतला आहे. या सर्व रुग्णांच्या रक्तचाचण्या, सोनोग्राफी, स्कॅन इत्यादी रिपोर्ट, औषधे, उपचार योजना इत्यादी बारीकसारीक नोंदी नियमितपणे ठेवल्या जातात. दर पाच वर्षांनी ‘कॅन्सर आणि आयुर्वेद’ ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. सर्व संशोधनाचे निष्कर्ष देशी-परदेशी संशोधकांसमोर मांडले जातात. या प्रोजेक्टचे कार्य पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, सिलिगुडी, गुरगाव असे वाढतच चालले आहे. डॉक्टर कुलकर्णी आणि डॉक्टर सरदेशमुख यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा प्रोजेक्ट म्हणजे ॲलोपथी आणि आयुर्वेद यांच्या समन्वयाचे तसेच टीमवर्कचे एक उत्तम उदाहरण आहे.

यादरम्यान 1998 साली डॉक्टर कुलकर्णीना अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील एलीगेनी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या इंटिग्रेटेड मेडिसिन डिपार्टमेंट तर्फे डायरेक्टर म्हणून आमंत्रित केले गेले. तेथे कर्करोगा साठी किमोथेरपी, रेडिएशन बरोबरच रुग्णाला योग, मेडिटेशन, आयुर्वेद, चायनीज मेडिसिन बद्दल मार्गदर्शन केले जाते. या संधीमुळे डॉक्टर कुलकर्णींना जगभरातल्या कॅन्सर ट्रीटमेंट मधील बदलत्या प्रवाहाचा अनुभव मिळाला.

डॉक्टर कुलकर्णी यांनी ‘वॉर अगेन्स्ट कॅन्सर’, ‘कॅन्सर प्रिव्हेन्शन’ ही कर्करोगाचे सांगोपांग विवेचन करणारी पुस्तके लिहिली. सोप्या भाषेत कर्करोगाची कारणे, उपचार तसेच जगभर चालणारे नवनवीन पर्यायी उपचार यांची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.

या सर्व कार्यात डॉक्टर कुलकर्णींना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ श्रीलेखा कुलकर्णी यांचा पूर्ण पाठिंबा असतो. सौ श्रीलेखा ह्या पुण्यातील कामायनीच्या संस्थापक, कै सिंधुताई जोशी, यांच्या कन्या. कुलकर्णी दाम्पत्यानी अनेक संस्थांना सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे. वाघोली येथील आयसीटिआरसी हॉस्पिटलमध्ये असलेला रेडिएशन विभाग हे त्याचे एक ठळक उदाहरण.

29 सप्टेंबर 2018 मध्ये डॉक्टर अरविंद कुलकर्णींनी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली. आजही तरुणाला लाजवेल अशा तडफेने ते हॉस्पिटल मध्ये जातात. उत्साहाने कर्करोगावरच्या नवनवीन संशोधनाचा मागोवा घेतात. कर्करोगाच्या रुग्णाचे आयुष्यमान सुधारण्याचा अखंड ध्यास घेतलेले डॉक्टर कुलकर्णी म्हणतात ‘भारतात परंपरेने आलेल्या आहार – विहार – विचार – दिनचर्येचा आपण पुन्हा अंगीकार केला तर कर्करोग, मधुमेह, हृदयरोग इत्यादी अनेक रोगांना आपण दूर ठेऊ शकू’.

अशा कर्मयोगी डॉक्टर कुलकर्णी यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !